बुधवार, २७ जुलै, २०१६

२६ जुलै २००५...

साल २००५.
११ वर्षांपूर्वी याच दिवशी दुपारी साधारण दोन वाजता मी नेहमीप्रमाणे नुकताच कॉलेजहून आमच्या चप्पलच्या दुकानावर आलो होतो. मुंबईत जुलै महिन्यात कोसळावा तसाच पाऊस कोसळत होता. माझे काका नुकतेच जेवून आराम करत होते आणि मी दुकान बघत होतो. इतका मुसळधार पाऊस असताना गिऱ्हाईक तरी कुठलं? रेडियोवर पावसाच्या गाण्यांच्या मधून मधून मुंबईत जागोजागी पाणी भरायला लागल्याचे अपडेट्स देत होते.  आमच्या लाल pco वर घरून फोन आला, "आता लगेच दुकान बंद करून निघा. बातम्यांवर दाखवत आहेत की ट्रेन बंद होतायत, ट्रॅकवर पाणी साचतेय." मी मनात खुश, की आज लवकर घरी जायला मिळणार. काकांना उठवलं आणि फोन बद्दल सांगितलं, पण त्यांना ते काही गंभीर वाटलं नाही. पण थोड्या वेळात, ताडदेव सर्कलवरच्या आमच्या स्टॉलसमोर चांगली 5-6 फूट रुंद फुटपाथ पाण्याखाली जाऊन 1-2 फूट जागा उरली असेल, तेव्हा त्यांना खरी जाग आली आणि "आता बंद करूया" असं त्यांनी म्हटलं.  ते सगळं आवरून बंद करायचं म्हणजे 20-30 मिनिट सहज लागायची. तसं ते बंद करता करता साडेतीन वाजले आणि आम्ही मुंबई सेंट्रल स्टेशन कडे निघालो. तेव्हा आम्ही गोरेगावला राहायला होतो. अंतर साधारण 20 किमी. स्टेशनवर येऊन बघतो तर गाड्या ठप्प. आता?

आता काय, चालत जाऊ. दक्षिण मुंबई सखल भाग आहे, दादरच्या पुढे पाणी नसेल, असं काका म्हणाले आणि आम्ही बाकी लोकांसारखं ट्रॅक वरून दांडी यात्रेला निघालो. ट्रॅकवर चालणं कठीण होतं, त्यात माझ्या पाठीवर कॉलेजची बॅग (एव्हाना भिजलेली).  साधारण लोअर परेल पर्यंत आल्यावर आम्ही ट्रॅक वरून बाहेर आलो आणि तुलसी पाईप रोड धरला. त्या रस्त्यावर 2-3 फूट पाणी साचलेलं. तसंच चालत चालत दादर रानडे रोड, मग माटुंगा-माहीम-बांद्रा.

काकांचा अंदाज असा, की निदान बांदऱ्यापासून पुढे तरी ट्रेन स्लो का असेना पण चालू असतील. आशेला अंत नसतो म्हणतात ना....  पण बांद्रा स्टेशनला चित्र वेगळंच होतं. तिथे सुद्धा लोक ट्रेनची वाट बघत थांबलेले होते आणि पुढेमागे एखादी ट्रेन ट्रॅकवर उभी. पुढे जायला मोटरमनला पाण्याखाली गेलेला ट्रॅक दिसेना. संध्याकाळ होत आलेली . दोघेही दमलो होतो. काका जरा जास्तच (तेव्हा त्यांचं वय साधारण पन्नाशीच्या थोडंसं आत)

आता वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे गाठला. कला नगर , शासकीय वसाहत वगैरे म्हणजे एका मोठ्या रुंद नदीच्या पात्रासारखं दिसत होतं. रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडर जवळ पाणी साधारण कमरे इतकं आणि रस्त्याच्या कडेच्या दिशेने पाण्याची पातळी वाढत होती. इतकी की वाहनं वगैरे पूर्ण बुडाली होती. सगळीकडे सुरक्षेसाठी वीज बंद केली होती. मिलन सबवे नेहमी सारखा पाण्याखाली दिसतही नव्हता. लोक एका ओळीने मानवी साखळी करून रस्त्याच्या मधून चालत होते. मध्ये फ्लायओव्हर ब्रिज लागत होते. वर गाड्या दाटीवाटीनं उभ्या होत्या. लोक गाड्यांचे दरवाजे उघडून पाऊस थांबायची वाट बघत होते. आम्हालाही वाटलं की अजून किती चालणार? याच पुलावर थांबू. पुढे आणि काय परिस्थिती आहे ठाऊक नव्हती. पण तो विचार झटकून तरी आम्ही निघालो.  ब्रिज उतरताना हळूहळू पाण्याची पातळी वाढायची. आम्ही मध्ये थोडा दम घेऊन परत चालायला लागायचो. रस्त्यात खायला बिस्किटं वगैरे वाटणारे तरुण होते पण ते होते इतकंच आठवतंय आता. त्यांच्या कडून घेऊन खाल्लंही असेल कदाचित.

असं चालत चालत मध्यरात्र झाली होती. आमच्या सोबत चालणारे कोण कोण कितीतरी लांबचे प्रवासी होते. विरार, भाईंदर, बोरिवली वगैरे वगैरे . कधी पोहोचले असतील त्यांच्या घरी कोण जाणे. आम्हाला घरी पोहोचायला रात्रीचे २ वाजले. पाय तुटून पडले होते. रात्री अडीच वाजता मेणबत्तीच्या प्रकाशात जेवलेलं मला आठवतं. काळासोबत आठवणी पुसट होत जातील, पण प्रसंग लक्षात राहतील. आणि हा तर चांगलाच लक्षात राहील.
-डॉ विनायक कांबळे


(छायाचित्र आंतरजालावरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा