बुधवार, २९ मार्च, २०१७

मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक....

प्रिय मित्र 'अ' यास,

सर्वप्रथम तर तुझे मनःपूर्वक अभिनंदन!
हार्वर्डसारख्या जगविख्यात संस्थेचा तू भाग होणार आहेस याचा मला आत्यंतिक आनंद आहे. त्यात आजवर परिश्रम करून तू हे यश संपादन केले आहेस त्यासाठी तुझा मित्र म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो.
तुझ्या आजवरच्या प्रगतीचा आणि त्या मागच्या मेहनतीचा मी साक्षीदार आहे. आपल्या कॉलेजच्या दिवसापासूनच तुझी हुशारी आणि जिद्द याचं मला कौतुक वाटत आले आहे आणि यापुढेही ते असेल.

मित्र जर का जाणकार आणि हुशार असेल तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. एकतर गरजेच्या वेळी त्याची हुशारी कामी येते आणि दुसरं म्हणजे, तुमच्या डोळ्यासमोर सतत त्याचा आदर्श असतो जो काहीतरी करत राहायची प्रेरणा देतो.
तू माझे प्रेरणास्थान तर आहेसच, पण तू केलेली मदत मी कधीही विसरू शकणार नाही. माझे आज जे काय यश असेल त्याचे श्रेय मी तुला देऊ इच्छितो. कारण तेव्हा जर तू मार्ग दाखवला नसतास तर आज मी इथवर पोहोचू शकलो नसतो. वेळप्रसंगी मार्गदर्शन करणारा मित्र सुद्धा गुरुच असतो म्हणून मी तुला कायम गुरुस्थानी मानत आलो आहे.

आज तुझ्या या यशासाठी माझ्याकडून तुला भरभरून शुभेच्छा!

असेच कार्य सुरू ठेव, प्रामाणिकपणे आणि जिद्दीने. त्याची परतफेड तुला नक्की मिळेल याची मला खात्री आहे.

लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा हि अपेक्षा.

पुन्हा एकदा तुझे अभिनंदन!
तुझा मित्र,
'क्ष'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा