शनिवार, ७ जून, २०१४

अज्ञाताचा हात धरूनी

अज्ञाताचा हात धरूनी मार्गस्थ आहे पसारा
कुणास ठावे कुण्या धन्याचा खेळ असे हा सारा?

पोहणाऱ्याचे पाणी होई, उडणाऱ्याचा वारा
सागरासी मोती देई, कृष्णमेघा धारा
नभांगणासी व्यापून उरल्या लक्ष-लक्ष तारा
अन् सूक्ष्मजीवांच्या जीवन-मरणी क्षणांचा निवारा
अखंड चाले जीवन-सृष्टी क्षणाचा न थारा
कुणास ठावे कुण्या धन्याचा खेळ असे हा सारा?

मना, अशा रे उगाच चिंता कशास करसी बा रे?
घडावयाचे घडून गेले, घडणारे नच ठावे
काळपटाच्या क्षुद्र जीवा तू, हे तुझिया हाती का रे?
आज असे ते उद्या न दिसते, क्षणात लोलुप सारे
हा आत्ताचा क्षण मोठा, यातच जीवनधारा....
कुणास ठावे कुण्या धन्याचा खेळ असे हा सारा?

-विनायक कांबळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा