मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४

ऐसा भी होता है .... part 1

२-४ दिवसापूर्वी दादरला एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात रांगेत उभा होतो. रांग तशी फार मोठी नव्हती. पुढे ३-४ जण आणि मागे साधारण तेवढेच... 
एक पंजाबीन बाई चौकशी करायच्या निमित्ताने माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत येऊन उभी राहिली. तशी दिसायला अशी मोठ्या घरातली वाटत होती. म्हणजे पेहराव आणि मेकअप वरून तरी. मी तिच्या २-४ प्रश्नांची उत्तरं दिली आणि नम्रपणे तिला म्हणालो, "तुम्ही जितका वेळ इथं उभ्या राहाल तितकीच मागची रांग वाढत जाईल आणि परत तुम्हाला नंबर लावायचा झाल्यास (कुणीतरी इथून हकालल्यावर) तुम्हाला खूप वेळ थांबावं लागेल." तर ती बाई किंचित गडबडली आणि तिच्या पंजाबी हिंदीत म्हणाली "बेटा, मुझे बस थोडासाही समान लेना है| अब उसके लिये इतना नंबर क्यू लागना? तुम मुझे अलाऊ (allow) करो तो बहोत अच्छा होगा|" मी म्हटलं वो सब ठीक है, मैने बस आपको बताना सही समझा| आगे आपकी मर्जी| मै आपको यहासे निकाल नहीं रहा हुं, पर आपको अगर ये ऐसे लाईनमे घुसना सही लागता है, तो कोई बात नही| एवढं बोलून मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिची पट्टी चालूच होती " बेटा रातभर जगी हू| अभी देखो जुहुसे यहा आयी हू वगैरे वगैरे| किसी और को बोल देती, लेकिन लोग पैसा नहीं लेते तो अच्छा नही लगता|"

मग ती मुद्द्यावर आली "मै वो जुहुमे महाकाली मंदिर है, वहां बैठ्ती हू| आपको कोई प्रॉब्लेम हो तो बताना| (चुटकी वाजवत) यु सोल्व कर दुंगी|" मला मनात हसू आलं या बाईनं लोकांना लुटायचा धंदा मांडलाय आणि तिच्याकडून आपण प्रामाणिकपणाची अपेक्षा करत होतो. मी म्हटलं "मेरा सब कुछ ठीक है, भगवान की दया से|" तरी तिने तिची जाहिरात सुरूच ठेवली " अच्छा है| देखो, बडे सारे लोगोके काम मैने कर दिये है| बहोत लोग मानते है| ये शरीर है न, इसमे हर वक्त माता का संचार रेहता है| वो है ना अपनी इरानी, वो तो कितना मानती है| अब देखो उसे मैने कहा से कहा पहुंचा दिया| अब मंत्री भी बन गयी है| 
आत्तापर्यंत मज्जा घेत ते ऐकत होतो, पण आता न राहवून मी विचारलं "पर वो तो इलेक्शन हार गयी थी|" तिनं लगेच सराईत मार्केटिंग एजंट सारखं सारवून घेतलं "हा पर अब देखो मंत्री बन गयी है| उसने मुझे उसके बाद तीरथ भी करवाया| मैने बोला ये देख स्म्रिती, उसका नाम है ना स्म्रिती इरानी| लोग तो सिरीयलसे तुलसी केहते है| मैने बोला देख महंगाई कम कर (बाईंना माहितच नही त्यांची शिष्य कुठल्या खात्याची मंत्री आहे) वर्ना जहा थी वही वापस लाके रख दुंगी| गरीबोके लिये कुछ तो कर|" मला हसायला येत होतं आणि ते बघून माझ्या पुढे उभं राहून ते ऐकणाऱ्या मुलाला सुद्धा हसायला येत होतं| बाईची कॅसेट तशीच चालू होती..."मै उसको अबसे नही जानती, तबसे जानती हू जब वो मुंबई आई थी| कोई काम नहीं था उसके पास| फिर एकता कपूर से मिलवाया| उसके बाद तो वो बहोत फेमस हुई ना| तभी ये पती भी मिल गया इरानी| अब देखो...

असं म्हणायला आणि तिचा नंबर यायला... ती पुढे ऑर्डर देण्याच्या गडबडीत बिझी झाली आणि मी सुटलो. पण खरंच तिच्यामुळे त्या रांगेत उभं राहायची मज्जा आली. एखादा माझ्या जागी असता तर एकतर "माता..." म्हणून तिच्या पायावर कोसळून ढसाढसा रडला तरी असता नाहीतर तिला तिथून हाकलून तरी लावलं असतं. पण संयम आणि विवेक राखल्याने असंही मनोरंजन होतं कधी कधी....
-विनायक कांबळे

टिप: एक अनुभव शेअर करावासा वाटला, म्हणून लिहिलं. चांगलं किंवा वाईट हे सांगणारा मी कुणीही नाही. कधी कधी रोजच्या जगण्यात काही प्रसंग घडतात. फार साधे असतात ते, त्यात काही वेगळं असेलच असंही नाही पण असे अनुभव थोड्या बहुत फरकाने प्रत्येकाला येतात.. असे रोजचे अनुभव मांडण्याचा प्रयत्न म्हणजे "ऐसा भी होता है.." ही ब्लॉग मालिका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा