गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

लाभले आम्हास भाग्य...

काही उदाहरणं सांगतो. 
प्रसंग एक : 
आमच्यासोबत एक मध्यम वयीन गृहस्थ आमच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करतायत. ते सहसा कधी सरांशी इंग्रजीत बोलत नाहीत. ते बऱ्यापैकी इंग्रजी बोलू शकतात पण सर्वांसमक्षसुद्धा सरांशी बोलताना ते कानडीतच बोलतात. सर ओशाळल्यासारखे होऊन आमचा विचार करून इंग्रजीत उत्तरं देतात पण पुन्हा यांचं कानडी सुरु होतं. एकदा न राहवून सरांनी त्यांना विचारलं "तुम्ही माझ्याशी नेहमी कानडीत का बोलता? इंग्रजीत का नाही?" तर ते म्हणाले "कारण तुम्ही आणि मी दोघे कानडी आहोत म्हणून." 

प्रसंग दुसरा :
एकदा एका मित्राशी chat वर बोलणं चालू होतं. दोघंही एकाच शाळेत शिकलेलो, मराठी माध्यमातून. बऱ्याच वर्षांनी बोलत होतो. आजवर नेहमी मराठीतूनच बोललो त्याच्याशी. पण आता तो इंग्रजीत विचारत होता आणि मी मराठीत उत्तरं देत होतो. एक चार-पाच वाक्य झाली असतील आणि पुढे त्याचा प्रश्न "तू मनसे join केली आहेस का?" मला कळलंच नाही. "नाही रे.." माझं उत्तर. "मग मघापासून मराठीत का उत्तरं देतोयस?" मी गडबडलो त्याच्या या वाक्याने. आजपर्यंत ज्याच्याशी मराठीत बोलत आलो त्याला chat मध्येच माझं मराठी का खटकावं? 

प्रसंग तिसरा:
एक IISc मधलंच जोडपं. ती आमच्या lab ची सिनियर आणि तो दुसऱ्या departmentचा. दोघंही बंगाली. दोघांचं लग्न झालं. अमेरिकेला post-Doc करून भारतात परतलेले. तिथे असताना त्यांना मुलगी झाली. त्यानंतर दोन-तीनदा मी त्यांना भेटलो प्रत्येक वेळेस ते त्यांच्या ४-५ वर्षाच्या मुलीशी इंग्रजीतच बोलत होते. ती मुलगी छोट्या छोट्या गोष्टीवर रडायची आणि हे म्हणायचे "Yes baby... We are going to Mc Donald's... We are going to blah blah.." ती मुलगी तात्पुरती गप्प बसायची. किती कीव वाटावी त्या जोडप्याची? ते दोघेही बंगाली असून आपल्या मातृभाषेचा एक शब्द सुद्धा शिकवू शकले नाहीत तिला. 

असे अनेक प्रसंग आहेत. एकदा माझा ब्लॉग बघून (फक्त बघून, वाचून नाही) माझ्या एका अमराठी मित्रानं मस्करीत मला म्हटलं "तुम तो एकदम कट्टर मराठा (भाषिक असं अर्थ घ्यावा, जातीवाचक नव्हे ) हो..." मला कळेचना..  ह्याला काय उत्तर द्यावं? आजवर मी ह्याच्याशी हिंदीत बोलत आलो. गरज असेल तेव्हा बऱ्यापैकी इंग्रजी बोलतो. इतरही भाषा शिकायचा प्रयत्न करतो पण मग एखाद्याचं असं मत का व्हावं. केवळ माझी विचारांची भाषा मराठी आहे म्हणून. ती प्रत्येकाचीच असते पण दुसऱ्या भाषेत बोलताना आपण आपल्या मूळ मातृभाषेत प्रसवलेल्या विचारांचं केवळ भाषांतर करत असतो. 

(इंग्रजेतर) स्वभाषेत बोलणाऱ्या व्यक्तीला नेहमी संकुचित आणि प्रतीगामी म्हणून हिणवलं जातं. केवळ लोकभयास्तव आपल्या मातृभाषेचा त्याग करून इंग्रजी मिरवण्याची वृत्ती नक्कीच वाढतेय. बंद पडणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळा आणि वाढत्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा मुद्दाही चिंताजनक आहे. स्वतः मराठी माध्यमातून शिकलेल्या पालकांना आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकवण्यासाठी इतकी असुरक्षितता का वाटावी? माध्यमापेक्षा शाळेची शिस्त महत्वाची. आम्ही मराठी माध्यमातून शिकलो म्हणून आम्ही इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या इतर मुलांशी स्पर्धेत कुठेही कमी पडलो नाही. फक्त शिकून घेण्याची वृत्ती हवी. 

मला इथे टाईमपास सिनेमातलं वैभव मांगलेचं पात्र आठवतं. सिनेमात त्याचा उपहास केलाय खरा पण, ती व्यक्ती भाषेबद्दल किती आग्रही दाखवली आहे! दारावर पेपर टाकणाऱ्या मुलाला त्याच्या भाषेवरून उपदेश करणारा माणूस लोकांना हास्यास्पद वाटत असेल पण भाषेची विटंबना थांबवायची असेल तर भाषेचा आग्रह हवाच. 

पुन्हा एकदा सगळ्यांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
-विनायक कांबळे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा