शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

दुष्काळाच्या गावी उरे आसवांची ओल....

एक एका थेंबा साठी, जीव गेला खोल
अन उन्हाच्या सावलीचा झुकलेला तोल
पिण्या पाणी नाही, लावी आभाळाला बोल
दुष्काळाच्या गावी उरे आसवांची ओल....

भेगाळली भुई मागे वरुणाचा फेर..
कातळात तिच्या घाव, जिव्हारी कोरड
कसा फुटो पान्हा, तिच्या आतड्याला पिळ
वाळलेल्या मायेपरी काळजाला घोर

सुना सुना गाव, दाही दिशांना पांगला
कोरडी झोपडी तैसा कोरडा बंगला
वासरा जगाया देती छावणी आधार
परी माणसाच्या जीवाला मोल नसे फार

अरे दुष्काळा दुष्काळा, तुझा झाला रे कोळसा
गुरापरी गुरं मेली, मारले लेकरा-माणसा
कसा देव तो निर्दयी डोळा कातडे ओढितो
टाचा घासून जीवाचा त्याला मृत्यू बघवतो

-संतोष-विनायक

1 टिप्पणी: