शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

रेल्वेच्या माझ्या आठवणी...

रेल्वेच्या, विशेषत: मुंबई लोकलच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या याहून वेगळ्या क्वचितच असतील. मी तरी लोकल शिवाय मुंबईची कल्पना करूच शकत नाही. मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहे लोकल म्हणजे. माझ्याही बऱ्याचआठवणी आहेत लोकलशी निगडीत. कॉलेजात आमच्या ग्रुपचा ठरलेला स्पॉट असायचा ग्रांट रोड नाहीतर दादर रेल्वे स्टेशन. अजूनही कुणाला भेटायचं झाल्यास लोकलच्या स्टेशन वर आणि इंडिकेटर खालच्या जागेशिवाय गर्दीतसुद्धा हमखास शोधता येईल अशी जागा नाही. (चुकणारे त्यात सुद्धा चुकतातच)
दिवसाचा असं क्वचितच एखादा प्रहर असेल ज्या वेळी मी मुंबईतल्या लोकलचा प्रवास केलेला नाही. सकाळी साडेचारच्या पहिल्या लोकल पासून रात्रीच्या एक -दीड च्या शेवटच्या लोकलपर्यंत सगळ्या वेळांमध्ये प्रवास करून झाला आहे आणि प्रत्येक वेळेचं थ्रिल वेगळं असतं. असेही दिवस होते ज्यात माझा दिवस सकाळी ५.३८ किंवा ५.४१ च्या लोकलहून सुरु होऊन रात्री ९.५० च्या किंवा १०.०० च्या लोकलच्या सोबतीने मावळायचा. गमतीचा भाग म्हणजे घड्याळातले हे पाचाच्या पाढ्यात न बसणारे आकडे मुंबईकरांशिवाय क्वचितच इतर कोणाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग असतील. बरेच अनुभव दिले आहेत लोकलने, शक्यतो चांगलेच.
आणि लांब पल्ल्याच्या ट्रेन्सचा अनुभव तसं उशिराच आला आयुष्यात. बंगलोरला आल्यानंतर ट्रेनच्या २४ तासांच्या प्रवासाला पर्याय नव्हता. पण तो सुद्धा मी खूप एन्जोय केला आहे. बरेच लोक भेटले, नग म्हणावे असे. आणि माझा स्वभाव असा की माझ्यासोबत बाजूला बसून न बोलता शांत बसणं तसं कठीण आहे म्हणून त्यांच्या आयुष्याची कथानकं आपोआपच उलगडत गेली. त्यांच्यामुळे खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. मध्यंतरी मी एक नवीन ब्लॉग सुद्धा सुरु केलेला "सारे प्रवासी 'गाडीचे'" पण कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक आणि मी तो डिलीटसुद्धा केला. बघू पुन्हा सुरु करता आला तर....
-विनायक

"The more personal you write, the more universal it gets.." हे वपुंचं वाक्य हा लेख वाचल्यावर आणखीनच पटत जातं. हा मृण्मयी रानडे यांचा डिजीटल वर्षा विशेषांक २०१५' मधला लेख खूप नॉस्ताल्जिक करून गेला.. सारे ट्रेन/लोकल प्रवासाचे अनुभव डोळ्यासमोरून झर्र करून निघून गेले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा