शनिवार, २८ मार्च, २०१५

राम-राम...

आमच्या पिढीला रामाची जी काही माहिती आहे ती बहुतांश रामानंद सागर यांची कृपा. रामच काय? कृष्ण, पांडव हे सुद्धा टीव्हीच्या मालिकांमधून आधी नायक म्हणून भेटले आणि मग त्याचं देवत्व कळलं. अजूनही मला राम म्हटलं की अरुण गोविल आणि सीता म्हणून दीपिका चा चेहरा नजरेसमोर येतो. सुदैवाने त्यांच्या आणखी कुठल्या भूमिका तितक्या गाजल्या नाहीत आणि त्यांची ती राम-सीतेची प्रतिमा तशीच कायम राहिली.

आमच्या बालपणी (९० च्या दशकात) टीव्ही मालिका दर्जा राखून होत्या आणि मालिकांमधल्या कलाकारांना तेवढं वलय (ग्लॅमर) नव्हतं. म्हणूनच कदाचित भड़क मेकअप आणि भव्य सेट पेक्षा मालिकेच्या एकूण साधेपणात सुद्धा खूप अभिरुचीमूल्य होतं. आताची त्या तोडीची मला कुठलीच पौराणिक मालिका आठवत नाही. जय मल्हार मालिकेच्या काही भागांचा खेळ खंडोबा बघवला नाही आणि तो नाद सोडून दिला. (नशीब दिग्दर्शक महेश कोठारे त्यात खंडोबाला "डॅम इट" करायला नाही लावत)

असो, गमतीचा भाग सोडला तरी साधारण १५-२० वर्षापूर्वीच्या मालिकांसारखा त्यात साधेपणा आणि विषयाचं गांभीर्य दिसत नाही. एकंदर काही "राम" राहिलेला नाही. आणि आधी राम नवमी वगैरे सण कधी येऊन जायचे कळायचं सुद्धा नाही. आजकाल कॅलेंडर बघायची गरज पडत नाही. watsapp आणि फेसबूकमुळे सगळे दिनविशेष समजतात. काही कर्तव्यतत्पर मित्र निरपेक्ष वृत्तीने हे समाजकार्य करत असतात. आजचा हा सगळा स्टेट्सप्रपंच त्यांच कारणाने. नाहीतर एरव्ही "राम-राम" करायलाही वेळ नसतो.. :)

-विनायक कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा