रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

अरबांच्या देशात... भाग ८

तिसरा दिवस खरंतर स्पेशल होता. आज कुठे अरबांच्या देशात आल्याची खरी मजा अनुभवणार होतो. आम्ही (मी, सत्यजित, प्रीती आणि भूषण) मिळून दुबई फिरायचा बेत आखला होता. मी आल्यापासून त्याचा बंदोबस्त करायच्या कामात होतो. शटल बस मध्ये भेटलेल्या एका केरळी ड्रायवरला विचारून हे सगळं जुळवून आणायची तयारी केली होती, पण काल दिवसभर त्या ड्रायवरचा कुठेच पत्ता नव्हता. मग त्या कॉन्फरन्सच्या केटरिंगवाल्याशी बोलून पर्यायी बंदोबस्त केला. तो सुद्धा मल्याळीच होता. यु. ए. ई. मध्ये बहूतेक जितके अरब असतील तितकेच मल्याळी सुद्धा!! ही अतिशयोक्ती असली तरी मलयाळम ही अरबी, इंग्रजी आणि हिंदी नंतर यु. ए. ई, मध्ये बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. त्या केटरिंगवाल्या तरुणाचं नाव जितीन. त्यानं त्याच्या एका टॅक्सी ड्रायवर मित्राला सांगून आमचा फिरायचा बंदोबस्त केला. बऱ्याचदा कॉन्फरन्स ऑर्गनायझरच अशा प्रकारच्या एक दिवशी पिकनिक अरेंज करतात, पण आता या इतक्या खातिरदारी नंतर ("पाहुणचार" हा शब्द तुटपुंजा वाटतो, कारण तिथल्या शाही व्यवस्थेला "खातिरदारी" हाच शब्द योग्य वाटला) या ऑर्गनायझर्स कडून आणखी काही अपेक्षा करणं म्हणजे जरा अतीच झालं असतं. 

तिसऱ्या दिवशीचं दुपारच्या शेड्युलला दांडी मारून उरलेला सबंध दिवस फिरायचा प्लान होता. तसा तो ड्रायवर दुपारी २ च्या सुमाराला आला आणि आम्ही निघालो सुद्धा. योगायोगाने म्हणा की सुदैवाने तो सुद्धा मल्याळीच होता. ती गाडी जिला बघून आपल्याला टॅक्सी म्हणावसंच वाटणार नाही, अशी होती. टोयोटा किंवा इंडिगो सारखं प्रचंड मॉडेल. दुबईतल्या आणि मुंबईतल्या टॅकस्या यांच्यात रंगाचंच काय ते साम्य. बाकी दुबईचा थाट इथे नाही. रेसोर्टचा परिसर सोडला आणि वाळवंटातून निघालो. भरधाव. साधारण १२० ही वेग मर्यादा पण १० पुढे-मागे चालतं. "वाळवंटात ठीक आहे पण शहरात सुद्धा?" "हो" असं त्याचं उत्तर. ड्रायवरच्या त्या वाक्यावर मी चाटच पडलो. १०० किमी च्या अंतराला फक्त पाऊण तास लागणार होता. आजूबाजूचं दृश्य डोळ्यात साठवत, ड्रायवरशी बोलत आम्ही पुढे जात होतो. वाळवंट संपून एकदम शहरात कधी आलो कळलंच नाही. आधीच म्हटल्याप्रमाणे ही शहरं वाळवंटातच वसलेली असल्यामुळे आपण कधी तळ्यात-कधी मळ्यात असं लहानपणीच्या त्या खेळाप्रमाणे रिंगणाच्या आत-बाहेर उड्या मारत असतो. पण क्षितीजावरच्या त्या उंचच उंच इमारती क्वचितच नजरेआड होतात. कुठूनही त्या खुणावत राहतात. 


आज त्या उंच इमारतीनाच जवळून बघायचा योग आला होता. टॅक्सी भरधाव सुटली होती आणि रेडियोवर हिंदी गाणी लागली होती. आम्ही मात्र त्या गाण्याच्या सुरांना कानाडोळा करून बाहेरचं दिसेल तेवढं डोळ्यात साठवायचा प्रयत्न करत होतो. १. दुबई मॉल, २. बुर्ज खलीफा नावाचा जगातला सर्वात उंच टॉवर, ३. बुर्ज अल अरब हे सप्ततारांकित होटेल, ४. समुद्रात भराव घालून तयार केलेल्या पोफळीच्या झाडाच्या (palm tree) आकारातल्या जमिनीवरचं अटलांटीस हॉटेल अशी चार-पाच ठिकाण आजच्या दिवसात फिरायचा प्लान होता. यातलं दुबई मॉल, बुर्ज खलीफा आणि दुबई फाउंटन हे एकाच ठिकाणी होते. आणि फाउंटन शो संध्याकाळी ७ ला सुरु होणार होता. म्हणून आम्ही ते सगळ्यात शेवटी ठेऊन आधी अल अरब होटेल आणि मग अटलांटीस होटेल हे आधी बघायला निघालो. 

मुंबईत असं रस्त्यावर उभं राहून एखादा मॉल, हाजी अली किंवा नेहरू तारांगण यांना डोळ्यात विलक्षण कौतुक आणून कितीतरी वेळ न्याहाळत राहणारी लोकं मी पाहिली आहेत. त्यांची गंमत वाटायची. मला त्यांच्या डोळ्यातल्या कौतुकाचं गुढ कधी कळलंच नाही. माझ्यासाठी त्या इमारती रोज तिथेच होत्या आणि कायम तिथेच राहणार होत्या. पण त्या माणसासाठी तो एक नवीन अनुभव होता. ते इथं आल्यावर समजलं. म्हणतात ना "स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही" तसंच काहीसं. पण इथं या ठिकाणांवर फिरताना सुद्धा मला त्या इमारतींमध्ये फार रस होता असं नाही. त्यापेक्षा त्यांच्या समोरचा स्वच्छ, पांढऱ्या वाळूचा आणि हिरव्या पाण्याचा समुद्रकिनारा जास्त आकर्षित करत होता. मुंबईत असा समुद्र किनारा शोधून सापडणार नाही. म्हणून कदाचित मला त्याचं जास्त कौतुक होतं. पण त्याच्यावर निवांत वेळ काढायला आम्हाला तेवढी वेळेची अनुमती सुद्धा नव्हती. म्हणून दिसेल ते शक्य तितकं डोळ्यात साठवून पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. संध्याकाळी दुबई मॉल जवळ येऊन पोहोचेपर्यंत साधारण ६ वाजले होते. तासभर काय ते मॉल बघून बाहेर येऊन फाउंटन शो बघायचा होता. तसं मॉल मध्ये वेगळं असं फक्त एक मोठंच्या मोठं दुमजली मत्स्यालय (Aquarium) होतं. ते असंही उभं राहून दिसत होतं. पण त्याच्या आतून बोगदा सदृश्य रस्त्यातून जायला तिकीट लावलं होतं. तसं ते आतून जाऊन बघण्याइतका वेळही नव्हता आणि उत्साह सुद्धा. अजून बराच मॉल फिरून व्हायचा होता. साधारण त्या फाउंटन शोची वेळ झाली की आपल्याला ते कळतं. कारण, मॉल मधली सगळी लोकं अचानक एकाच दिशेने जायला लागतात. आम्हीही तोच रस्ता धरला.


जसा सूर्य अस्ताला जात होता तसं समोरच दिसणाऱ्या उंचच उंच, चांदीसारख्या चमकणाऱ्या बुर्ज खालीफाच्या इमारतीवर ढगांचं प्रतिंबिंब जाऊन, आता काळोखात ती अजूनच चमकत होती. त्याच्यावरचे दिवे त्याची अजूनच शोभा वाढवत होते. बरेच लोक कॅमेरा एकदम जमिनीला टेकवून शक्य तितकं पूर्ण इमारतीचा फोटो घ्यायचा प्रयत्न करत होते. ते खरंच शक्य नव्हतं. आणि एकदम घटका भरल्याप्रमाणे लोकांची चलबिचल वाढली. अजून फाउंटन शो सुरु व्हायला दोनेक मिनिटं बाकी होती. सगळी लोकं श्वास रोखून, मोक्याची जागा पटकावून ते सुरु व्हायची वाट बघत होती. आधी एखाद दुसरी पाण्याची धार उडाली. कदाचित लोकांचं लक्ष वेधण्यासाठी असावी ती. आणि मग एका अरबी गाण्याच्या तालावर त्या पाण्याची अनेक कारंजे साधारण दहा मिनिटे नाचत राहिली. ज्याने आधी म्हैसूर किंवा पैठणची अशा प्रकारची म्युझिकल फाउंटन पहिली असतील त्याला त्याचं विशेष कौतुक वाटणार नाही. पण मी पाहिलेल्या म्हैसूरच्या कारंजापेक्षा हे कितीतरी पटीने मोठं होतं. 


कारंजं पाहून सगळेच परतीच्या वाटेल लागतात. आम्हीही ठरलेल्या ठिकाणी वाट बघणाऱ्या आमच्या टॅक्सी ड्रायव्हरकडे निघालो. मॉल मध्ये खरेदी करण्यासारखं काही वाटलं नाही. जवळच्या माणसांसाठी भेट म्हणून आम्ही काही कि-चेन्स आणि बुर्ज खलीफा च्या तळहाताएवढ्या replica विकत घेतल्या. वाटेत दोन माणसं मराठीत बोलताना ऐकलं. त्यांच्याशी थोडं बोलणं झालं. दुबईतल्या मराठी मंडळाबद्दल. असं सगळं रमत-गमत पार्किंग मध्ये गाडीकडे आलो. ड्रायवर वाट बघतच होता. लगेच गाडी सुरु करून परत रिसोर्टचा रस्ता धरला. एव्हाना अंधार झाला होता. दुबईचा झगमगाट मागे टाकून पुन्हा वाळवंटात कधी आलो कळलंच नाही. मन मात्र अजूनही तिथेच कुठेतरी होतं. कधी पांढऱ्या शुभ समुद्रकिनाऱ्यावर रेंगाळलेलं, तर कधी आभाळाला छेदून जाणाऱ्या त्या उंच इमारतींच्या टोकाचा ठाव घेत राहिलेलं...

२ टिप्पण्या: