रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

मीटर डाऊन

कळायला लागल्यापासून मुंबईच्या रस्त्यावरच्या तीन गोष्टी कायम बघत आलो. एक माणसांची गर्दी, दुसऱ्या बेस्ट "BEST" बसेस आणि तिसरी म्हणजे काळी बॉडी आणि पिवळ्या टफाच्या, ओबड-धोबड वाटणाऱ्या, जाडजूड फियाटच्या (Fiat) टॅकस्या (टॅक्सीचं अनेकवचन ). 

लहानपणी कसलं अप्रूप होतं त्यांचं! शाळा जवळच असल्यामुळे टॅक्सीनं जायचा प्रश्नच नव्हता. येताना रस्त्यातनं असंख्य टॅकस्या दिसायच्या. भरधाव जाणाऱ्या आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या. कधी पेट्रोल पंपावर लाईन लावून तर कधी नुसत्याच उभ्या राहिलेल्या. आम्ही शाळेच्या दरवाजात शिरताना जशी लावायचो तशी. त्याच्या ड्रायवरच्या शेजारच्या सीटचं किंवा जास्त माणसं असतील तर खिडकीच्या बाजूच्या सीटचं कोण कौतुक होतं. त्यांच्यावरून ज्यांची भांडणं झाली नसतील, ती भावंडं कसली! मोठा होईपर्यंत काही मला पुढच्या (ड्रायवरच्या शेजारच्या) सीटवर बसायची संधी मिळाली नव्हती. तेवढंच कुतूहल ते मीटर फिरवायचं. 

मला आठवतं, आम्ही शाळेत असताना एक खुळ निघालं होतं. ज्या टॅक्सीच्या नंबर प्लेटवर "MMT" ही अक्षरं असतील, तिला हात लावायचा. ते लकी असतं असं म्हणायचे. (म्हणजे या सगळ्या लहानपणीच्या कल्पना. ) तशी MMT ची  टॅक्सी पण दुर्मिळच होती. म्हणूनच कदाचित कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून हि कल्पना आली असेल. शिवाय त्याखेरीज इतर नंबर प्लेटची गंमत वाटायची. "MRO" चं पण तसंच. दिसताच क्षणी "ए-मारो" म्हणून सोबतच्याला मारायचं. आता गंमत वाटते आठवलं तर.  खरंतर बावळटपणाच होता तो. पण प्रत्येकाने आपापल्या लहानपणी असं काहीतरी विचित्र केलेलंच असतं. पुढे मोठे झाल्यावर आठवून हसण्यासाठी. 
टॅक्स्यांच्या मागे लिहिलेलं "भाईंदर" "बोरिवली", "ठाणे", नवी मुंबई" आणि कधी कधी "एस्सेल वर्ल्ड" असं वाचत रहायचं. "हे असंका लिहितात?" असं नेहमी वाटायचं. अजूनही कोडं सुटलेलं नाही पण कदाचित "त्या नाव लिहिलेल्या जागी जायला ड्रायवर एका चाकावर तयार आहे" असं कदाचित सांगायचं असेल. आणि "बंटी-चिंटी-पिंट्या" किंवा "गणपती बाप्पा मोरया, जय माता दी, ७८६, अण्णांची पुण्याई-आईचा आशीर्वाद-दादांची कृपा" हे तर होतच शिवाय "बँक ऑफ महाराष्ट्र च्या सौजन्याने" असं काहीतरी हमखास असायचंच.

असो, त्या फियाटच्या  टॅक्सीच्या प्रवासाची कालपरवा पर्यंत गंमत वाटत होती. जोपर्यंत नवीन चकचकीत santro, omni किंवा Indica च्या टॅकस्या रस्त्यावर आल्या नव्हत्या. त्या जुन्या फियाटच्या टॅक्सीनं जायला टाळायचो. माझ्या बहिणीची मुलगी तर हट्टच करायची नवीन टॅक्सीनंच जायचं. आता त्या जुन्या फियाटच्या टॅकस्या सरकार पूर्णपणे बंद करणार आहे याची बातमी वाचली. आता त्या टॅकस्या जुनाट झाल्यात असं सरकारचं म्हणनं आहे. थोडासा वादही चाललाय की सरसकट सगळ्याच फियाटच्या टॅकस्या बंद करायच्या का ? म्हणून. असो. डबल डेकर बस मागोमाग आता या जुन्या टॅकस्या पण नामशेष होणार बहुतेक. थोडसं nostalgic व्हायला झालं.

"खडाड खाट" करून, किंचितसा आपल्या अंगावर रेलून, बाहेर डोकावून 
ड्रायवर जेव्हा मीटर फिरवायचा…  का कोण जाणे, एक वेगळीच मजा यायची. 
तो आवाज कानात घुमायचा, अन् काही काळासाठीच का होईना,
पण आपण गाडीत बसलोय याचा विचार करूनच स्वारी मनातल्या मनात खुश व्हायची.

समोरच्या गणपतीच्या फोटोला ड्रायवर नमस्कार करून पहिला गिअर टाकायचा.
"बास झाली पूजा आता, गाडी हलवा इथून' म्हणून आपला उगेच त्रागा व्हायचा.
आधीच आपल्याला उशीर झालाय, पावसानंही ऐन वेळी मोका साधलाय. 
तशात ते मीटर "Do not touch me" म्हणत डोळे वटारून आपल्याकडे बघत असल्याचा भास व्हायचा. 
तेवढ्यात ड्रायवर समोरच्या हातगाडीवाल्याला एक मस्त गावरान शिवी हासडायचा.
"जाऊ द्या हो मामा. साईडने काढा गाडी" म्हणत आपण घड्याळाकडे बघत सुवर्णमध्य काढायचा.

कधीतरी, "नहीं-नहीं…  छः आदमी हम नहीं ले जाउँगा" म्हणत भैयानं भाडं नाकारायचं,
"अरे भैया दोन तो बच्चे हैय, उनको किधर छोड्नेका ??" म्हणत आपण आपलं घोडं दामटवायचं.
"तुम भैया लोगोकोना शिवसेनाच बराबर करता हैय" म्हणत आपण दुखत्या जागी बोट ठेवायचं.
पण, टॅक्सीतून उतरे पर्यंत त्याच भैय्याशी चांगलंच सख्य जमलेलं असायचं.
त्याचं गाव कुठलं, टॅक्सी कुणाची, दिवसभर फिरवायचे किती पैसे मिळतात? सगळं आपसूक विचारलं जायचं.
शेवटी माणसाच्या परिस्थितीला माणूसच हळवं व्हायचं.

आता त्या जुन्या मीटरचा खडखडाट नाही
की त्याची गाडीच्या वेगासोबत धावणारी मीटरची बुब्बुळं नाहीत.
नव्या जमान्याचा नवा ताल, काळ्या बॅकग्राउंडवर डिजीट्स लाल… 
नव्या गाड्यांचं सुंदर रुपडं, हवं कशाला मग जुनाट डबडं… ???
पण खरंतर जुन्या मुंबईची खरी ओळख :
बेस्ट बस, लोकल ट्रेन आणि काळ्या-पिवळ्या फियाटच्या टॅकस्या ठळक.

-विनायक कांबळे 

२ टिप्पण्या: