शनिवार, ९ जानेवारी, २०१६

गुणवत्तेच्या शोधात... भाग १

आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा थोडासा वेळ काढून लिहायला बसलोय. काही अनुभव स्मृतीवर ओरखडे ठेवून जातात कायमचे, ते विसरणे शक्य नसतं. तसंच इथे  जे सांगायचंय ते पण साधारण ३ वर्षांपूर्वी घडलंय. बहुतेक जून २०१३ मध्ये. 

मध्यंतरी आयआयएससीने सुरु केलेला एक उपक्रम कानावर आलेला. बदलत्या अभ्यासक्रमांसोबत शाळेतल्या आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या शिक्षकांचा शैक्षणिक दर्जा अद्ययावत (update) करण्याकरता कर्नाटकातल्या विशेषत: वेगवेगळ्या ग्रामीण भागांमधून दर महिन्याला साधारण ५० शिक्षकांचे ८-१० दिवसांचे प्रात्यक्षिक प्रयोग प्रदर्शन शिबीर(practical experiment demonstration camp) चित्रदुर्ग इथे आयोजित केले जाते. प्राध्यापक हेगडे, हे या सगळ्या शिबिराची जबाबदारी एकट्याने पाहतात आणि हे गेले काही वर्ष सातत्याने सुरु आहे. बंगलोर मधल्या कॉंलेजेस मधले सिनियर प्रोफेसर त्यांचे वर्ग घेतात आणि practical demonstration प्रात्यक्षिकांसाठी आयआयएससीमधले त्या-त्या विषयातले PhD चे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करतात. त्याच्या मोबदल्यात त्यांना पैसेही मिळतात.

प्राध्यापक हेगडे यांच्याकडून तिकडे यायचं आमंत्रण बऱ्याच दिवसांपासून होतं पण सलग २-३ दिवस जावं लागतं म्हणून वेळेचं गणित जुळत नव्हतं. एकदाचं आम्ही (मी आणि माझा सिनियर अंकुर) त्यांच्याशी बोलून एक शनिवार-रविवार असे दोन दिवस नक्की केले. शुक्रवारी दुपारी ३ वाजता घ्यायला गाडी येणार आणि रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी आणून सोडणार असं ठरलं होतं. दोन दिवस राहायच्या बेताने तयारी करून जायचं होतं. एकूणच आमचा उत्साह ओसंडून वाहत होता. अज्ञानात सुख असतं म्हणतात नं, तसं पुढच्या दोन दिवसांच्या काळात आमच्या भविष्यात काय लिहिलंय याची आम्हाला तसूभरही जाणीव नव्हती. "असं काय मोठं काम असणारेय असून असून ? प्रात्यक्षिकच दाखवायची आहेत न ? आणि ती सुद्धा कॉलेजच्या शिक्षकांना. त्यांना आधीच माहित असेल सगळं" आपण मस्त नवीन ठिकाणी २ दिवस नवीन अनुभव घ्यायला जातोय ह्या गोड गैरसमजावर आम्ही प्रवास करत होतो.

चित्रदुर्ग - बेळ्ळारी रस्त्यावर, चळ्ळकेरेला थोडीशी आत मध्ये, ही कुदापुरा नावाची जागा चित्रदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणापासून  तशी जवळच होती. बंगलोर पासून साधारण २५० किमी वर असलेला हा तसा अवर्षणग्रस्त भाग. उन्हाळ्यात पाण्याची अवस्था म्हणजे त्राहीमाम. म्हणूनच कदाचित शेतीचं प्रस्थ जास्त काही  दिसत नव्हतं. म्हणूनच सरकारने ही जागा IISc आणि  BARC, Department of Atomic Energy (DAE) वगैरे संशोधन संस्थांना  मिळून एकूण १५०० एकर जागा इथे दिली. त्यातल्या थोड्याशा भागात हे शिक्षकांचं ट्रेनिंग सेंटर  चालवलं जातं ज्याला त्यांनी टॅलेंट डेवलपमेंट सेंटर असं नाव दिलं होतं.


ट्रेनिंग सेंटर 
तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजले होते. अंधारायला लागलं होतं. येताना पाहिलं होतं की लोकवस्तीचं गाव आपण बरंच मागे लांब सोडून आलो आहोत. आता इथे उजाड माळरानाशिवाय क्षितिजापर्यंत नजरेला काहीच दिसत नव्हतं. या ट्रेनिंग सेंटरची एक वास्तू, त्याच्यामागे एक छोटेखानी मेस आणि साधारण एक किलोमीटर अंतरावर काही बैठी क्वाटर्स यांच्या खेरीज इकडे दुसरं काहीही नव्हतं. दोन्हींच्या मधून जाणारी एक पक्की डांबरी सडक आणि जवळच एक उंच पाण्याची टाकी. सुरुवातीला हे सगळं खूप थ्रिलिंग वाटलं. येताना दोन दिवस पुरेल इतकं बिस्किटं आणि चिवडा वगैरे घेऊन आल्याचं मनोमन समाधान होतं. हेगडे सरांनी इतरांशी ओळख वगैरे करून दिली. तिथले केअर टेकर आणि तिथला कायमस्वरूपी स्टाफ (साधारण २ लोकं) आणि मग आम्हाला आमच्या खोल्या दाखवल्या गेल्या. साधारण जेमतेम दिव्यांची व्यवस्था. एखाद्या छोटेखानी गावात  चालणारी दिवेलागणीची लगबग असते तशी काहीशी कातरवेळी आणि त्यानंतर थोडा वेळ मोजकीच पण रेंगाळलेली लोकांची ये-जा. आज ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर मोठे ६ आणि ८ इंची टेलिस्कोप लावून त्यांना चंद्र आणि शनी दाखवला जात होता.   साधारण ८ वाजेपर्यंत आम्ही जेवणं वगैरे उरकली आणि करण्यासारखं काहीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे असल्याने झोपी सुद्धा गेलो.

उन्हं उतरताना क्वाटर्सच्या आजूबाजूचा परिसर
उन्हं उतरताना क्वाटर्सच्या आजूबाजूचा परिसर


ट्रेनिंग सेंटर च्या बाहेर सुनील, अंकुर आणि मी


क्रमश: 

1 टिप्पणी: