शनिवार, २१ मार्च, २०१५

चैत्रपालवी...

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका.......
-केशवसुत

कवी केशवसुतांच्या या चार ओळी ओळींमध्ये सगळ्या मनुष्य जीवनाचे सार दडलंय.
माणसाने कॅलेंडर बनवले, ते वेळेचं नियोजन करण्यासाठी. वार, दिवस, वेळ बघून कामं आखणारा माणूस हळूहळू याच घड्याळ्याच्या आणि कॅलेंडरच्या तालावर नाचू लागला. आणि मग काय? प्रत्येक गोष्टीत नाविन्य शोधणारा माणूस, मग याच कॅलेंडर मधले असे काही दिवस शोधतो की, ज्याने त्याला त्याच्या रोजच्या व्यवहारातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करायची संधी मिळेल. त्यातच मग कॅलेंडर बदलायचं म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीचं आणि पहिल्या तारखेचं कौतुक सुरु झालं.

जितक्या भाषा, जितके धर्म, तितके पंचांग आणि तितकीच वर्षातून वेळोवेळी येणारी नवीन वर्षाची पहिली तारीख. विचित्र आहे नं ? कोणाचं १ जानेवारीला, कोणाचं गुढीपाडव्याला (मराठी; कानडी आणि तेलुगु मध्ये उगाधी ), कोणाचं १४ एप्रिल ला (बंगाली, तमिळ ), दिवाळीचा पाडवा (गुजराथी आणि बहुतांशी उत्तर भारतात), मोहरम (मुस्लिम), पारसी नवरोज... आणखी इतर किती असतील कोणास ठाऊक?  असो, सांस्कृतिक समृद्धतेची देणगी आहे ही असंच म्हणायला पाहिजे.

हल्ली १ जानेवारी आणि त्याच्या साधारण महिनाभर आधी "मराठी आहे, मराठीच राहणार.... नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुडीपाडव्यालाच देणार" असे मेसेज फिरत असतात... असो, काही आंग्लद्वेषी लोक तोंडसुख घेण्याची संधी सोडत नाहीत. आज घडीला आपण आपला रोजचा दिनक्रम त्याच ग्रेगोरियन कॅलेंडरच्या बरहुकुम बजावत असतो. मग त्याला टाळून कसं जमेल? असो, काहीही असलं तरी, त्या मेसेज मधल्या आशयाप्रमाणे पाडव्याचं पावित्र्य आणि मांगल्य इतर नववर्षांना क्वचितच लाभतं. इतर सणांसारखं अजून तरी पाडव्याला ग्लॅमर मिळालेलं नाही आणि तसं ते न मिळो हेच चांगलं एक अर्थानं. नाहीतर डीजे संस्कृती आणि हिडिस पार्टयांनी वसंत ऋतूची पहाट असह्य व्हायची....

येतं नविन वर्ष सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराटीचं जावो... सर्वांना गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा