मंगळवार, २० जानेवारी, २०१५

शब्दातीत...

दोन दिवसापूर्वी परळच्या आर एम् भट शाळेने एक अभिनव कार्यक्रम केला. माजी विद्यार्थ्यांचं पुनःसंमेलन. माजी विद्यार्थी म्हणजे गेल्या पाच किंवा दहा वर्षातल्या माजी बॅचेस नव्हे, तर जे आता आजोबा आणि आजी आहेत, अशा गेल्या सत्तर वर्षातल्या बॅचेस..
येताना काठ्या टेकत आलेले शाळकरी वेशातली सत्तरीतले आजी आजोबा जाताना लेझीमच्या तालावर नाचत गेलेत.  त्यांच्या आनंदाची आपण कल्पनाच करू शकत नाही. आपल्या पिढीने ती ताटातूट कधी अनुभवलीच नाही, मग हा पुन्हा भेटण्याचा आनंद तरी कसा अनुभवणार?


 

शाळा संपली आणि जो-तो दिशा फुटेल तिथं पांगला.
मुलांचं त्या मानाने बरं कारण मुलींसारखं लग्न होऊन परगावी जायची सक्ती नव्हती त्यांना..
गेलाच एखादा नोकरी धंद्याच्या शोधात तरच..
आजकालच्या मुलांचा शाळेचा मित्र उद्या कुठे जाणारेय हे आजच फेसबुकवर स्टेटस अपडेट करतो..
किंवा निदान महिन्याला एखादा ईमेल करतो हटकुन...
मग एकमेकांपासून दुरावण्याचा प्रश्नच कुठे येतो?
या आउट डेटेड पिढीकडे मात्र मनात जपलेल्या आठवणीखेरीज शाळेतल्या मित्राचा दूसरा पत्ता सुद्धा नसतो...
मग पत्र पाठवायचं तरी कोणाला?  आणि कुठे?

माझ्या शाळेतला, एकाच बाकावर बसणारा, ज्याच्या डब्यातल्या भाज्या मला तोंडपाठ असतील...
असा एखादा मित्र, चाळीसेक वर्षांनी मला भेटला तर?
आणि तोही तसाच.. त्याच गणवेशात ?
पण, आता त्याचे केस पांढरे झाले असतील..
 किंवा केस आणि दात नसतीलही...
हात-पाय थरथरत असतील..
पण त्याच्या कड़कडून मारलेल्या मिठीत गळून पडतील मधली सगळी वर्ष, कदाचित..
पुन्हा तितकेच लहान होऊ..
आणि कदाचित भांडू सुद्धा जागेवरून...
किंवा उगाचच!!
पापण्यांच्या कडा आपोआप ओघळू लागतील आनंदानं..
बोलता बोलता हातातला हात तसाच राहील.. नकळत... बराच वेळ..
हात थरथरले असले तरी स्पर्श घट्ट राहतील...
छातीत हात घालून ह्रदय घट्ट धरून ठेवल्या प्रमाणे...

-विनायक कांबळे

छायाचित्र सौजन्य : पूजाश्री नार्वेकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा