सोमवार, २९ जुलै, २०१३

पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा...

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा

तिची उलीशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुला देले रे देवान
दोन हात दहा बोट

-बहिणाबाई चौधरी 

बहिणाबाईंच्या "अरे खोप्या मंदी खोपा…" या कवितेतली ही २ कडवी आहेत. (हे खरंतर सांगायची गरज नाही.) तशी ही कविता मी अनेकदा वाचली आहे, ऐकली आहे, पण त्यांच्या या ओळींचा प्रत्यय मला तो पर्यंत आला नव्हता जोवर माझ्या (हॉस्टेलच्या ) रुमच्या बाल्कनीमध्ये एका कबुतराच्या कुटुंबानं जागा आंदण घेतली नव्हती. तसं मी रुममध्ये फार कमी वेळ असतो. आणि त्यात सुद्धा बाल्कनीचा तर कपडे वाळत घालायला जाण्याशिवाय दुसरा काही विशेष संबंधही नव्हता. माझ्या बाल्कनीला लागुनच एक पिंपळाचं मोठं झाड आहे. आणि माझी रूम दुसऱ्या मजल्यावर असल्याने त्या झाडाच्या फांद्या बाल्कनीच्या बऱ्यापैकी आलिंगन द्यायला आल्याप्रमाणे पसरल्या आहेत. 

माझं आणि माझ्या बाल्कनीत त्या कबुतराच्या कुटुंबाचं तसं बरंच चाललं होतं. आम्ही जणू जागा वाटून घेतली होती. मी खोलीत आणि त्यांनी बाल्कनीत. एकमेकांच्या राज्यात आम्ही सहसा हस्तक्षेप करत नव्हतो. आत खोलीत माझा पसारा- कपडे, पुस्तकं, laptop. आणि बाहेर बाल्कनीत त्यांचा- वाळलेली पानं, काटक्या आणि उरलेल्या सबंध बाल्कनीत त्यांची हगणदारी. मी सहसा ते साफ करायच्या फंदात पडत नसे. एका कोपऱ्यात त्या कड्या आणि पानांचंच त्यांचं घरटं आणि त्यात त्याची अंडी. आणि ती अंडी उबवणारी कबुतरीण कायम त्यांच्यावर बसलेली. मी दरवाजा थोडा जरी किलकिला केला तरी भुर्रकन उडून जाऊन त्या पिंपळाच्या फांदीवर जाऊन बसणारी. आणि मग मी गेल्यावर परिस्थितीचा अंदाज घेऊन परत येउन बसणारी. 

थोड्याच दिवसात तिची सुद्धा भीड चेपली आणि मग माझ्या येण्या जाण्यालापण ती तशी दाद देईनाशी झाली. पण अचानक दरवाजा उघडण्याच्या आवाजाने मात्र दचकून पुन्हा उठून पिंपळाच्या फांदीवर बसण्याची सवय कायम होती. एव्हाना दरवाजा सावकाश उघडायची मला सुद्धा खबरदारीयुक्त सवय लागली होती. 

काही दिवसापूर्वी माझ्या रूमवर काही लोक पाहुणे म्हणून येणार होते, म्हणून हॉस्टेलच्या कामगारांना बोलावून रूम स्वच्छ करून घेतली. तशी खोली स्वच्छच होती, त्यांना कष्ट पडले ते, ती बाल्कनी खरडून खरडून साफ करण्याचे. "तिथल्या अंड्याचं काय करायचं ?" म्हणून त्यांनी विचारलं. मी म्हटलं "आता एका बाजूला ठेवा, पण साफ झाल्यावर होतं तिथे ठेवा." पक्ष्यांची असली तरी आई ती आईच. आपल्या पिल्लांना शोधात ती येणारच. आणि त्या जागी ते नाही सापडलं तर? -

त्यांनी मस्त सगळं स्वच्छ करून ते अंडं होतं तिथे ठेवलं. त्या नंतर मी त्याकडे जरा दुर्लक्षच केलं. रोज थोड्या थोड्या प्रमाणात काटक्या आणि वाळलेली पानं येऊन बाल्कनीच्या त्याच कोपऱ्यात येऊन पडत होती. तेही इतक्या बेमालूमपणे की रोज ते बघून सुद्धा मला त्याची जाणीव होऊ नये. आणि आज पाहिलं तर, बऱ्यापैकी होतं तसं काटक्यांच्या शेजवर पानं अंथरून ती कबुतरीण पुन्हा अंडं उबवत बसलेली. "हे इतकं सगळं इथं कधी आलं?"

एकदम बहिणाबाईंची ती कविता आठवली. "अरे खोप्या मधी खोपा, सुगरणीचा चांगला. देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला.. " काय विलक्षण चिकाटी असते नाही या पक्ष्यांची? इतका संयम की एकेक काडी आणि पान जमवून घरटं तयार करायचं, पण कधी नैसर्गिक तर कधी मानवाच्या रुपात संकटं येऊन त्याचं होत्याचं नव्हतं करतं. पण त्यांची जिद्द आणि संयम त्यांना पुन्हा ते होतं तसं उभारायला मदद करतं. आपल्याला पण यातून काही शिकता आलं तर खूप बरं होईल नाही?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा