गुरुवार, २५ मे, २०१७

जीवन..

गावात नांगरून पावसाची वाट पाहत असलेल्या जमिनीवर त्यांची पालं पडलेली दिसतात. तीन-चार गाठोडी आणि मोजक्याच गाडग्या-मडक्याचा संसार. सोबत शंभरेक मेंढ्या आणि हे विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर वागवायला दोन-चार घोडे. त्यात एक नवीन शिंगरू. 

संध्याकाळच्या वेळी उन्हं उतरताना माझी नेहमीसारखी नदीकडे एक फेरी असते, त्या रस्त्यावर हा लवाजमा दिसतो. संध्याकाळच्या कलत्या उन्हात त्या मेंढ्या अजूनच चकाकू लागतात. त्यांना घेऊन फोटो काढायचा म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. पुरुष मंडळी मेंढ्या चरायला घेऊन गेले होते आणि प्रत्येक पालेवर एक स्त्री रात्रीसाठी रांधत बसली होती. त्यातल्या एका बाईला "मेंढीसोबत फोटो काढू का?" असं विचारताच त्यांनी लगेच हातातलं काम सोडून जवळच्या मेंढीजवळचं नुकतंच तासभारपूर्वी जन्मलेलं एक कोकरू उचलून आम्हाला देऊ केलं. त्या लोकांचं तिथं येण्यामागचं कारण जाणून घ्यायच्या उत्सुकतेनं मी शेवटी त्यांच्या नाव-गावाची चौकशी केलीच. 

"आमी तिकडं लांब आटपाडीस्नं आलो. पाऊस आल्याव जायचं माघारी." त्या नुकत्याच जन्मलेल्या तिळ्या मेंढ्यापैकी एकाला आमच्या हातात देत ती पोरसवदा बाई बोलली. 
मी म्हटलं "थांबा, त्या शेळ्यांसोबत तुमचाही फोटो घेतो." ती एकदम ओशाळली, पण तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तिने मेंढी खाली सोडली आणि आपला अवतार ठीकठाक केला. कुणीतरी आपला फोटो घेतोय याचं तिला कौतुक होतं आणि तिने लाजत का होईना पण ते बोलून दाखवलं. 

"तुमच्या एक फोटोत आमचा समदा संसारच आला बगा." मी त्यांच्या संसाराचे फोटो घेत असताना ती बाई म्हणाली. मला एकदम बंगले-गाडी विकत घेण्यासाठी रक्त आटवणारा शहरी माणूस आठवला. अर्थात, हे लोक या परिस्थितीत आनंदात आहेत असं गृहीत धरणं चुकीचं होईल. मोठं घर, जमीन, टीव्ही, महागडी गॅजेट्स यांची स्वप्न त्यांनाही पडत असतील. किंबहुना पडतातच, तसं नसतं तर ती बाई फोटो सारख्या एरव्ही साध्या गोष्टीने इतकी आनंदी झाली नसती. पण आहे त्या परिस्थितीत माणूस जगणं सुरू ठेवतो, केवळ उद्याच्या आशेवर.

सांगली जिल्ह्याला कृष्णा नदी पूर्व-पश्चिम भागात विभागते. पूर्वेकडचे तासगाव, आटपाडी, विटा, जत तालुके तसे पश्चिमेच्या  वाळवा, पलूस आणि काही अंशी शिराळा पेक्षा दुष्काळी. त्यातपण पश्चिमेकडच्या भागात वारणा नदीच्या सबंध किनाऱ्यालगतचा साधारण काही किमीचा पट्टा पाणीदार आणि ऊस पिकवणारा. तो भाग सोडला तर शिराळा तालुक्याच्या उरलेल्या डोंगराळ भागात रिकामे हंडे घेऊन पायपीट करणाऱ्या स्त्रिया, सायकलीवर मैलभर पाणी वाहून नेणारे पुरुष हे दृश्य तसं नेहमीचंच. 

अशा पूर्वेच्या वारणेच्या पाण्यावर हिरवा झालेल्या भागात हे लोक पश्चिमेच्या दुष्काळी भागातून शंभरेक किलोमीटर आपल्या शेळ्या-मेंढ्या जगवायला उन्हाळ्याच्या काळात येतात. उन्हाळ्याचे दिवस संपून पावसाच्या आगमनाबरोबर आपल्या गावाची परतीची वाट धरतात. हे स्थलांतरित लोक स्थलांतरित पक्षांप्रमाणे निसर्गाच्या चक्राला सरावले आहेत. 

एकविसाव्या शतकात जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात माणसाचं जगणं असंही असू शकेल, याची शहरी सुशिक्षित आणि तथाकथित प्रगत वर्गाला कल्पना असणंही कठीण आहे.

पाणी हेच "जीवन" ... 


२ टिप्पण्या: