बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

MSc नंतर पुढे काय ? संशोधन ? की आणखी काही ?

"सर् मी सध्या एमएससी करत आहे किंवा नुकतीच पूर्ण केली आहे. तर आता मी पुढे काय करू ?"
हा प्रातिनिधिक स्वरूपाचा प्रश्न कित्येकदा विचारला जातो. कधी प्रत्यक्षात, कधी इमेलवर, कधी फेसबुक मेसेज मध्ये आणि कधी Whatsapp वरून. त्या सगळ्या प्रश्नकर्त्यासाठी जमेल तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. काही असेही असतील ज्यांना हा प्रश्न पडलाय पण कोणाला विचारावं ते कळत नाहीये. म्हणून त्यांच्यासाठी ही थोडीशी माहिती.

MSc नंतर पुढे काय करायचं आहे ते तुम्ही आधी ठरवावं असं मला वाटतं. पुढे रिसर्च करायचा असल्यास (कदाचित तर आणि तरच) पीएचडी साठी प्रयत्न करा अन्यथा एमएससी नंतर इतरही नोकरीच्या संधी शोधू शकता. रिसर्च नसेल करायचा तर पीएचडी करण्यात साध्य नाही. एकतर वेळ वाया जाईल आणि त्यातून एखाद्या वेळेस अपयशाने किंवा कुटुंबाच्या जबाबदारीने किंवा समाजाच्या सततच्या खोचक प्रश्नाने वैफल्य ( depression) येईल ते वेगळंच. म्हणून त्याचा आधी विचार करावा.

पीएचडी करायची असल्यास NET / GATE / JEST सारख्या परीक्षा देऊन प्रवेश मिळवणं अनिवार्य आहे. त्याची तयारी करावी. चांगल्या संस्थेत पीएचडी साठी प्रवेश हवा असल्यास चांगले गुण असणं आवश्यक आहे. या परीक्षांच्या निकालातून मुलाखतीसाठी निवड केली जाते. म्हणून ती पायरी ओलांडायची असल्यास विषयाचं सखोल ज्ञान आवश्यक आहे. त्याच बरोबर एमएस्सीला चांगला प्रोजेक्ट असणं आणि त्याचे आवश्यक ती सखोल माहिती गरजेची आहे जी मुलाखतीत तपासली जाते. पिएचडीसाठी JRF मिळवल्यास किंवा नामवंत संस्थेत (IIT/ IISc / IISER / TIFR etc) प्रवेश मिळवल्यास चांगली शिष्यवृत्तीही मिळते (सध्या पहिले २ वर्ष दर महा 25,000/- आणि नंतर ३ वर्षे दर महा 28000/- इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. किंवा स्कॉलरशिप मिळवून परदेशात पीएचडी करण्याचा विचार सुद्धा करू शकता. (याविषयीच्या माहितीसाठी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहीन).

सध्या मला नोकरी नाही म्हणून तात्पुरता किंवा आर्थिक दृष्ट्या सोयीचा पर्याय म्हणून पीएचडी करणं, हे पीएचडी च्या मूळ उद्देशाला धरून होणार नाही आणि जरी अशी PhD यशस्वीरित्या पार पडलात तरी पुन्हा नोकरीची शाश्वती नाही. त्यानंतर तुमचे विषयातले कौशल्य तपासले जाते. केवळ डिग्रीच्या कागदावर नोकऱ्या मिळत नाहीत. A degree is necessary condition, but not sufficient. म्हणजे Back to square one.

एमएससी नंतर नोकरीच्या संधी शोधत असाल तर, ज्युनियर किंवा डिग्री कॉलेज टिचिंग पेक्षाही वेगळे पर्याय आहेत, हा विचार बरेच जण करत नाहीत. तसं असेल तर सरकारी नौकरी डॉट कॉम (www.sarkari-naukri.com) किंवा employmentnews वर अशा वेबसाईट्स वर जाऊन पहा. BARC / DAE / ISRO / IITs / TIFR / IISc / IISERs / DAE / CSIR Labs / Universities यांच्या वेबसाईटवर recruitment किंवा career पेजेस वर जाऊन पहा तिथे अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. तुमचा अनुभव जुळत असल्यास तुम्हाला नोकरीवर घेतले जाऊ शकते किंवा दुसरं काही मिळेपर्यंत निदान १-२ वर्षासाठी प्रोजेक्ट असिस्टंटशिप वगैरे. त्यातून अनुभव सुद्धा मिळेल, बऱ्यापैकी पैसेही आणि चांगलं काम झाल्यास एखादं scientific publication वगैरे ज्याची पुन्हा पीएचडी किंवा नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल.

तसेच, IT / Engineering / semiconductor / pharmaceutical किंवा इतर कंपन्या मध्ये प्रयत्न करू शकता. त्यासाठी ओळखीने (Reference) किंवा Linkedin किंवा तत्सम वेबसाईट किंवा त्या त्या कंपन्यांच्या वेबसाईट्स वर careers section मध्ये जाहिराती सापडतील. शक्यतो XRD / spectroscopic -microscopic -laser instruments (Bruker / Panalytical / Newport / Hallmark etc) बनवणाऱ्या आणि त्या विकणाऱ्या कंपन्यांमध्ये sales or application engineer पदासाठी प्रयत्न करू शकता.

Patent law (IP protection), Actuarial Science, Science journalism (mass media) असे वेगळे मार्ग शोधू शकता.
आणि तरीही आपली विज्ञान शिकण्याची निवड चुकली असं वाटत असेल तर एकच सांगेन It's never too late.

- डॉ विनायक कांबळे
School of Physics, IISER Trivandrum 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा