मंगळवार, २ डिसेंबर, २०१४

मृगजळ...

काही दिवसापूर्वी एका मुलीचा गाणं म्हणतानाचा विडियो फेसबुकवर खूप गाजत होता.. (मी सुद्धा शेअर केला होता) खुपच सुरेल आवाज होता. लोकांनी त्या विडीयोच्या प्रतिक्रियांमध्ये तिला मोठमोठ्या पदव्या सुद्धा बहाल करून टाकल्या. अनेकांना तीचं अज्ञात असणं रुख-रुख लावून गेलं. तिला शोधण्याच्या बऱ्याच विनंत्या झाल्या 

आणि एकदाची ती कुठेतरी सापडली. विजयलक्ष्मी तीचं नाव. मलयाळम तिची मातृभाषा आणि हिंदीचा गंध सुद्धा नाही. कुठेतरी घरकाम करते वगैरे अशा ऐकीव गोष्टी कानावर पडलेल्या शेअर होऊ लागल्या आणि मग तिच्या उद्धाराचा आणि तिला ओळख मिळवून देण्याचा विडा झी नीव्ज (Zee News) नं उचलला. एकता कपूरच्या सिरीयलला लाजवेल अशी पूर्ण दिवस तिची मुलाखत त्यांच्या च्यानेलवर दिवसभर प्रसारित होत राहिली. त्यात जास्तीचा मेकअप करून अवघडून बसलेली विजयलक्ष्मी, शेजारी तिचे वडील (दुभाषाचं काम करण्यासाठी बसवलेले) आणि मग आजच्या घडीला रिकामे असलेले दोन-चार हिंदीतली गायक मंडळी. त्यांच्यासोबत तिला "चिकनी कमरपे तेरी मेरा दिल फिसल गया.." अशी गाणी म्हणायला भाग पाडणं, तिनं अवघडून ते पार पाडणं आणि कायम बेंबीच्या देठापासून ओरडून बोलणारी सूत्रसंचालक(anchor) असं सगळा कार्यक्रमाचा घाट घातलेला...

मध्येच लता मंगेशकरांना फोन लावला जातो. त्यांना पूर्वसूचना दिल्याप्रमाणे ठरलेला प्रश्न विचारला जातो. सुरुवातीला त्यासुद्धा तीचं नैसर्गिकरित्या सहज आणि मोघम कौतुक करतात. पण सूत्रसंचालिकेचं समाधान तेवढ्यानं होणारं नसतं. शक्य तितकं शो ताणण्याच्या तिला सूचना आधीच मिळालेल्या असतात. मग ती दीदींना राहून-राहून अजून कौतुक करायला भाग पाडणारे प्रश्न विचारते आणि आता (किंचितशा वैतागलेल्या स्वरात) दीदी तेच शब्द पुन्हा उच्चारतात. आता ती सूत्र संचालिका त्या मुलीला तेच सत्यम शिवम् सुंदरम गाणं दीदींना म्हणून दाखवण्याचा आग्रह करते. दिदींनी "आपण ते ऐकलंय" असं सांगून सुद्धा पुन्हा एकदा विजयलक्ष्मीच्या आग्रहासाठी पुन्हा ऐकण्याच्या आग्रहाखाली दीदींना फोनवर ताटकळत ठेवते. बरं, यात त्या मुलीला तिच्या शब्दांवर सत्ता नाही. बोलविता धनी वेगळाच. दीदी जाता-जाता तिचे कान टोचतात की "गाते छान, पण हे यश तिने डोक्यात जाऊन देता कामा नये" या वाक्यात त्या पुढचा खरा संभाव्य धोका सांगून जातात. 

पण च्यानेलला तिनी मोठं व्हायला हवंय. निदान त्यांना धंदा चालवायला दुसरी कुठलीतरी "ब्रेकिंग नीव्ज" मिळेपर्यंत तरी तिने त्यांच्या च्यानेलच्या अजेंड्यावर राहावं असं त्यांना वाटतंय. यात वर-वर सामाजिक भान आणि कलागुणांना वाव वगैरे वगैरे मोठमोठे उद्दात्त हेतू असले तरी खरा हेतू उपजीविकेचा प्रश्न आणि TRP चं गणित हे आहे, हे ओळखायला वेळ लागत नाही. आपल्या मुलीला एक व्यासपीठ मिळालं याचा आनंद तर त्या पालकाच्या डोळ्यातून ओसंडून वाहतोय. अर्थात आपल्या अपत्याचं खुद्द लता दीदींकडून कौतुक झालेलं कोणाला आवडणार नाही? आता ते च्यानेलवाले म्हणजे त्यांना साक्षात वेंकटेशाचाच अवतार वाटत असणार. पण यात त्याचं स्वत:चं उखळ पांढरं करून घेण्याचा त्यांचा सुप्तहेतू या निरागस बालक आणि त्याच्या मृगजळाला भूललेल्या पालकांच्या क्वचितच लक्षात आला असेल. आता तिला अंधारातून उचलून प्रकाशझोतात आणलंय, तसं काम झाल्यावर अंधाराच्या गर्तेत ढकलायला निर्लज्ज मिडिया मागेपुढे पाहणार नाही. आणि ह्या सगळ्यात त्या किशोरवयीन मुलीच्या मानसिकतेवर होणाऱ्या परिणामाचा विचार सद्यघडीला कोणाच्याही मनाला शिवलेला नसेल. आपला मुलगा बरं गातो/नाचतो आणि दोन-चार स्पर्धा मारल्या म्हणून त्याला स्टारपदी नेवून बसवणारे पालक त्याच्याही नकळत आपल्या मुलाच्या भविष्यातल्या मानसिक घुसमटीची पायाभरणी करत असतात. आणि मिडीयाचं म्हणाल तर आजकाल अशा टॅलेंट शो चं कॉंग्रेस गवत जागोजागी फुटलंय.. त्यातल्या एकात ह्याला सहज खपवून घेतील, पुढचं भविष्य त्या झगमगाटात झाकोळून जाण्याकरता....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा