सोमवार, १५ जून, २०१५

आमी बी मराटीच हाओत...

आज इथे बंगलोर मधल्या जंबो किंगच्या टपरीवर वडापाव खाताना बाजूला मराठी सारखं काहीतरी कानावर पडलं. एक छोटा मुलगा वड़ापावसाठी हट्ट करत होता आणि त्याचे आई-वडील तेवढयाच निकरानं "नाही" चा किल्ला लढवत होते.
बघितलं तर एक जोड़पं होतं आणि त्यांचा साधारण पाच-सहा वर्षांचा मुलगा... पावसामुळे त्यांनी त्या दुकानाच्या छताखाली आडोसा बघून आश्रय घेतला होता. ते जी भाषा बोलत होते त्याचे शब्द "मराठी सारखे" होते..  त्यांचे शब्द मराठी होते, पण हेल कानडी होता.. भाषा ऐकायला कोंकणीसारखी वाटत होती. निश्चितच माझे कान टवकारले आणि न राहवून मी त्यांना विचारलंच
"तुम्ही शिमोग्याचे की कारवारचे?"
"नाई चित्रदुर्ग..." जरा दचकुन तो माणूस म्हणाला..
"मग कारवारी कोंकणी बोलता ते...?", मी
"कोंकणी नाई, मराटी..."
"बर्र..पण मग चित्रदुर्गला कसे? म्हणजे ते महाराष्ट्रापासून तसं बरंच लांब आहे..."
"आमचं गावचं ते... कर्नाटकात समदीकडे हाएत मराटी लोक... लईsss वर्षापासून"
"हो, म्हणजे काही पिढ्यांपासून बंगलोरमध्ये बरीच मराठी कुटुंब राहतात, हे माहीत होतं मला.. पण हे जरा आश्चर्यच आहे. अजूनही कुटुंब असतील म्हणजे..?"
"हाएत ना.. " इतका वेळ नुसतं स्मितहास्य करत, मुलाला संभाळत, आमचं बोलणं ऐकणारी ती बाई म्हणाली...
"मग मुलाला पण येतं का?" मी त्यांच्या मुलाकडे बघत विचारलं..
"हो...येतं नं.. पन तुमच्या सारकं आमचं मराटी शुद्द नाई.." आता ती बाई स्ट्राइकर एन्डला होती आणि नवरा बॅक फुटवर..
"अहो, त्याचं काही विशेष नाही... मुंबईत तरी कुठे लोकांचं मराठी शुद्ध असतं.. तुम्ही ते अजून जपून ठेवलंय ते महत्वाचं.."
"आमी घरी बी मराटीमदीच बोलतो..याला सगळ मराटी येतं" मुलाकडे हात दाखवत ती बाई म्हणाली...
मी उगंच त्याची तोंडी परीक्षा घ्यावी तसं " बाळा नाव काय तुझं? कितवीला आहेस..?" असं त्या मुलाला विचारलं. माझं मराठी बहुतेक त्याला जड जात असावं. त्याच्या आईनं तोच प्रश्न परत सांगितल्यावर "चिंतन बेंद्रे" आणि "first standard" असं तो मला ऐकू जाईल इतक्या खणखणीत आवजात म्हणाला.. त्या मुलाच्या वडिलांशी माझ्या जुजबी गप्पा सुरु झाल्या आणि मघापासूनचं वडापाव घेण्याचं टुमणं त्या मुलाने परत लावून धरलं. सराईत आई सारखं त्या बाईनं बाहेरच्या खाण्याचे दुष्परिणाम सांगत घरी करुन द्यायचं आश्वासन दिलं. एरव्ही मी सुद्धा मुंबईत असतो तर वड़ापावसाठी 25 रूपये मोजले नसते.
तेवढ्यात पावसाचा जोर कमी झाला आणि मी तिथून त्यांचा निरोप घेतला..
कठीण असतं परगावी आपली भाषा, संस्कृती टिकून ठेवणं. आणि स्वत: जरी ती आयुष्यभर जोपासली तरी पुढची पीढ़ी तो वारसा चालवेलच असं नाही. त्यात हे लोक पिढ्यानपिढ्या तो वारसा जपून आहेत. मराठीत शिकून अमेरिकेत स्थायिक झालेला तरुण जेव्हा मुलाशी एक्सेंटेड मराठीत "डू यु वॉन्ट सम चकली?" असं विचारतो, तेव्हा कीव येते.
परदेशाचं कशाला? मुंबईतच प्रत्येक नवी पीढ़ी नव्या कॉस्मोपॉलीटन मराठीचा शोध लावते आहे. सोईप्रमाणे आठवेल तसं मराठीला हिंदी, गुजराथी आणि इंग्रजीचं ठिगळ लावून अर्वाचीन मराठीची गोधड़ी पांघरली जाते. तशात या अशा मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या लोकांची चिकाटी नक्कीच कौतुकाला पात्र आहे.
-विनायक कांबळे

३ टिप्पण्या:

  1. खुपच छान. परमुलुखात आपली भाषा ऐकली की अजूनच छान वाटतं आणि आपल्याच मुलुखात दोन मराठी आडनावं परकिय भाषेत बोलताना ऐकली की चीड.

    उत्तर द्याहटवा