शनिवार, २४ जानेवारी, २०१५

अरबांच्या देशात... भाग ९ (शेवटचा भाग)

एव्हाना अरबांच्या देशातून गाशा गुंडाळायची वेळ आली होती. शेवटचा दिवस शिल्लक होता. संध्याकाळी कॉन्फरन्स डिनर आणि दुसऱ्या दिवशी दुपारी परतीचा प्रवास. 
सगळ्यांना डिनरची उत्सुकता लागून राहिली होती. कारण ही शाही दावत होती. खुद्द शेखच्या (तिथल्या राजाच्या) महालात. या कॉन्फरन्सच्या नियमित वाऱ्या करणाऱ्या लोकांना त्याचं नाविन्य नव्हतं. खरंतर, असे दरवर्षी येणारे मोजकेच. पण माझ्या सारख्या बऱ्याच "पहिलटकर" लोकांना त्याचं कोण कौतुक!! सगळ्यांना सूचना करण्यात आल्या होत्या. आपापले बॅच जवळ बाळगा. त्या शिवाय पॅलेसमध्ये प्रवेश मिळणार नाही. तयार होऊन पाच वाजता अमुक ठिकाणी या. तिथून बसेस सुटतील वगैरे वगैरे... 
तसं दुपारी जेवण झाल्यानंतर काही कार्यक्रम नव्हता. म्हणून आम्ही निवांत फिरून वेळेच्या तासभर आधीच सांगितलेल्या ठिकाणी पोचलो. बऱ्यापैकी माणसं होती (आमच्या सारखी उत्सुकतेनी प्राण कंठाशी आलेली) आणखीही बरीच माणसे अजून यायची होती. सगळे जमल्याशिवाय काही गाड्या इथून हलणार नव्हत्या.  
सगळं कसं वेळेप्रमाणे पद्धतशीर रित्या चाललं होतं. आम्हीच तिथे वेळेच्या आधी जाउन उभे होतो. आणि तेही साध्या "अवतारात". बाकीचे लोक एकदम सूट-बूट आणि चकाचक तयार होउन आले होते. आम्हाला स्वत:च्या करंटेपणाची लाज वाटली खरी, पण ती फार वेळ टिकली नाही. नंतर आम्ही गप्पांमध्ये ते कधीच विसरून गेलो.
थोडीफार लोकं जामायला सुरुवात झाली होती.  एक मागोमाग एक अशी बऱ्याच बसेस ची रांग लागली. जेमतेम 8-10 माणसे बसतील अशा मिनी बस होत्या. लोकं जागा मिळेल तिथे बसले. आमच्या बसमध्ये मी, सत्यजीत, प्रीती, अब्बास, यासीन आणि इतर कुणी होते. यासीन आणि अब्बास मधल्या वेळात जवळच्या मॉल मध्ये खरेदीला गेले होते. तो त्याच्या खरेदीचा किस्सा सांगत होता. त्याने आपल्या होणाऱ्या बायकोसाठी गिफ्ट घेतलं होतं. आणि तो कुठेही गेला तरी तिथून काहीतरी भेटवस्तू नेतोच. "म्हणजे न्यावीच लागते नाहीतर बायकांचा स्वाभाव तुला माहितच आहे" असं तो गमतीनं म्हणाला. आणि मुख्य म्हणजे त्याच्या या विनोदावर प्रीतीलाही हसू आलं. एक प्रकारे बायकांच्या स्वभाव वैशिष्ट्याला एका स्त्री कडून मिळालेली ती दाद होती.
एव्हाना आमच्या बोलण्यात आम्ही रस-अल- खैमाह शहरात कधी दाखल झालो होतो, आमचं आम्हालाच कळलं नव्हतं. तसं छोटंसं शहर होतं. पण सगळीकडे रस्त्याच्या दुतर्फा मॉल आणि तत्सम दुकानं होती. त्यातनं गाड्या त्या शहरात असलेल्या एका छोट्या टेकडी कडे गेल्या. त्या टेकडीवर शेखचा राजवाडा होता. शिस्तीत सगळ्या गाड्या राजवाड्याच्या प्रांगणात शिरल्या. इथे गेट असला तरी अजून राजवाडा तसा लांबच होता. आणि मुख्य द्वाराजवळ गाड्या थांबल्या. सगळे उतरले आणि ओळीने त्या महालात शिरले. सगळीकडे ते खास पांढऱ्या रंगाचा अरबी पायघोळ सदरे घातलेले सेवक उभे होते. अत्यंत प्रशस्त हॉल आणि नाजूक कलाकारीने सजवलेल्या भिंती. विशिष्ट अशी अरबी ओळख जतन करून होतं ते सगळं. आम्हाला ५०-६० जणांना आदराने एका हॉल मध्ये नेवून बसवलं. आणि मग त्या ८-१० सेवकांचा चमू हातात "अलीफ लैला" मध्ये दाखवायचे तश्या प्रकारच्या पितळेच्या मोठ्या नक्षीदार सुरया आणि चीनी मातीचे छोटे छोटे पेले घेऊन आले. आणि प्रत्येकाला त्यातली कॉफी ओतून द्यायला लागले. आधीच मला कॉफीची चव कडू लागते आणि फारशी आवडत नाही. त्यात ह्यांनी दिलेली बिनदुधाची काळी कॉफी म्हणजे विषासारखी कडू. (मी विष पिऊन बघितलेलं नाही. उगाच पांचट विनोद नको. असं म्हणायची पद्धत असते) असो, तरी आपला याला नकार देणं त्या शेखला कदाचित त्यांचा अवमान वाटू नये म्हणून मी ती कॉफी कशी-बशी संपवली.
 खरंतर त्या दिवशी शेख काही कामासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचा मुलगा (राजपुत्र / प्रिन्स) आमचं स्वागत करणार होता. थोड्याच वेळात तो प्रिन्स त्याच्या सेवकांसोबत आला. त्यांच्या गर्दीत तो उठून दिसत होता कारण बाकीच्यांच्या डोक्यावर सफेद कापड तर त्याच्या लाल चौकटया असलेलं कापड होतं. तो येऊन मध्यभागी उभा राहीला आणि प्रत्येक जण आळीपाळीने त्याच्यापाशी जाऊन हस्तांदोलन करून येत होते. मग त्याने थोडंसं जुजबी भाषण केलं आणि त्याच्या शेजारी बसलेले मोठ-मोठे वैज्ञानिक आणि या कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या इतर लोकांची भाषणं झाली. या कॉन्फरन्स करता आर्थिक मदत केल्याबद्दल आभार व्यक्त केले गेले.औपचारिक कार्यक्रम यथासांग पार पडला आणि सगळ्यांना जेवायला वेगळ्या हॉलकडे घेऊन जाण्यात आलं. आधीच्या इतक्याच मोठ्या हॉल मध्ये सगळी जेवणाची मांडामांड झाली होती. सगळे सेवक पाहुण्यांची वाट बघत उभे होते. सगळं दृश्य बऱ्यापैकी रंगीबेरंगी दिसत होतं. एकूणच सगळ्या रचनेला आणि वस्तूंना नक्षीदार नजाकत होती. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या समोर एकावर एक अशी तीन ताटांची (प्लेट्सची) उतरंड रचली होती. माझ्यासाठी तो प्रकार काहीसा नवीन आणि विचित्र होता. प्रिन्स बसताच सगळे बसले आणि लगेचच त्या सेवकांनी वाढायला सुरुवात केली. सरबतापासून सुरुवात झाली. आणि मग मुख्य जेवणात (ज्याला इंग्रजीत मेंन कोर्स असं म्हणतात) बऱ्याच प्रकारचे पदार्थ होते पण शकतो सगळेच पदार्थ मांसाहारी प्रकारात मोडणारे होते. त्यामुळे शाकाहारी लोकांची चांगलीच कुचंबना झाली होती.  त्याना सॅलड वर भागवावं लागत होतं. आणि  जे आग्रही शाकाहारी नव्हते ते बिर्याणी मधलं मांस बाजूला करून भात खाऊन भागवत होते. पण असे लोक खुपच कमी होते. आणि प्रत्येक नवीन पदार्थ वाढतेवेळी ते वाढपी प्लेट उचलून न्यायचे तेव्हा मला त्याचा उलगडा झाला की यांनी अशी प्लेट्सची चळत का रचली होती.


त्या सेवकांमध्ये एकाची सत्यजीतशी ओळख झालेली. सत्यजीत बंगाली तर तो सेवक बांग्लादेशी होता. मैग तो सेवक आमच्या आसपासच घुटमळत होता आणि सरबराई करत होता. सत्यजीतने त्याला सांगून आमच्यातल्या एका शाकाहाऱ्याचा बंदोबस्त केला होता. तो मिळेल ते शाकाहारी पदार्थ त्याला आणून द्यायचा पण त्याचापण नाईलाज होता कारण सलाड़ सोडून बाकी देण्यासारखं काही नव्हतंच.
जेवणं कशी-बशी उरकली. आणि फ़ोटो वगैर सोपस्कर करून मंडळी वाटेला लागली. आदर्श यजमानाप्रमाणे प्रिंस पाहुण्यांची रुखसती करायला दारापर्यंत आला. एव्हना बऱ्यापैकी उशीर झाला होता. लोकं मिळेल त्या बस मध्ये बसून हॉटेलपर्यन्त आले. आमची गँग तशीच एकत्र होती. परत येऊन एक एक जण आपल्या खोलीकड़े पांगला.
उद्या प्रत्येकची निघायची वेळ ठरलेली होती. माझं मुंबईचं विमान संध्याकाळी 4 ला होतं. शेरिफ़चं सुद्धा साधारण त्याच वेळी होतं म्हणून आम्ही 12 च्या शटल ला नावं नोंदवली होती. प्रिती अबू धाबी ला तिच्या अंकलकड़े जाणार होती. सत्यजीतचं विमान पण रात्री उशीरा होतं. अब्बासचा दिवसभर दुबई फिरून रात्रीच्या विमनाने जायचा प्लान होता. त्याने बुर्ज खलीफाचं त्या दिवशीचं तिकीट सुद्धा काढलेलं. (हो! बुर्ज खलीफा मध्ये सगळ्यात वर जाऊन वरुन जग बघायचं तिकिट असतं. ते ऑनलाईन काढ़ावं लागतं आणि त्याचं तिकीट मिळणं खूप कठीण असतं. बरेच दिवस आधी बुक करावं लागतं. ह्या गोष्टी मला तिथं गेल्यावर कळाल्या :( )
परतीचा दिवस उजाडला आणि आवराआवर करून ठरलेल्या शटलने निघालो. आधी टर्मिनल 3 ला शरीफ उतरला. खुदा हाफिज... शुक्रान... वल्लाह... हबीब... वगैरे सगळ झालं. पुढे टर्मिनल 2 ला लेबनॉनच्या मुलींचा ग्रुप उतरला. त्या सगळ्या मुली कायम हिजाब मध्ये असायच्या. त्यातल्या एकीला काल बेस्ट पोस्टर अवॉर्ड मिळालेलं. तेव्हा तिचं अभिनंदन करायला म्हणून मी हात पुढे केलेला तर तिने खुपच केविलवाणा चेहरा करत एकदम अदबिने हात मिळवायला नकार दिला होता. धर्मानं घालून दिलेल्या बंधनांचं जोखड़  त्या त्यांच्याही नकळत निमुटपणे वागवत होत्या. युएई त्या मानाने पुरोगामी वाटत होतं पण तरी  दुबई मॉल मधल्या "ladies, please wear some respectable cloths" ही पाटी माझ्या नजरेतून सुटली नव्हती. असो, त्या मूली उतरल्या आणि मी सुद्धा टर्मिनल 1 वर उतरलो.
गंमत म्हणजे जाते वेळी एक माणूस जो माझ्या मागे बसलेला आणि ज्याने त्याच्या उंचीचा वापरकरत माझं घरंगळत गेलेलं पोस्टर होल्डर केबिन मधून काढून दिलेलं तो आता माझ्या पुढच्या सिट वर होता. काय योगायोग! चार चं विमान बरोबर साडे आठला मुंबई  विमानतळावर अवतरलेलं होतं. परतीचा प्रवास कधी संपला ते कळलंही नव्हतं. खरंतर, हे गेले 5 दिवस कसे  वाऱ्यासारखे उडून गेले होते. जाता जाता अरबांच्या देशातली थोड़ी वाळू उडवून माझ्या आठवणींच्या रुपात पसरवून गेले होते.
तो संपुर्ण प्रवास म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. आयुष्यातला पहिला परदेश प्रवास आणि तो सुद्धा असा विलक्षण होता. दोन हजार वर्षाहुन अधिक काळ चालत आलेली एक संस्कृती जवळून पहायचा सुवर्णयोग आला होता. माझ्या स्मृतीतून या आठवणी नष्ट होणं अशक्य असलं तरी या ब्लॉगच्या माध्यमातून त्यातल्या बारकाव्यांसह त्या पुन्हा आनंद देत राहतील. माझ्या या प्रवासात पुन्हा एकदा जाताना सोबत केल्याबद्दल खूप खूप आभार... तुम्हा सगळ्यांच्या इतक्या प्रोत्साहन आणि कौतुकासाठी खरंच मी ऋणी राहीन. त्या प्रोत्साहनाच्या जोरावर इतकं लिहण्याचं धाडस करू शकलो, आणि एक अर्थानं माझाच प्रवास मला पुन्हा करता आला. खूप खूप शुक्रान... आपले आभार ;)
खुदाह हाफ़िज़ हबीब...
_/\_
-विनायक कांबळे

६ टिप्पण्या:

  1. सुंदर प्रवासानुभव!

    आम्हालाही 'अरबस्थानाची' सैर घडवून आणल्याबद्दल अनेक आभार व शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  2. I am staying in Middle East from last 10 yrs and from 5 yrs in Dubai. Loved your articles. God bless you

    उत्तर द्याहटवा