शनिवार, १२ जुलै, २०१४

गुरुपौर्णिमा


आयुष्य जगताना आपण बऱ्याच लोकांच्या संपर्कात येतो. त्यातली बरीचशी माणसं सामान्य गर्दीच्या प्रकारात मोडतात आणि आठवणींच्या पटलावरून पुसली जातात, काही विशेष व्यक्तीसोडून. त्यात आवर्जून असणारी नावं म्हणजे आपले कुटुंबिय, जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि शिक्षकवर्ग. आपल्यापैकी अनेकांचे पहिले आदर्श हे त्यांच्या शाळा-कॉलेजातले शिक्षकच असतात. आपल्याला स्वत्वाची जाणीव करून देणारं, आपल्या व्यक्तीमत्वावर छाप टाकणारं आणि आपल्याला जगण्याचा आदर्श घालून देणारं असं एक व्यक्तिमत्व शाळा-कॉलेजात हटकून सापडतं. त्या सर्व गुरूंच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या सर्वांचे आभार.!
अर्थात शिक्षकवर्गा व्यतिरिक्त सुद्धा माणसाला जगण्याचे आदर्श घालून देणाऱ्या व्यक्ती पावलो-पावली सापडत असतात. किंबहुना आता हे वाचताना सुद्धा तुमच्या नजरेसमोर अशा काही व्यक्ती येऊन गेल्या असतील. आई-वडील, एखादे शाळेतले शिक्षक, चित्रकलेचे सर, घरगुती शिकवणी घेणारे ताई-दादा, गाणं शिकवणाऱ्या बाई त्याचबरोबर सिग्नलला गाडी अडवून पावतीसोबत उपदेश देणारे पोलिसमामा, बाजारात घासाघीस करताकरता पैशाचं अर्थशास्त्र शिकवणारी भाजीवाली, "जीवन मिथ्या है" असं शिकवणारे आध्यात्मिक गुरु, ट्रेन मध्ये वर्तमानपत्राची पुरवणी मागून त्यातल्या राजकारणाच्या बातमीचं विश्लेषण करून गप्पा मारणारा सहप्रवासी. हे सगळे आपल्या नकळत आपल्याला थोडं-थोडं जीवनाचं तत्वज्ञान शिकवत असतात. त्या सर्वांचेही आभार!!

-विनायक कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा