सोमवार, ३ नोव्हेंबर, २०१४

ऐसा भी होता है.. Part 2

मध्यरात्री सव्वाबारा च्या सुमाराला कसलीतरी गडबड आणि मग बराच गोंगाट ऐकू आला. बरीच माणसं एकत्र कसल्यातरी घोषणा दिल्यासारखा आवाज येत होता बाहेरून. पण काय म्हणत होते ते नीटसं स्पष्ट कळत नव्हतं. हळुहळु त्यांच्या आवाजाची पट्टी वाढत होती आणि इकडे माझी उत्सुकता पण तेवढीच वाढत होती. बाल्कनीतून नीट दिसेना म्हणून बाहेर कॉरिडोरच्या कोपऱ्यापर्यन्त येऊन पोहोचलो. आधीच माझ्यासारखे दोघे तिघे तिकडे ते बघत उभे होते. हॉस्टलच्या पलिकडच्या बाजुच्या गल्लीतल्या मशिदीकडून ते आवाज येत होते. चार-पाच जण हातात एक काठीला आडवी दूसरी काठी लावून, त्याला फुलांच्या माळा लटकवलेले ते क्रॉस हातात घेउन पळतच जमिनीवर पाय आपटत आले. आणि त्याच्या मागोमाग तो जमाव. ते जिथनं आले तिथपर्यंत मी पहायचा प्रयत्न केला, पण नजर पोहोचेना. माझा प्रयत्न बघून तिथं उभे असलेल्यांपैकी एकाने मला सांगितलं. ते जळत्या निखारयांवरून चालून आले होते. आणि आता संचारल्यासारखे हातवारे करत होते. 

आता तो जमाव गल्लीच्या एकदम तोंडाशी मेन रस्त्यावर येऊन थांबला होता. रस्त्याला एखाद दूसरी गाडी मधनंच येउन जायची. त्या गाडीला वाट करून दिली जायची. बायका-पुरुष आता त्या संचारलेल्या माणसांना आपापली गाऱ्हाणी सांगत होते. ती माणसं त्यांचं ऐकून त्यांच्या कानात मंत्र फुकत होते. पाठीवर मोरपिसाच्या झाडुने थोपटत होते आणि मध्येच अगम्य पिडेने किंचाळत होते. काही तरुण मुलं थोडीशी लांब त्या जमावाला घेरून गप्पा मारत उभी होती. तिथं चाललेल्या कार्यक्रमाशी घेणं-देणं नसल्यासारखी... 

मध्येच एक बाई लगबगीनं कमरेवर पाण्याचा हंडा घेउन त्या जमावातनं वाट काढत आली. कुणीतरी तिच्याकडून तो हंडा घेतला आणि त्या संचारलेल्यापैकी एकाच्या डोक्यावर रीता केला. फार नसली तरी बऱ्यापैकी थंडीत तो माणुस आता ओल्या अंगाने होता त्याच लयीत झूलत होता. लहानांपासून मोठ्यापर्यंत जवळ जवळ सगळ्यांचे आशीर्वाद घेउन झाल्यावर आता परत कुजबुज आणि लगबग सुरु झाली. कुणीतरी पुढाकार घेउन त्या संचारलेल्या माणसांना पुढे चालायला लावलं आणि तशी ती जत्रा परत पुढे निघाली.. त्याच घोषणांनी दोन मिनिटं पुन्हा सगळा परिसर दुमदुमला.. आणि त्यांच्या पुढे-पुढे जाणाऱ्या जत्रेमागून त्यांचा आवाज विरून गेला....

टिप: एक अनुभव शेअर करावासा वाटला, म्हणून लिहिलं. चांगलं किंवा वाईट हे सांगणारा मी कुणीही नाही. कुणाच्या भावना दुखावण्याचा मुळीच हेतू नव्हता, तरीही कुणाच्या भावना दुखावल्यास क्षमस्व. कधी कधी रोजच्या जगण्यात काही प्रसंग घडतात. फार साधे असतात ते, त्यात काही वेगळं असेलच असंही नाही पण असे अनुभव थोड्या बहुत फरकाने प्रत्येकाला येतात.. असे रोजचे अनुभव मांडण्याचा प्रयत्न म्हणजे "ऐसा भी होता है.." ही ब्लॉग मालिका.

-विनायक कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा