रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

एक झाड आहे...

एक झाड आहे.
इतर झाडांच्या गर्दीत असून नसल्यासारखं...
त्यांच्याच जातीचं, पण सगळ्यांपासून वेगळं वागणारं..
म्हणून कदाचित त्या गर्दीत उठून दिसणारं...

इतरांचा मोहोर त्यानं कधी आपला मानला नाही
कुरूप.... वेडंबिंद्र..
शरीरावर असंख्य काटे असलेलं...
वसंतात पण फुलांविना फांदी रुक्ष राहते..
इतरांची पानगळ संपल्यावर याची सुरु होते
होतं त्यांच्याच जातीचं, पण सगळ्यांपासून वेगळं भासणारं..
म्हणून कदाचित त्या गर्दीत उठून दिसणारं...

कोणे एकेकाळी त्याला कुणीतरी तोडायला आलेले म्हणे
मुळासकट... निर्दयीपणे...
पण नाशिबानं त्याची साथ दिली...
उरल्यासुरल्या खोड़ाला पुन्हा पालवी फुटली..
त्याच्या धडपडीची बाकी सगळ्यांना आगळीकच वाटली..
होतं त्यांच्याच जातीचं, पण सगळ्यांपासून वेगळं वाटणारं..
म्हणून कदाचित त्या गर्दीत उठून दिसणारं...

उशिरा का होईना, त्याला बहर आलाय...
शुभ्र... आकर्षक...
इतरांना हेवा वाटावा असा..
आता फांदी-फांदीतून शुभ्र फुलांनी बहरलाय..
इतरांपेक्षा वेगळा असा त्याचा मोहोर त्यांनं निवडलाय...
होतं त्यांच्याच जातीचं, पण सगळ्यांपासून वेगळं फूलणारं..
म्हणून कदाचित त्या गर्दीत उठून दिसणारं..

-विनायक .
(परिस्थितीशी दोन हात करून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्यांसाठी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा