शनिवार, ८ जुलै, २०१७

बालक पालक...

आजचे बालक पुढे उद्या पालक होणार असतात आणि आजचे पालक कधीकाळी बालक असतात. हे वर्ष 2017 आहे. आज जे पालक आहेत आणि जे बालक आहेत त्यांच्या दोन्ही पिढ्याच्या मधल्या काळात कधीतरी तंत्रज्ञानाने मोठी उडी घेतली आहे. तबकडी फिरवून नंबर लावायच्या फोनपासून ते नाव उच्चारून फोन लाव म्हणून आदेश घेणाऱ्या स्मार्टफोनपर्यंत येताना बरीच स्थित्यंतरं ओलांडलीयेत. त्याच्यामुळे या दोन्हींमध्ये शोधायला जाता साम्य कमी आणि तफावत फार. 

आपलं पालनपोषण आपल्या पालकांनी अत्यंत साधेपणाने केलं आणि तरीही त्या परिस्थितीतून आपण जे शिकलो, वाढलो, घडलो तशी आजची पिढी कधीच करू शकणार नाही, ही बऱ्याच पालकांची ओरड असते. पण, परिस्थितीच ती राहिली नसेल तर ? आजच्या नव्या पिढीचं जग वेगळं आहे, त्यांच्या समोरची आव्हानं वेगळी आहेत. त्यांच्यासमोर जीवघेणी स्पर्धा आहे. त्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानासोबत अपडेटेड राहणं ही गरज आहे. स्मार्ट यंत्र चालवायला माणूसही स्मार्टर असावा लागतो नाही का? मग इतकं सगळं वेगळं असताना त्यांचं आयुष्य त्याच फुटपट्टीने मापून कसं चालेल? आणि ही गोष्ट किती पालक समजून घेतात? फार कमी, किंबहुना नगण्य. आणि ज्यांना कळतं ते बऱ्याचदा त्याचा अनावश्यक बाऊ करतात. अशात मुलांच्या अपेक्षा असतात पालकांनी त्यांना समजून घ्यावं, त्यांच्या कलेने घ्यावं. 

एक असते खरी खरी स्पर्धा आणि एक असते लादलेली स्पर्धा. लादलेली स्पर्धा सुरू होते जन्माबरोबरच. शेजारच्याचं बाळ रांगायला लागलं, आपलं अजून पालथं सुद्धा पडत नाही. अमुक एक जण बोलायला लागला आणि आपलं बाळ कसं बोलत नाही? तो अंगणवाडीत छान खेळतो, आमचाच कसा रडत राहतो? ह्यानी इंटरव्ह्यूला जर बरी उत्तरं दिली असती तर कॉन्व्हेंटला गेला असता आज. मग पुढे परीक्षा, मार्क, खेळ, कला जितके तिकडे नंबरासाठी जुंपून दिलेली स्पर्धा. आणि या सगळ्या स्पर्धांमधून आपल्या पाल्याने कायम पहिलं येत राहावं ही अनावश्यक अपेक्षा करत राहणे. आणि त्यातच त्याचं भलं आहे याचा दृढ विश्वास असतो. याची खरंच गरज आहे का?  ती जी खरी खरी स्पर्धा असते ती तर खूप उशिरा सुरू होते. जेव्हा माणूस स्वतःच्या पायावर उभे राहण्याची वेळ येते. खऱ्या जगातल्या खऱ्याखुऱ्या माणसांसोबत जेव्हा डील करावं लागतं.  या परीक्षांच्या आणि जबरदस्तीच्या छंद वर्गांच्या लादलेल्या स्पर्धांमधलं तिथं खऱ्या जगात काहीच कामी येत नाही. आणि जे लागतं त्याची तयारी कुणीच करवून घेतलेली नसते, कधीच.  तेच आपल्या आयुष्यात आज आई आणि बाबा असलेल्या व्यक्ती रोज जगत असतात, लढत असतात. पण आपल्या पाल्याला अशा आव्हानांनी आणि तणावाने भरलेल्या जगात आपलं मानसिक आरोग्य कसं राखावं याचं प्रशिक्षण कधी देतच नाहीत. किंबहुना त्यांनाही कधी ते दिलं गेलेलं नसतं मग त्यांना तरी जे माहीत नाही त्याचा अभाव कसा जाणवणार? 

काही गोष्टी ह्या फक्त स्वतःसाठी करायच्या असतात. एखादं गाणं गुणगुणनं, एखादा खेळ खेळणं, एखादं पुस्तक वाचणं, सिनेमा पाहणं किंवा आणखी काहीही. लगेच त्या मुलींमध्ये लता मंगेशकर आणि मुलामध्ये सचिन तेंडुलकर दिसून त्याच्या कलेला वाव देण्याच्या नावाखाली त्याचं इतर गोष्टींचं कुतूहलच पालकांकडून संपवून टाकलं जातं. उदाहरणच द्यायचं तर, आपला मुलगा किंवा मुलगी छान चित्र काढतो किंवा काढते म्हणून त्याच्यात भावी चित्रकार बघणारे पालक त्याला लगेच पेंटिंगचे क्लास लावतात आणि काही नाही तर डिझायनर होईल अशी स्वप्न बघतात. जेव्हा एखाद्या गोष्टीला व्यवहाराची जोड लागते तेव्हा बहुधा त्यातलं आत्मसमाधानाचं मूल्य संपतं. त्याच्यात फक्त एक प्रकारचा यांत्रिकीपणा येतो. "छंद" संपून मग ते मग ते कायमचं "द्वंद्व" होऊन बसतं. अर्थात प्रोत्साहन देऊच नये असं नाहीच पण मुलांचे छंद आणि आवडी या प्रवाही असतात हे ही लक्षात घ्यायला हवं. तुमचा पोटापाण्याचा व्यवसाय काही असो, रोजच्या जगण्यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढून जेव्हा तुम्ही बाकी सगळं विसरून ज्यात रमता तो छंद. 

उद्या जेव्हा तो किंवा ती मोठे होतील, आणि हळू हळू त्यांना स्वतःला त्यांची आवड कळेल, तेव्हा त्यातला योग्य तो पर्याय निवडण्याची निर्णयक्षमता त्यांच्यात यावी इतका त्यांचा आत्मविश्वास तयार होईल याची फक्त काळजी घ्यायला हवी. मग त्यांच्यासमोर सगळे पर्याय मांडून निर्णय त्यांच्यावर सोपवून द्यावा. चुकलं तरी तो त्यांचा निर्णय असेल. त्यातून ते शिकतीलच. म्हणून पालकहो जस्ट टेक अ चिल पिल.. त्यांना त्यांचे रस्ते शोधू दे. खरी गरज आहे ती त्यांना खऱ्या स्पर्धेसाठी तयार करण्याची... त्याचं बक्षीस पैसे आणि प्रसिद्धी नसून समाधान आणि मानसिक आरोग्य असेल...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा