गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

आमची माती.. आमची माणसं...

बड्या राजकारण्यांचं असलं तरी आमचं गाव तसं खेडंच. तिथे कारखाना आहे, ज्यूनियर आणि डिग्री कॉलेज आहे. पण गावाची परिस्थिती तशी बेताचीच. तिथं गेल्यावर गाडीतून उतरल्या क्षणापासून ही तफावत जाणवते. गावातली लोकं कुणीतरी शहरातलं आलं आहे म्हणून उत्सुकतेनं, कुतूहलानं टकमक पाहत राहतात. ओशाळल्यासारखं होऊन गावातून वाट काढून घर गाठतो. मलाच नाही, थोड्या बहुत फरकाने गावात येणाऱ्या प्रत्येक शहरी माणसाचं हे उत्सुक डोळे असंच स्वागत करतात. लोकांना विलक्षण कौतुक असतं शहरातल्या लोकांच्या राहणीमानाचं.

तसा मला लोडशेडिंगचा तिथे फारसा त्रास होत नाही, कारण टीव्ही मी फारसा पाहत नाही आणि तिथं गेल्यावर काही काम नसतं म्हणून कॉम्पुटर वगैरेचा पण प्रश्नच नसतो. कुणाच्या घरी गेल्यास खाली काही अंथरल्या शिवाय बसायला माझी हरकत नसते. पाणी थंडच असावं असा आग्रह नसतो. पण तरीही उठसूट काहीही झाल्यास "तुम्ही काय मुंबईचे ? तुम्हाला याची सवय कुठे असेल? असं म्हणून बसायला काहीतरी अंथरलं जातं. खाण्याची प्लेट आधी येते आणि मग या डायलॉगसोबत चमचा दिला जातो. एसटीत शेजारचा माणूस माझ्या बॅगेला अडकलेली कोल्ड्रिंकची बाटली बघून "गावाकडं लईच उकाडतं नव्हं ?" असा मिश्कील हसत संवाद सुरु करतो. संध्याकाळी नदीकडे मी फिरायला गेल्यावर एखादा ओळखीचा भेटलाच किंवा ओळख नसेल तर ओळख काढून "काय? इवनिंग वाक् का?? असा प्रश्न विचारला जातो. त्यांचा हेतू प्रांजळ असतो पण त्यांच्या दृष्टीनं शहरातल्या (विशेषत: मुंबईतल्या) लोकांचं राहणीमान कसं विलासी आहे, हेच त्यातून मला वारंवार जाणवतं. 

गावात हल्ली लोकांनी दुमजली घरं बांधली, घरी फ्लॅट टीव्ही आणि हातात महागडे मोबाईल आले असले तरी एकूणच लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारलाय असं मी म्हणणार नाही. कारण शैक्षणिक परिस्थिती काही सुधारलेली दिसत नाही. नाही म्हणायला त्यातली काही मुलं इंजिनिरिंग किंवा अगदी मास्टर्स पर्यंत शिकतायत पण  शिक्षण घेऊन प्रगती करणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके. आणि त्यांच्याकडून सामाजिक बांधिलकीची जाणीव नगण्य. म्हणून इतर समाज "जैसे थे" आणि त्यामुळे शिक्षणाचं महत्व अजून तसं भिनलेलं नाही. गावातली शाळकरी मुलं सुद्धा फेसबुक वर उगवली खरी, पण दिवस उगवताच "good morning friends" आणि रात्री झोपण्याआधी "good night friends" या व्यतिरिक्त इंटरनेटचा सकारात्मक वापर त्यांना कळलेला नाही. फार-फारतर बड्या राजकारण्यांपासून गल्ली बोळातल्या दादा -भाई वगैरेंची पोस्टर्स शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापर्यंत मजल. अर्थात याचं प्रमाण शहरातही आहेच, पण ते गावाकडे प्रकर्षाने जाणवतं हेही तितकंच खरं. शहरातल्या लोकांचे हे अवगुण गावातल्या जनतेने फार पटकन आत्मसात केले. अपवादाने एखाद दुसरा काही समाज प्रबोधन, संघटन आणि तत्सम धोरणी कामं करताना दिसतो. खरंतर, लोकांच्या याच फेसबुकशी लगेच जोडलेल्या नात्याचा वापर करून त्याच्यात शैक्षणिक आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आणि विधायक जाणीव (constructive awareness) निर्माण करण्यासाठी सकारात्मक उपयोग केला जाऊ शकतो.

आपल्याला न मिळालेल्या गोष्टीचा हेवा वाटणं हा मानवी स्वभावच आहे. म्हणून खेड्यातल्यांना शहराच्या सुब्ब्तेचं आणि शहरातल्यांना गावातल्या निवांत वातावरणाचं अप्रूप वाटणं हेही साहजिक आहे. "देऊळ" चित्रपटात नाना पाटेकरच्या तोंडी एक वाक्य आहे "तुम्हा शहरातल्या लोकांना खेड्यातल्या लोकांनी नेहमी शेणामुतातच राहावं असं वाटतं" हा गंड प्रातिनिधिक असावा असं मला वाटतं. थोड्या बहूत फरकाने जे शहराचा हेवा करतात त्याच्या मनात ते शहरी लोकांना असंच जोखत असावे. जर खेडी शहरांप्रमाणे विकसित झाली तर शहरी लोकांना अभिमान करण्यासारखं काही उरणार नाही, असं त्यांना वाटत असावं. पण खऱ्या अर्थाने विकास सोबत बकाली घेऊन येतो हे फार थोड्या लोकांना उमगतं.

-विनायक कांबळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा