बुधवार, ४ जानेवारी, २०१७

ती...

ती आज शाळेत सवित्रीबाईंसारखा वेष करून गेली होती.
काल बाईंनीच सांगितलेलं तसं यायला. नऊवारी साडी, डोक्यावर पदर, कपाळावर आडवं कुंकू आणि हातात एक पुस्तक.
गेल्या दिवाळीत घेतलेली किंवा कुणा मैत्रिणीची मागून आणलेली शिवलेली नऊवारी आणि हवा तसा मेकअप करून आईचा हात धरून आज शाळेत आलेली ती.
आई, दहावी नापास.
अठरावं संपायच्या आत आईच्या वडिलांनी, म्हणजे आजोबांनी तिचं लग्न लावून दिलेलं.
आणि वर्षभरात जन्मलेली ही.
हिला मागच्या दोन बहिणी तरी अजून पाळणा थांबलेला नाही.
 तिला भाऊ हवाय राखी बांधायला
आणि तिच्या बाबांना मुलगा हवाय नसलेली इष्टक सांभाळायला.
पुढेमागे तो सुद्धा जन्मेल आणि आईवडिलांचे पांग फेडेल.
मग तिचं आधीच नसलेलं महत्व अजून नाहीसं होईल.
आणि भावाच्या गरजा भागवून उरलंच काही तिच्याही वाट्याला येईल.
त्याच्या इंजिनियरिंगच्या फी मुळे हिचं कॉलेज बंद होईल,
आणि हुशार असली तरी लग्ना नंतर भांडी घासायला डिग्री का कामी येईल?
सावित्रीबाई वगैरेचा पोशाख करून शाळेत जाणं वगैरे ठीक आहे. लहानपणी असं फॅन्सी ड्रेस मध्ये बरेच जण भाग घेतात.
 त्यासाठी चार ओळी सुद्धा पाठ करतात.
समारंभ संपतो, चुणचुणीत मुलीला बक्षीसही मिळतं.
तो पोशाख होता तिचा तिला दिला जातो आणि कपाळावरचं आडवं कुंकू धुवून स्वच्छ केलं जातं.
डागही दिसू नये असं.
दुसऱ्या दिवशी ती विसरलेली असते सावित्रीबाई कोण होती?  आणि आईही विसरलेली असते आपण कधी काळी शाळा पाहिली होती...

1 टिप्पणी: