सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

सुस्वागतम् २०१६...

शाळेत वर्षाअखेर प्रत्येकाला उभं करून विचारायचे, तुमचा नवीन वर्षाचा संकल्प सांगा. इतर  सगळ्यांसारखा मी सुद्धा काहीतरी सांगून खाली बसायचो. एकदा धाडस करून प्रामाणिक उत्तर दिलं "बाई, मी काहीही संकल्प करत नाही. कारण, मी ठरवलेलं कधी घडतच नाही." त्यावर बाईंनी मला १०-१५ मिनिटं भाषण दिलं होतं की याचा अर्थ माझे प्रयत्न कमी पडतात किंवा मी त्याला गांभीर्याने घेत नाही. ते सगळं कळायचं तेव्हा वय नव्हतं म्हणून "नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.." आत काही झिरपलं नाही.
आता मी जेव्हा मुलांना संशोधन आणि व्यावसायिक मार्गदर्शन देतो, तेव्हा एक गोष्ट हमखास सांगतो, ती म्हणजे एक गोष्ट आत्ता, या क्षणाला ठरवा की "तुम्ही स्वत: ला  आणखी पाच वर्षांनी कुठे बघू इच्छिता?" बऱ्याच मुलांनी हा विचार केलेला नसतो. मी पाच वर्षांनी अगदी नेमकं काय करत असेल याची कल्पना नसली तरी साधारण मी कोणत्या क्षेत्रात जाऊ इच्छितो आणि तिथे मी कोण असेन याची तरी आपण कल्पना करूच शकतो. नुकतीच माझी एका मोठ्या व्यक्तीशी भेट झाली. संशोधनाच्या क्षेत्रात त्या सर्वार्थांनी मोठ्या आहेत वयानं, अनुभवानं आणि मानानं. त्यांनी आशीर्वाद म्हणून एक कानमंत्र दिला तो म्हणजे "तुझ्या कामाचं व्यवस्थित नियोजन कर, खूप उपयोगी पडेल" मी ते शब्द जपून ठेवले आहेत. एक नशीब फॅक्टर सोडला (म्हणजे परिस्थिती बरं का, दैववाद नाही) तर बरंचसं याच प्लानिंगवर अवलंबून असतं. कुठल्याही क्षेत्रात असो पुढच्या वर्षभराचं नियोजन कधीही फायदेशीरच ठरतं. आर्थिक असो, व्यावसायिक असो किंवा खाजगी असो, प्लानिंग उपयोगी पडतंच. आणि वर्षभराचा काळ  हा तसा खुपच क्षणभंगुर. वर्ष कधी सुरु होतं, आणि हा-हा म्हणता संपतं सुद्धा. आत्ता २०१५ चंच घ्या ना आता काल-परवा नसलं तरी काही दिवसापूर्वीच सुरु झाल्यासारखं वाटत असताना संपलं सुद्धा. दरवर्षीप्रमाणे बरेच चांगले वाईट अनुभव देऊन गेलं.
शेवटी नवीन वर्ष म्हणजे काय? एक खगोलशास्त्रीय घटना. पृथ्वीची सुर्याभोवतीची आणखी एक फेरी. चला तर मग पुढच्या फेरीला निघुयात. 
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा