सोमवार, १७ नोव्हेंबर, २०१४

बाळासाहेब आणि त्यांची मुंबई...


२ वर्षांपूर्वीचा १७ नोव्हेंबर आठवला. दिवाळीत घरी गेलो होतो आणि सगळ्या मुंबईत दिवाळीपेक्षाही महत्वाची गोष्ट चर्चेत होती.  ती म्हणजे बाळासाहेबांची अत्यावास्था. कुठल्याही क्षणाला ते गेल्याची बातमी जाहीर व्हायची शक्यता होती आणि म्हणून सगळी मुंबई दिवाळीसुद्धा सुतकात असल्यासारखी साजरी करत होती. बरेच लोक सेनाभवनाबाहेर गेले काही दिवस ठाण मांडून बसलेले होते. न्यूज चॅनलवाल्यांचा धंदा जोरात होता. सगळीकडे चर्चासत्र झडत होती. मातोश्रीवरून कोण बाहेर आलं आणि कोण आत गेलं याची बित्तंबातमी चघळली जात होती. सेलेब्रिटी, राजकीय नेते, बाबसाहेब पुरंदरे, बाबा रामदेव, अमिताभ बच्चन आणि कितीतरी लोक येऊन गेल्याचं सतत दाखवलं जात होतं. माझा शिवसेनेशी आणि किंबहुना बाळासाहेबांशी कुठलाही भावनिक ऋणानुबंध नव्हता म्हणून त्या गोष्टीची फार पर्वा नव्हती. काळजी एकाच गोष्टीची वाटत होती की, ते गेले आणि मुंबईत दंगल उसळली किंवा संचारबंदी लागू झाली ( ते अचानक गेले असते तर ही शक्यता खूप मोठी होती) तर आपल्याला परत जाता येणार नाही आणि मग पुढचं सगळं वेळापत्रक गडगडेल. फक्त सुखरूप बंगलोरला परत येण्याचा ध्यास लागला होता.

आणि होऊ नये तेच झालं. शिवसेनेने (दिवाळी संपायची वाट बघून), दिवाळी संपल्यावर त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. आता, जाता येईल की नाही? हा यक्षप्रश्न होता. केएसआरटीसी बसचं तिकीट होतं. ठरल्या वेळेत बस जाणारेय की नाही याची खात्री करून घेतली. पण तरी धाकधूक होतीच कारण बस म्हणजे रस्त्याचा प्रवास आणि तोही अशा दिवशी जेव्हा लोक (सकारण किंवा विनाकारण) भावनिक होऊन कधीही रस्त्यावर उतरू शकत होते. प्रवास करून पूर्ण महाराष्ट्र ओलांडायचा आणि त्याहीपेक्षा मुंबईची स्थिती जास्त नाजूक होती.

अंत्यसंस्कार शिवाजी पार्कवर होणार होते हे माझ्यासाठी एका दृष्टीने चांगलंच होतं. शिवाजी पार्क एका टोकाला आणि माझा मुंबईतून सायन-वाशी मार्गे बाहेर पडण्याचा रस्ता विरुद्ध दिशेला होता म्हणून हायसं वाटलं. माझ्यासारखे काहीच लोकं धाडस करून या बस प्रवासाला निघाले होते. 

अक्षरशः मुंबई ओस पडली होती. मुंबईला इतकं ओसाड कधीच पाहिलं नव्हतं. शिवसेनेने आणि मुंबईने अघोषित "मुंबई बंद" पुकारला होता. या पूर्वी सुद्धा बाळासाहेबांनी मुंबईचं धडधडतं हृदय असं बऱ्याचदा काही क्षणासाठी बंद केलं होतं.   कित्येकांना रडू आवरत नव्हतं आणि उरलेल्यांना त्यांची कीव करण्यापासून फुरसत नव्हती. सोशल मीडियावरसुद्धा काहींनी ह्या अघोषित संचारबंदीविरुद्ध आवाज उठवला पण पुढे सगळं रीतसर सेटल झालं. न्यूज चॅनलवाले आता पोरक्या मुंबईचा कडू घास काढत होते आणि रडणारे चेहरे सारखे दाखवत होते. एक वयस्कर आजी टीव्हीवर अंत्यदर्शन करून रडताना दाखवत होते. एक जण त्या लाखोंच्या गर्दीत होर्डिंगच्या लोखंडी बांबूवर चढून रडता-रडता ते बघताना, दाखवत होते. सेनाभवनाच्या समोरच्या चालू बांधकामाचा लोकांनी कसं सज्जा सारखा उपयोग केला होता, ते दाखवत होते आणि घरी बसलेलेपण टीव्हीवर तो सोहळा बघत होते. न्यूज चॅनल पण त्यांची हीच ओळख सांगत होते. ज्यांच्या एका इशाऱ्यावर धावणारी मुंबई थांबते अशा व्यक्तीचं निधन झालं म्हणून. खरंही होतं म्हणा त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणात अशी ताकद नव्हती आणि नाही. त्या दिवशी, तराजूचं एक पारडं अचानक जड व्हावं तसं सगळी मुंबई आणि बराचसा महाराष्ट्र शिवाजी पार्काकडे एकवटला होता आणि उर्वरित मुंबईत अघोषित संचारबंदी.

बाळासाहेब नसते तर आज मुंबई कदाचित वेगळी असती. बरीच वेगळी. आज जे काही मुंबईत उरलं-सुरलं मराठीपण आहे ते कदाचित त्यांच्यामुळेच. बाहेरच्यांना कदाचित त्याचं मोल कळणार नाही, पण मुंबईतला मराठी माणूस म्हणूनच बाळासाहेबांशी भावनेने बांधला गेला होता (अजून आहे). शिवसेनेचं पुढे काय झालं आणि काय होईल माहित नाही पण बाळासाहेबांना मुंबईकर कधी एकेरी संबोधू शकत नाहीत यातच त्यांचा आदर आला. बाकी राजकारण आणि सत्ता हा विषय वेगळा पण बाळासाहेबांचं आणि शिवसेनेचं मुंबईच्या जनमानसात वेगळं स्थान आहे. म्हणून कदाचित त्या दिवशी आपली सगळी कामं उद्यावर टाकून मुंबई थोडीशी थांबली आणि हळवी झाली. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना श्रद्धांजली...

-विनायक कांबळे 

टीप : मी ठरवलं होतं या विषयावर काही लिहायचं नाही पण राहवलं नाही. लोकं उगीचच आपला राजकीय कल जोखण्याचा प्रयत्न करतात. त्याने फरक काहीच पडत नाही म्हणा पण उगीच पुढचे सगळे लिखाण त्याच दृष्टीकोनातून पहिले जातात आणि मग आपल्यावर शिक्का बसतो. 


२ टिप्पण्या: