शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३

श्रद्धांजली....

मुळात आपल्या समाजात धर्म आणि जात यांच्याशी माणसांनी आपल्या भावना इतक्या घट्ट बांधून ठेवल्या आहेत की त्याविषयी साधं बोललेलंही त्याना खपत नाही. मग ते समोरच्याचा असं बोलण्यामागचा हेतू काय होता ? हे त्यांना जरा सुद्धा जाणून घ्यायची गरज वाटत नाही. मुंबईतला प्रवासी या ६ डिसेंबरला येणाऱ्या लोंढ्यांना वैतागतो कारण त्याचं रोजचं आखलेलं वेळापत्रक या गर्दीमुळे गंडतं. ती फक्त त्या व्यक्तीची आपल्या गैरसोयीवर झालेली चीडचीड असते आणि बऱ्याचदा त्यात काही धार्मिक द्वेष वगैरे नसतो. पण बाहेरून येणाऱ्या लोकांना त्यांचा त्रागा कळत नाही. 

धर्माच्या आणि जातीच्या नावावर माणसाच्या भावना सहज चाळवल्या जाऊ शकतात ही गोष्ट लक्षात घेऊनच आपल्या देशात राजकारण चालतं हे दुर्दैवच म्हणायला हवं. मराठा किंवा ब्राम्हण असण्याचा एखाद्याला जितका अभिमान असतो, तितकाच बौद्ध, महार किंवा चांभार असण्याचा अभिमानही या लोकांमध्ये असतोच. याला कारणही आजकालच राजकारण हेच आहे, जे एकमेकांना जातीपातीवरून भेदभाव करून सत्ता मिळवायची शिकवणूक या पुढाऱ्यांना देतं. जर का तसं नसतं तर बसपा, रिपाई, सपा वगैरे वगैरे पक्षांची निर्मितीच झाली नसती. फेसबुकवर जातीच्या लोकांना एकत्र आणण्याच्या नावाखाली जातीभेद करणाऱ्या पेजेसची निर्मिती झाली नसती. त्यांना भरभरून मिळणाऱ्या लाईक्स मधून याची प्रचीती येऊ शकते.

ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत तितकीच खरी आहे मग तो कोणत्याही जातीचा असो. प्रत्येकाला आपल्या जातीचा अनाठायी अभिमान असतो. ग्रामीण भागात याचं प्रमाण प्रकर्षाने जाणवतं. कित्येकदा आपणच आपल्या पुरती सीमा रेषा आखून घेतलेली असते. मी भेटलोय अशा माणसांना ज्यांना काही कारण नसताना तथाकथित सवर्ण लोकांशी वावरताना मनात असुरक्षितता असते. जी त्याना समाजात एकरूप होण्याला प्रतिबंध करत असते. पर्यायाने एकमेकांबद्दल दुस्वासाची भावना आणखीनच वाढीस लागते.

बाबासाहेब असोत, शिवाजी महाराज असोत, गांधी असोत किंवा आणखी कुणी महापुरुष असोत, या आंधळ्या अनुयायांना तो महापुरुष किती कळलेला असतो देव जाणे? या येणाऱ्या लोंढ्यापैकी किती जणांना बाबासाहेबांची शिकवण कळलेली असते त्याचं त्यांनाच माहित. तसं असतं तर त्यांनी बाबासाहेबांच्या आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी इतका हट्ट धरला नसता. 

बाबासाहेबांबद्दल मला आदर आहे. त्यांनी जे कार्य केलंय ते खरंच महान आहे पण आपण स्वत:ला प्रश्न विचारायला हवा की खरंच आपण त्याचं कार्य पुढे नेतोय का? त्यांना अपेक्षित असलेला बहुजन समाज खऱ्या अर्थाने प्रगत झालाय का? नसेल तर स्मृतीस्थाळावर शेकडो काय अनंत मेणबत्त्या लावून सुद्धा आपल्याला त्यांना श्रद्धांजली नाही देता येणार. जेव्हा आपण शिक्षणाचं महत्व जाणून आपल्या पुढच्या पिढी पर्यंत ते पोहोचवू ती खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली असेल. तोवर अशा जत्रा होत राहणार आणि असे अंधश्रद्ध लोंढे निघत राहणार. 

-विनायक कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा