शुक्रवार, २३ जानेवारी, २०१५

मन की बात..

मुंबईच्या ताडदेव भागात एक म्हातारा इसम खांद्यावर ट्रांज़िस्टर घेऊन फिरायचा. पीके सिनेमात दाखवलेल्या ट्रांज़िस्टर सारखा होता डिट्टो. (तुमच्या कल्पनाशक्तीला आवरा. पीकेतल्या सारखा म्हणजे ट्रांज़िस्टर तसाच, पण माणूस पूर्ण कपड्यात असायचा.) त्या ट्रांज़िस्टरच्या वजनाने त्याचा हात सतत हलायचा आणि म्हणून खांद्यावरचा ट्रांज़िस्टरसुद्धा हले. त्याच्यावरच्या गाण्यांची आणि ट्रांसिस्टरच्या हलण्याची लय जुळलेली असे. मी आमच्या दुकानात बसलेलो असताना तो मला रोज दिसायचा. दिवसातून त्याच्या ताड़देव सर्कलला दोन -तीन चकरा व्हायच्या. नविनच आलेल्या खिशातल्या पेन इतक्या रोडियो (रेडियो मिर्ची) च्या जमान्यात, हा माणूस हनुमानासारखा न झेपणारी गदा का घेऊन फिरायचा, याचं मला कौतुक वाटे! तो नेहमी ऑल इंडिया रेडियो AIR (AM) ऐकायचा जे त्या खिशातल्या FM वर लागायचं नाही. त्यावर बऱ्याचदा जुनी गाणी लागलेली असायची आणि अधून मधून बातम्या. माझ्या पाहण्यातला AIR चा तो पहिला श्रोता. इतरत्र सुद्धा लोकं बघितले असतील एखादं वेळेस, पण ह्याच्या अवतारामुळे हा चांगलाच लक्षात राहिलेला. 

तसे एकूणच रेडिओला काही फार बरे दिवस नव्हते. रेडियो मिरची आल्यापासून लोकल ट्रेन मध्ये टाईमपास, म्हणून लोकं रेडियो ऐकताना दिसू लागली. पण अमीन सयानीच्या काळात विविध-भारतीने उपभोगलेलं वैभव आकाशवाणीच्या नशिबात परत आलं नाही. आकाशवाणी तसं डाऊन मार्केटच होतं आणि तसंच राहिलं. नवीन रेडियो स्टेशन्सचे हाय फंडू रेडियो जॉकी कुठे आणि मुंबई किंवा पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या रुक्ष-रटाळ बातम्या कुठे? झुमरी तलैय्याचे मुन्नी, पिंकी, राजू, चिंटू, उनके पापा, मम्मी, बुआ, चाचा, पडोसी सगळे काळाआड झाले होते. त्याकाळी प्रसार माध्यमांचं बातम्यांमध्ये कुठलंच वैयक्तिक सोयरे-सुतक नसल्यानं त्यांचा रुक्षपणातून सिद्ध होण्यासाठीच बहुतेक बातम्या निर्विकारपणे दिल्या जात असाव्यात. त्यात आताच्यासारखं "देख लिजिये इस दरींदे को... " सारखा उसना आव नव्हता. १००.७ MHz FM वर मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाच्या मध्ये आकाशवाणीच्या या ५ मिनिटाच्या बातम्या यायच्या त्या मी ऐकायचो. जितका निरुत्साह दंगल बॉम्बस्फोटाच्या बातमीत, तितकाच निरुत्साह पेट्रोलचे दर कमी झाले किंवा देशभरात दिवाळी साजरी होतेय हे सांगताना असावा, असं त्यांना ट्रेनिंगच दिलेलं असावं इतका एकसुरीपणा. 

येत्या रविवारी ओबामा मोदींसोबत मन की बात वर बोलणार हे ऐकून मला तो ताडदेवचा आकाशवाणी भक्त अवलिया आठवला. पंतप्रधान मोदींनी मरायला टेकलेल्या आकाशवाणीला पुन्हा संजीवनी देण्याच्या उद्देशाने आपल्या "मन की बात" आकाशवाणी वरून सांगायला सुरुवात केली तेव्हापासून बहुतेक आकाशवाणी अजून सेवेत आहे, याचा बहुतेक लोकांना साक्षात्कार झाला. गुजराथी लोकं तसं मार्केटिंग करण्यात तरबेजच असतात. मोदींचं हे मार्केटिंग यशस्वी झालं आणि बरीच गर्दी पुन्हा आकाशवाणीकडे मन की बात ऐकण्यासाठी कान लावून बसली. आता एक पाऊल आणखी पुढे टाकून मोदींनी ओबामाच्या रुपात आकाशवाणीवर साक्षात पृथ्वीतलावरचा शक्तिमान आणला आहे. ओबामा मामा त्यांच्या मनातलं काय सांगतायत याची उत्सुकता तर आहेच पण आकाशवाणीला जीवदान द्यायला मोदींनी अमेरिकेहून संजीवनी मागावली आहे याचं विशेष कौतुक.. 

- विनायक कांबळे

1 टिप्पणी: