शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

स्थित्यंतरं....

कहने को तो घर मेरा पक्का हो गया..
मगर मिट गयी मिट्टी की सौन्धी सी खुश्बू ....!
-अज्ञात

"आमची आय या देवळीत देव पुजायची" चुलीच्या अलिकडच्या बाजूच्या भिंतीतल्या, हाताच्या कोपरा इतक्या उंच आणि तितक्याच रुंद दिवळी (खोबण) कडे हात दाखवत माझ्या वडिलांची आत्या मला तिच्या आईची (आमच्या पणजीची) आठवण सांगत होती. आमच्या गावच्या घरी आली की ती भिंतींना हात लावून बघायची, कदाचित तिला तिच्या आईचा, भावंडांच्या हाताचा स्पर्श जाणवत असावा. ते पाच बहिणी आणि एक भाऊ, इतकं गोकुळ घरात. ती नुकतीच गेली, आणि ते पडायला आलेलं घर सुद्धा, ती जाण्यापूर्वी  आम्ही पूर्ण पाडून नवीन उभारलं. आपल्या भावाच्या मागे आपलं घर राखलं याच्या आनंदात कदाचित त्या घराच्या आठवणीचा ठेवा हरवला याचा तिला विसर पडला असावा. म्हणूनच नवीन घराच्या घरभरणीला तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

जे मी पाहिलेलं ते अजून जसंच्या तसं आठवतं. त्या जुन्या घराच्या भिंती हातभर जाड आणि वरून माती आणि शेणानं लिंपलेल्या. जमीनसुद्धा शेणानं सारवलेली. आतल्या बाजूला चूल तीसुद्धा सारवून बांधलेली. तिच्या जवळच जमिनीत एक खड्डा असलेला दगड जमिनिच्या पृष्ठभागाबरोबर पुरलेला, जेणेकरून त्यातल्या खड्ड्याचा काहीतरी वाटायला उपयोग व्हावा. त्या घराचा जाड आणि वजनदार दरवाजा. त्याला पितळेची गोल तळाहातापेक्षा लहान नक्षीकामाचे शिक्के. आतल्या बाजूला मोठा आडना (कडी). माझी खूप इच्छा होती की तो दरवाजा नवीन घराला लावावा, पण त्याची उंची जेमतेम ५ फुट, म्हणून वापरता नाही आला. आणि त्याच्या याच उंची मुळे कुणी आपल्याच तंद्रीत बाहेर निघाल्यावर चौकट किंवा वरची भिंत डोक्याला लागून डोकं फुटायची पाळी येई.

बाहेरच्या बाजूला सोपा. आमच्या सगळ्या भावकीची (चुलत नातेवाईकांची) घरं अशी एकमेकांना चिकटून उभी, रेल्वेच्या डब्यासारखी. कधी काळी, सगळ्यांचा सोपा सामायिक, एकच लांबलचक. पण मी बघितलेला तेव्हा सगळ्यांनी आपापला पार्टीशन घालून वाटून घेतलेला. पण तरी सगळ्यांच्या घरांचे आडे (छताच्या आधाराचं लाकूड) आणि वर्हांडे सलग आणि एकाच ओळीत. आधीच्या मोठ्या वाड्याचं पिढीदर पिढी वाटण्या होऊन वेळोवेळी वेगळी बिऱ्हाडं झाल्याचे साक्षीदार. वरचं कौलारू छत, ते सुद्धा सगळ्यांचं सलगच. त्यातले आता कुणी आहेत, कुणी दुसरीकडे नोकरीच्या ठिकाणी स्थायिक झाले(आमच्या सारखे). अशा बहुतेकांची घरं भग्न अवस्थेत तशीच आहेत.

नवीन घराच्या चिराच्या भिंती आल्या, शेणानं जमीन सारवायचे कष्ट गेले, आधीच्या पेक्षा अघळ-पघळ जागा झाली, चूल जाऊन किचन ओटा आला, लाकडी देव्हारा आला. पुढेमागे वर वाढेल, गच्ची होईल पण तो आठवणीचा स्पर्श, तो साधेपणा गेल्याची खंत मला कायम राहील. पुढच्या पिढीला तो वारसा बघायलासुद्धा मिळणार नाही. आणि त्यांना माहितही नसेल त्यांनी काय गमावलय?

-विनायक

४ टिप्पण्या: