मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

या वळणावर...


एखाद्या कसलेल्या नटाला विचारा, काही व्यक्तिरेखा साकारणं किती कठीण काम असतं. खऱ्या आयुष्यात सुद्धा आपण आपली अशी एक व्यक्तीरेखा निभावत असतो. बऱ्याच लोकांसाठी रोजचं आयुष्य एक आव्हानच असतं. असं आयुष्य वाट्याला येण्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम असतात. पण अशी ताकदवान भूमिकाच नटाचा खरा कस लावते. पराकोटीच्या पराकाष्ठेत नव्या संपन्न जीवनाची मुळं रुजलेली असतात. त्यामुळे जितका संघर्ष मोठा तितकंच मोठं यश. यशामागून लौकीक ओघानं येतो. आणि येते, ती त्याची आणि भूमिकेची जबाबदारी. वपु म्हणतात तसं लौकीक आणि प्रसिद्धी मिळवणं म्हणजे अश्वमेधाचा वारू अडवून धरण्यासारखंच आहे. तो घोडा अडवला म्हणजे कायमचं युद्ध. हे युद्ध पेलण्याची शक्ती आपल्या अंगी असायला हवी.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता मागे वळून पहावं
रस्ता किती ओलंडलाय..
मागच्या वाटेवर एक अंधुक आकृती दिसते
चाचपडणारी...धडपडणारी...
ध्येयवेडा कधीच नव्हतो..
स्वप्नरंजनही नाही...
पण आता खरंच स्वप्नवत वाटतंय..
अकल्पित असून साकार झालेलं आणि कधीही न पहिलेलं स्वप्न...
सकाळी सूर्या आधी दिवस सुरु करुन...
भर मध्यरात्री डोक्यावरच्या चंद्रासोबत मावळणारा दिवस..
उशाला शीण नाही.. उद्याची आखणी असायची...
पांघरुणात झोप नाही... उद्या शरीर कोलमडू नये म्हणून विश्रांती विसावायची...
आता तो आटापीटा सफल झाल्यासारखा वाटतो..
अहं ... रास्ता संपलाय असं नाही
पण रस्त्याला दिशा सापडलीये..
हेही नसे थोड़के...
रस्त्याची औपचारिकता संपून आपला वाटायला लागलाय..
वाटेचं आणि वाटसरूचं सख्य जमलंय..
आता केवळ तो मला नेतोय असं नाही..
आम्ही एकमेकांचे झालो आहोत..
वाटसरूला रास्ता सापडलाय..
आपला.. हक्काचा...

-विनायक कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा