मंगळवार, २० मे, २०१४

महाराष्ट्र दिन...

देशातल्या इतर राज्यांशी तुलना करून महाराष्ट्राने स्वतः:ला पुरोगामी आणि पुढारलेला म्हणणं म्हणजे "वासरात लंगडी गाय शहाणी" असं म्हणण्यासारखं आहे ... माणसाने तुलना नेहमी स्वत:शी करावी. जितकं मोठं राज्य, तितकेच मोठे प्रश्न. गुन्हे आणि लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र देशात मागे नाहीये. तुम्ही म्हणाल मुळात असमाधानी लोकांना नेहमी चांगल्या गोष्टीतही काहीतरी कमतरता जाणवतेच. पण प्रगत राज्य म्हणताना या गोष्टींकडे कानाडोळा करून कसं चालेल?

५४ वर्षाच्या महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या (http://en.wikipedia.org/wiki/Farmers'_suicides_in_India) (शरद पवार कृषी मंत्री असताना), नोंद झालेले गुन्ह्यांचं उच्च प्रमाण http://ncrb.nic.in/ (नोंद न झालेल्यांची गणती नाही), सहकार क्षेत्राने गिळलेले राजकारण, गेल्या २ वर्षातली भयंकर पाणी टंचाई आणि त्याच्यावरचं राजकारण, आदर्श घोटाळा या सगळ्याकडे बघून आपण स्वत:ची पाठ थोपटून घेणं किती शहाणपणाचं ठरेल? औद्योगिक क्षेत्रांचं शहरी भागात झालेलं केंद्रीकरण, त्यामुळे ग्रामीण भागातला वाढता सुशिक्षित बेकार वर्ग आणि त्यांची शहराकडे धाव, सामाजिक आणि आर्थिक असमतोल, अजूनही अस्तित्वात असलेली जात व्यवस्था आणि त्यातून होणारा भेदभाव, विषमता आणि प्रसंगी गुन्हे, स्त्रियांवरील अत्याचार अशा कितीतरी समस्यांवर या महाराष्ट्र दिनी आत्मचिंतन करण्यासारखं आहे.

या दिवशी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना याची जाणीव असावी इतकीच इच्छा. येत्या महाराष्ट्र दिनी यापैकी निदान काही समस्यांवर तोडगा निघाल्यास महाराष्ट्र खऱ्या अर्थाने प्रगती करतोय असं म्हणायला हरकत नाही. विकसनशील आणि विकसित यातली दरी फार मोठी असते त्यासाठी प्रयत्न पण तितकेच मोठे असावे लागतात.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

-विनायक कांबळे


हा मजकूर १ मे याच दिवशी लिहिला होता पण पोस्ट करता आला नाही. देर आए दुरुस्त आए.. :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा