शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

कुछ तो लोग कहेंगे....

असं बऱ्याचदा होतं, आपण खुप विचारांती एक निर्णय घेतो. आपल्या आयुष्यातला खुप मोठ्ठा निर्णय असतो तो. ते करायचं धाडस एकवटायला इतका वेळ घेतलेला असतो. पण केवळ तो निर्णय लोकांच्या नेहमीच्या रुळलेल्या विचारसरणीशी विसंगत असतो म्हणून त्यांचा प्रश्नांचा ससेमिरा टाळायसाठी आपण लोकांनाच टाळायला लागतो. असे कितीतरी अज्ञातवासात गेलेले मित्र- मैत्रिणींची उदाहरणं आहेत. आपलं वैयक्तिक आयुष्य आणि आत्मविश्वास अबाधित राखण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांपुरतंच जग आखून घेतात आणि त्यातच समाधानी राहतात.

पण गेल्या 2 आठवडयात अशी 2 धाडसी लोकं भेटली. म्हणजे त्यांची ओळख तशी जुनीच पण त्यांच्या निर्णयाची लोकांसमोर जाहीर वाच्यता करण्याच्या त्यांच्या धाडसाने त्यांची नव्याने ओळख झाली. पाच आकडी पगाराची नोकरी सोडणं किंवा 10 वर्षाचा सुखाचा संसार समंजस्याने मोडणं, हे सामाजिक अक्षम्य अपराध त्यांच्याकडून घडलेयत. पण त्यासाठी लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी त्यांनी स्वत:ची मानसिक तयारी केली आहे. आणि त्या तयारीनिशी त्यांनी ते निर्णय जगासमोर मांडले त्याबद्दल त्यांचं कौतुक.

त्याचबरोबर लोकांनी पण या गोष्टीचा विचार करावा की एखाद्याचे हालचाल विचारता-विचारता आपण त्याला जिव्हारी लागेल असा प्रश्न तर नाही ना विचारत आहोत?
लग्नाला इतकी वर्ष होउन पाळणा हलला नाही?
अजुन तुझं लग्न कसं झालं नाही?
कुठवर असाच/ अशीच राहणार आहेस?
एवढ लग्न मोडण्याचा टोकाचा निर्णय का घेतलास? घ्यायचं संभाळुन.. 
५व्या वर्षात पिएचडी सोडलीस? वेड लागलंय का?
हे आणि बरंच काही..

पुढच्या वेळी एखाद्याची अत्मियतेने चौकशी करताना लक्षात असू दे, आपण काही वावगं विचारत तर नाही आहोत ना?
आणि अशा अज्ञातवासात गेलेल्या लोकांना एकच सांगणं...
"कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है केहना...
छोडो बेकारकी बातोंमें कहीं बीत न जाए रैना..."

-विनायक कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा