शुक्रवार, ६ मार्च, २०१५

एक संवाद उगवत्या ताऱ्यांसोबत....


प्रश्न तसा साधा होता की, "तुम्ही आमच्या शाळेत येऊन मुलांना मार्गदर्शन कराल का?" पण त्या अनाहूत आमंत्रणाने मला गोंधळात टाकलेलं. त्याचं कारण हेच, की मी आजपर्यंत ज्यांच्याशी संवाद साधत आलो तो वर्ग (महाविद्यालीयीन विद्यार्थी) आणि हा आगामी श्रोतावर्ग (प्राथमिक शाळेचे विद्यार्थी) यांच्यात बरंच अंतर होतं. अंतर तसं फक्त वयाचंच नाही, त्या दहा-एक वर्षांमुळे अंतर होतं त्यांच्या बुद्धिमत्तेत, त्यांच्या आकलनशक्तीत आणि अंतर होतं त्यांच्या जिज्ञासेत. महाविद्यालयीन मुलांचे प्रश्न साधारण नोकरीच्या संधी आणि उच्च-शिक्षणाच्या वाटा जाणून घेणारे व्यावहारिक प्रश्न असतात, तर या छोट्या मेंदूमध्ये जगभराचं कुतूहल असतं आणि त्याची उत्तरं ते शोधत असतात. त्याच्यामुळे ह्यांच्याशी काय बोलायचं आणि त्यांचे प्रश्न कसे असतील याची उत्सुकता-वजा-धास्ती होती, कारण लहान मुलांच्या शंकेचं समाधान करणं तसं सोपं काम नसतं. तरीही मी, एक धाडस आणि नवीन अनुभव म्हणून ते स्वीकारलं आणि सगळ्यांच्या सोयीच्या दिवशी एक वेळ ठरली.दुपारची शाळा भरलेली, तिसरी आणि चौथीचे वर्ग होते. मी पोहोचताच सर्व शिक्षकांनी त्यांचे वर्ग थांबवून मुलांना खाली शाळेच्या आवारात एकत्र बसवायची लगबग सुरु झाली. मुलंच ती, त्या संधीचा फायदा घेत जमेल तेवढा गोंधळ करत एक-एक मजले उतरत होते. बहुतेक मारामारीसारखे बिकट प्रसंग टाळण्यासाठी त्यांना हात डोक्यावर ठेवून ओळीने उतरायची शिस्त घालून दिली होती, पण तरीही आपल्या बालस्वभावाला जागत ती मुलं करायची ती मस्ती-टवाळी करतच होती. आणि इतक्या सगळ्या पन्नासेक मुलांना आवरत ५-६ शिक्षिकांनी त्यांना व्यवस्थित बसवलं. कधी प्रेमाने, तर कधी वेळप्रसंगी ओरडून, कधी पट्टीचा धाक दाखवून ह्या अतिउत्साही वर्गांना आवरण्याचं त्यांचं कसब त्यांच्या सहज वावरण्यातून दिसत होतं. त्यांना हे नेहमीचं होतं आणि माझ्यासाठी हे सगळंच नवीन होतं. 

आशाताई गवाणकर प्राथमिक विद्यालय ही शाळा गोरेगाव पूर्व, मुंबई येथे आहे. मराठी माध्यमाच्या शाळा कमी होत असतानाच्या काळात, मराठी माध्यमाची आणि दर्जा राखून असलेली अशी ही शाळा आहे. आणि त्यामुळेच कदाचित शाळेची पटसंख्या अजूनही बऱ्यापैकी आहे. म्हणजे इतर मराठी माध्यमाच्या शाळांना लागलेल्या "गळती" ची समस्या इथे आहे असं मला जाणवलं नाही. शेजारीच त्यांच्याच संस्थेची नंदादीप विद्यालय ही माध्यमिक शाळा आहे. माझ्या बहिणीचा मुलगा (भाचा) याच शाळेत दुसरी इयत्तेत शिकत असल्याने त्याच्या कडून माझी माहिती त्याच्या बाईंपर्यंत पोहोचली आणि त्यांनी मग हा कार्यक्रम जुळवून आणला.

शाळेतले शिक्षक हौशी आणि उत्साही आहेत, तसेच सतत मुलांनी काहीतरी नवीन शिकावं यासाठी धडपड करत असतात. मुलांना पुस्तकी ज्ञानाखेरीज बाकीच्या जगाची माहिती व्हावी, व्यवसायाच्या रुळलेल्या वाटांशिवाय कला, क्रीडा आणि इतर गोष्टींची माहिती व्हावी म्हणून अशा विविध क्षेत्रातल्या लोकांना बोलवून मुलांशी त्यांचा संवाद घडवून आणण्याचं काम या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भोसले बाई आणि इतर शिक्षकवृंद नियमाने करत असतात. आजवर असे कबड्डीपटू, छायाचित्रकार आणि विविध क्षेत्रातली मंडळी या मुलांशी गप्पा मारून गेली होती आणि त्याच कारणासाठी त्यांनी आज मला तिकडे बोलावलं होतं. मुलांना विज्ञानाची ओळख व्हावी, संशोधन म्हणजे नेमकं काय?  ते करण्यासाठी काय करावं लागतं इत्यादी गोष्टी मुलांना कळाव्यात असा त्यामागे प्रांजळ हेतू होता .

साधारण ६ ते ९ या वयोगटातली मुलं. आता कुठे त्यांना विज्ञान शिकवायला सुरुवात झालेली असते आणि त्यांच्यासमोर त्यांच्या निरीक्षणात आलेले असे हजारो प्रश्न असतात. त्यांच्याकडून ते प्रश्न काढून घ्यायचे म्हणजे त्यांना बोलतं करायला पाहिजे होतं. एरव्हीचा एकतर्फी संवाद इथे उपयोगाचा नव्हता हे ओळखून मी त्यांना काही सांगायला न जाता, त्यांचं ऐकायचं ठरवलं आणि मग जमलंच तर आपलं काहीतरी सांगायचं. आधी म्हटल्याप्रमाणे बी. एस. सी. आणि एम्. एस. सी. च्या  विद्यार्थ्यांचं कुतूहल खूप वेगळं असतं. त्यांना एकंदर शैक्षणिक वाटचालीबद्दल जाणून घ्यायचं असतं. व्यवसाय आणि नोकरीच्या संधींबद्दल माहिती हवी असते आणि असलाच एखाद दुसरा जिज्ञासू तर तो चुकून एखादा तांत्रिक प्रश्न विचारतो विज्ञानाशी निगडीत. ह्या वयातली मुलं म्हणजे अजून पैलू न पडलेले हिरे असतात, जसजसं त्याना पैलू पडतात, त्याना चकाकी येत जाते.
बाईंनी माझी ओळख करून दिली आणि सूत्र माझ्याकडे सोपवली. सुरुवातीचे नमस्कार-चमत्कार वगैरे झाल्यावर केवळ त्यांच्या माहितीचा अंदाज घ्यायला म्हणून प्रश्न केला "विज्ञान कशाला म्हणतात ?" मला उत्तराची अपेक्षा नव्हती, पण त्यांच्याकडून काहीही उत्तर आलं असतं तर आनंदच झाला असता. मग पुढचा प्रश्न "यंत्र (machine) म्हणजे काय?" किंवा साध्या यंत्राचं एक उदाहरण. हा त्यांच्यासाठी थोडा सोपा प्रश्न होता. कुणी तरी हात वर केला आणि सांग म्हटल्यावर उठून उभा राहत दबक्या आवाजात म्हटलं "संगणक"...  साधं नसलं तरी यंत्र होतं. त्याला शाबासकी दिली. मुळात साध्या गोष्टींना आपण गृहीत धरतो, त्याने त्याच्या आजूबाजूच्या साध्या वस्तू सोडून एकदम संगणकापर्यंत उडी मारली होती. चाक, सुई किंवा कर्कटक किंवा तत्सम काहीही याचं उत्तर होऊ शकलं असतं. मी कात्रीचं उदाहरण दिल्यावर त्यांना त्याचं आश्चर्य वाटलं की हे कसं यंत्र असेल?

पण त्याच्या त्या उत्तरानं मला हवं ते साध्य झालं. भीड चेपली, त्यांची आणि माझीही. त्यांच्यातून ह्या पहिल्या उत्तराने पुढची औपचारिकता गळून पडली. पुढे विज्ञानाचे प्रकार आले. "भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र". मुलांना प्राणी आवडतातच आणि माहितीतलेही असतात, त्यामुळे जीवशास्त्र काय असतं, हे सांगणं तसं कठीण नव्हतं. प्राणी पाहणं कित्येक मुलांचा आवडता छंद असतो. त्यांच्या वेगवेगळ्या जाती ओळखणं त्यांचं वर्गीकरण करणं हेसुद्धा विज्ञान आहे, ही गोष्ट त्यांना नवीन होती. रसायनशास्त्रासाठी औषध-गोळ्यापेक्षा चांगला पर्याय माझ्यासमोर नव्हता. रसायनशास्त्रज्ञ नवनवीन रसायनांचा शोध लावतात वगैरे वगैरे. खरी कसरत भौतिकशास्त्र काय असतं हे सांगताना झाली. "न्युटन हे नाव ऐकलंय का?" असं विचारल्यावर एक हात वर आला, आणि उठून तो काहीतरी पुटपुटला जे मला आता नीटसं आठवत नाही पण ते थोडसं हास्यास्पद होतं. असो, गाडीला थांबवायला काय करावं लागतं? ब्रेक दाबावे लागतात. त्याशिवाय चालणारी गाडी थांबते का? नाही. असं सोप्या शब्दात न्युटन मी त्यांच्यासमोर मांडला. भौतिकशास्त्राची व्याप्ती इतकी आहे की एक-दोन उदाहरणात ते सांगता येणं कठीण. सूक्ष्मातीसूक्ष्म प्रोटोन-इलेक्ट्रोन पासून अतिप्रचंड ग्रह-ताऱ्यांपर्यंत भौतिकशास्त्र अवाढव्य पसरलेलं आहे. असो. त्यांना थोडक्यात याची ओळख सांगितली आणि त्यांच्या काही शंका असतील तर त्या विचारायला सांगितल्या.

हा शंकानिरसनाचा कार्यक्रम चांगला एक-दीड तास रंगला. समुद्राच्या पाण्यापासून, चंद्र-सूर्य ग्रहण, मासे कसे निर्माण झाले, दोन झाडं वेगवेगळी का दिसतात, झाडं हिरवीच का असतात इथपासून एकदम "दीर्घिका म्हणजे काय आणि त्या कशा तयार होतात?" इथपर्यंत. मला थोडा हा आश्चर्याचा धक्का होता एका ३री/४थी च्या मुलाला "दीर्घिका"वगैरे शब्द माहित होता. मी त्याला शाबासकी द्यायला विसरलो नाही. कारण बाकीच्या प्रश्नांमध्ये एक सामायिक धागा होता, की ते फक्त निरीक्षणावर आणि कुतूहलावर आधारित प्रश्न होते. असे प्रश्न कमी-जास्त फरकाने प्रत्येकालाच पडतात, पण त्याने बहुतेक हा  शब्द कुठेतरी वाचला असावा किंवा ऐकला असावा. आणि एकदम लक्षात ठेऊन तो विचारलं म्हणून त्याचं विशेष कौतुक वाटलं.

हे सगळं चालू असताना मजा येत होती, मुलांना आणि मला सुद्धा. गंमत म्हणजे प्रश्न विचारायला उभं राहून उगीचच काहीतरी बोलणे. "आम्ही फिरायला गेलेलो, तिथे अमुक झालं वगैरे". त्यात प्रश्न कुठेच नसायचा. मी त्यात काहीतरी त्यानं टिपलेलं विज्ञानाशी निगडीत निरीक्षण शोधायचा प्रयत्न केला, पण तेही नाही. किंवा एखाद्यानं विचारलेला प्रश्न पुन्हा विचारणे. एकमेकांच्या खोड्या काढणं तर चालू होतंच, पण मध्येच त्यांनी कार्यक्रम रंगत आलेला बघून गोंधळ गोंगाट करायला सुरुवात केली. मग मुख्याध्यापिका बाईंनी एक दम भरताच सगळे पुन्हा शांत. मग त्यांनीच एकेकाला दमात घेत ज्यांना संधी नाही मिळाली त्यांना उभे केलं "हा तू.. तू विचार?" "बस खाली" वगैरे वगैरे... आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत त्यांनी पुन्हा गाडी वळणावर आणली. शेवटचे काही प्रश्न घेतले. त्यांच्या सांगण्यावर मुलांनी नेहमीच्या शिस्तीत हात वर करून आभार व्यक्त केले आणि कार्यक्रम संपन्न झाला...

शाळेच्या संस्थापिका : आशाताई गवाणकर 
मुलांनी बनवलेलं शुभेच्छापत्र
शाळेचं छोटेखानी ग्रंथालय 
कार्यक्रम संपवून मुलं वर्गात परत जातात तोच मधल्या सुट्टीची घंटा झाली. सगळीकडे एकच गोंगाट झाला. मी त्यांच्या वर्गांतून एक फेरी मारली, ते डबे सोडून त्यांनी काढलेली चित्र, विज्ञानाचे प्रकल्प (प्रोजेक्ट), कलाकुसरीच्या वस्तू वगैरे आवर्जून दाखवू लागले. सगळ्या शिक्षकांनी अभिप्राय आणि आभार प्रकट करत मुलांनीच स्वहस्ते बनवलेलं शुभेच्छापत्र आणि छोटसं पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या. शाळेतलं ग्रंथालय म्हणजे एक छोटसं कपाट आणि त्यात एक शे-दोनशे पुस्तकं. मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून वेगवेगळ्या विषयाची त्यांना आवडेल अशी पुस्तकं जमवलेली आणि वाचनासाठी विशेष तास ठरवलेला. त्याच्यावर एक नजर फिरवली. शाळेतल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळा शक्य तेवढी मदत करते. काही शिक्षक स्वखर्चातून काही मुलांचं शिक्षण घडवतात. ज्यांच्या पालकांना काहीही चिंता नसते अशांचं, मुलांनी शिकावं या उदात्त हेतूने  स्वत: पदरमोड करून शिक्षण सुरु ठेवतात. स्वत: मुख्याध्यापिकाबाईं अशा ४ मुलांच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी घेऊन आहेत. त्यांच्या  निस्वार्थ आणि सेवाभावी कर्तव्यदक्षतेचा मनोमन खूप आदर वाटला. 

ज्या गोष्टीचं सकाळपासून दडपण आलेलं ती हा-हा म्हणता संपली आणि ह्र्दय आठवण ठेवून गेली. ह्या मुलांशी संवाद हा खूप वेगळा आणि प्रेरक अनुभव होता माझ्यासाठी. भविष्यात असे संवाद वारंवार घडत राहोत असंच वाटून गेलं. त्यांच्या निरागसतेत, कुतूहलात आणि चौकसपणातून खूप शिकण्यासारख्या गोष्टी वाटल्या. हा संवाद त्यांच्यासाठी किती फायद्याचा झाला माहित नाही पण त्यातून प्रेरणा घेऊन एकाने जरी वेगळी वाट चोखाळली तरी मी त्या संवादाचं यश समजेन, कारण एकंदर आपल्या समाजात विज्ञान आणि संशोधकांबद्दल एक अनभिज्ञता आणि अनास्था आहे. किमान ह्या नव्या पिढीला तरी आपण तो वारसा हस्तांतरित करायला नको इतकीच अपेक्षा.


 


४ टिप्पण्या: