रविवार, ३ जानेवारी, २०१६

गावाकडच्या सावित्रीच्या लेकी...

साधारणपणे मुली शिक्षणाला मुलांपेक्षा जास्त गांभीर्याने घेतात. वर्गात नोट्स लिहून घेणाऱ्या मुली, जर्नल्स (प्रयोगवह्या) वेळीच पूर्ण करणाऱ्या मुली, परीक्षेत बहुतांशी मेरीटमध्ये येणाऱ्या सुद्धा मुलीच. हे मुला-मुलींच्या अभ्यासात प्रामाणिकपणाचं गुणोत्तर शहराकडे साधारण समसमान असलं तरी ग्रामीण भागात अजूनही त्यात मुली अभ्यासाच्या बाबतीत जास्त गंभीर असल्याचं दिसून येतं. 

हुशारी वेगळी आणि प्रामाणिक प्रयत्न वेगळे, प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न करणारा हुशार असेलच असं नाही. पण गावाकडे साधारणपणे मुली हुशार नसल्या तरीही अभ्यासाच्या बाबतीत गंभीर असलेल्या दिसतात, याला कारण हेच की आजही जर मुलीची प्रगती अभ्यासात बरी असेल तर आणि तरच तिला पुढे शिकू दिलं जातं. गावाकडे अजूनही कित्येकदा मुलगी हुशार असली तरीही १५-१६व्या वर्षी दहावी होताच लग्न लावून दिलं जातं. आणि म्हणून मुलींना जर पुढे शिकायचं असेल तर त्यांना अभ्यासाला गांभीर्याने घेण्याशिवाय पर्याय नसतो. त्या एका बोलीवरच त्यांचं लग्न लांबू शकतं. माझ्या एका नातेवाईकाने त्यांच्या मुलीला अकरावी प्रवेश मिळवून दिला पण तिला सांगितलं की फक्त परीक्षेसाठी कॉलेजात जायचं. जो काही अभ्यास असेल तो घरीच करायचा. मी विचारलं असं का ? तर त्यांनी मला सांगितलं मुली कॉलेजात जाऊन बिघडतात. आणि मग वर्षभरात तिचं लग्न सुद्धा लावून दिलं गेलं. दुसऱ्या अशाच एका नात्यातल्या मुलीने घरची सगळी काम सांभाळून दहावीला बोर्डाच्या परीक्षेत ६०% मिळवले. मी तिच्या पालकांना सांगितलं हिला शिकवा, इतक्यात लग्न लावू नका. त्यांनी सुद्धा होकार दिला. ६ महिन्याच्या आत मला कळलं की तिचं लग्न झालं आणि आता वर्षभरात तिला एक मुल आहे. "असं का केलं?" म्हणून मी तिच्या आईला विचारलं तर त्यांनी सांगितलं की "चांगलं स्थळ आलेलं. अशी स्थळं परत परत येत नसतात आणि गावाकडे या वयात लग्न नाही झालं तर समाजात मुलीला नावं ठेवतात (हिणवतात) म्हणून करून टाकलं". हे सगळं मला पटण्यासारखं नव्हतं पण माझा नाईलाज होता.

मुलांना माहित असतं की काहीही झालं तरी घरचे आपल्याला शिकवणारच म्हणून त्यांना स्वत:ची हुशारी सिद्ध करायची, तशी जबाबदारी नसते. सावित्रीबाईंनी साधारण एका शतकापूर्वी मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला तरी अजूनही ग्रामीण भागात मुलींना तो मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हे चित्र बदलायला आताची पालकांची पिढी आणि त्यांचे बुरसटलेले विचार जायला हवेत. प्रबोधन हा पर्याय असला तरी १००% रिझल्ट मिळवण्यासाठी या शिक्षणाला वंचित राहिलेल्या मुली जेव्हा स्वत: माता होतील तेव्हा त्या आपल्या वाटेला आलेलं, आपल्या मुलीच्या नशिबी येऊ नये म्हणून मुलीला शिक्षण आणि उच्चशिक्षण घेण्यापासून तिला अडवणार नाहीत. चित्र बदलतंय, पण पूर्णत: बदलायला वेळ लागेल. हा हिमनग फोडण्यासाठी पहिला घाव घालणाऱ्या सावित्रीबाईच्या जन्मदिनी त्यांना आज विनम्र अभिवादन! केवळ विद्यापीठाला त्यांचं नाव दिल्याने समाज बदलेल, असं नाही. समाजातल्या, विशेषत: ग्रामीण भागातल्या मुलीना अजूनही हा अधिकार म्हणावा तसा मिळालेला नाही. त्यांच्या पर्यंत तो पोहोचावा. ज्याप्रमाणे, अभ्यासाला गांभीर्याने घेतात तसं काहीतरी करूंन दाखवण्याची महत्वकांक्षा त्यांच्यात निर्माण व्हावी. तेव्हा कुठे खरं शिक्षण म्हणजे काय, हे त्यांना कळेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा