मंगळवार, १ सप्टेंबर, २०१५

स. न. वि. वि.

प्रिय वाचक मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

स. न. वि. वि.

अनाहूत येणारी एखादी वाऱ्याची झुळूक खूप सुखावून जाते. तसंच काहीसं घडलं या गेल्या दोन दिवसात. 

मला नक्की आठवतही नाही नेमकं कधी, पण एबिपी माझाच्या "ब्लॉग माझा" या स्पर्धेसाठी मी काही महिन्यापूर्वी भाग घेतलेला आणि त्याबद्दल विसरूनही गेलो होतो. अचानक एक इमेल येतो काय, आणि अनपेक्षितरित्या आनंदाला उधाण येतं काय ? देश-विदेशातील शेकडो ब्लॉग्जपैकी त्यांनी सर्वोत्तम १३ ची निवड केली आणि त्यात आपल्या या "मी अवती-भवती आणि बरंच काही" या ब्लॉगची वर्णी लागली.  अतिशय आनंद आणि समाधान वाटलं त्याक्षणी. अनायासे मी माझ्या जवळच्या मित्रांसोबत त्या दिवशीपासून एका मोठ्या सहलीला निघालो होतो आणि प्रवासात बातमी मिळाली तेव्हा त्या सर्वांनी माझा हा आनंद साजरा केला. एका नेत्रदीपक सोहळ्यात खुद्द महाराष्ट्राचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री, श्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुरस्कार आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं याचा विशेष आनंद आहे.

कौतुकाचं अप्रूप प्रत्येकाला असतं, तसं ते मलाही आहे. पण या ब्लॉगचं श्रेय एकटा घेण्याचा स्वार्थीपणा मी करणार नाही. त्या बातमीसोबतच या ब्लॉगच्या आजवरच्या एकूण वाटचालीचा पट मनावर उलगडत गेला. कधी काळी सहज गंमत म्हणून एका ब्लॉगची सुरुवात केली आणि एक तत्सम बाळबोध पोस्ट टाकून नंतर त्याचं काही भविष्य आहे, ही अपेक्षा न करता तसाच सोडून दिला. सुदैवाने आयआयएससीत मला बरेच जाणकार आणि स्वत: उत्तम लेखक/ कवी असलेले मित्र भेटले, ज्यांनी माझ्यातली शब्दांची जवळीक हेरली आणि मला ब्लॉग लिहायला प्रोत्साहन दिले. यात मला प्रामुख्याने शंतनु भट आणि प्रमोद खाडिलकर यांची नावे घ्यावीशी वाटतात ज्यांच्या प्रोत्साहनाच्या भांडवलावर मी ही ब्लॉग लिहायची जोखीम पत्करली. माझा निश्चय तसाच रेटून नंतर हळू हळू वाचकवर्ग वाढला आणि त्यांच्या प्रोत्साहनाच्या शब्दांनी माझ्या लिखाणाला आणखी बळ येत गेलं.  तुम्हा सर्व वाचक मित्रांचे आणि मैत्रिणींचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण तुमच्या प्रोत्साहनाच्या बळावर हा डोलारा उभा राहिला आहे, याचा आनंद मी भरभरून उपभोगला आहे आणि कदाचित भविष्यातही ते कायम राहील. 

पण, कायम कौतुकच होत आलं असंही नाही. माझ्या बऱ्याच मित्रांनी चेष्टेने किंवा गमतीत थोडीशी टवाळी सुद्धा केली पण आपण जे लिहितोय ते आपल्या समाधानासाठी आहे आणि ते प्रत्येकालाच पटेल किंवा आवडेल असं नाही, हे मनाशी ठरवलं होतं.  म्हणून त्यातून शैली सुधारायला मदत करतील अशा गोष्टी लक्षात ठेऊन गमतीकडे काणाडोळा केला. आज वाटतं, त्यांचं मनावर घेऊन हे उपद्व्याप थांबवले असते, तर हा ब्लॉग आज हे यश बघू शकला नसता. 

प्रयत्न आणि सातत्य यांच्या जोरावर ही अहमहमिका सुरु आहे. या शब्दांच्या ढिगाऱ्यात एखादा जरी मोती सापडल्यास मी त्याला या कष्टांचं सार्थक झालं असं समजेन. सर्जनशीलता ही गुलाबाच्या रोपासारखी असते. ते रोप स्वत:च फक्त सुंदर नसते तर त्याची छोटीशी डहाळी खुडून दुसरीकडे लावल्यास तिचं रोप सुद्धा बहरतं आणि तितकंच सुंदर होतं.  काही जण जेव्हा सांगतात की या सगळ्यातून प्रेरणा घेऊन ते लिहू लागले आहेत त्यामुळे ही नवसृजनाची भूमिका सुद्धा तितकंच समाधान देऊन जाते. 

या "आपल्या" ब्लॉगच्या यशाबद्दल आपल्या सगळ्यांचे हार्दीक अभिनंदन आणि माझ्यातर्फे तुमचे खूप आभार.


असाच लोभ असू द्या. 
धन्यवाद.

आपला मित्र,
-विनायक 

६ टिप्पण्या: