रविवार, १४ जुलै, २०१३

अरबांच्या देशात... भाग ७

दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा ८ वाजून गेले होते. कॉन्फेरेंस ९ ला सुरु होणार होती, त्याच्या आधी सगळं आवरून, नाश्ता करून पोहोचायला हवं होतं. पलीकडल्या खोलीत जाऊन पाहिलं तर सत्यजित रात्रीच कधीतरी येउन झोपला होता. त्याला उठवलं. काल रात्री त्याच्या सोबत मोठा किस्सा झाला होता. सत्यजितचं पोस्टर दुबई एअरपोर्ट वर आलंच नव्हतं. त्याची चौकशी करण्यात त्याला उशीर झाला आणि शेवटची शटल बस चुकली. त्याला पोस्टर तर मिळालं नाहीच पण शिवाय taxi करून यावं लागलं. पहिल्यांदाच  परदेशात आलेल्या व्यक्तीला रात्री २ वाजता taxi करून १०० किलोमीटर लांब अनोळखी ठिकाणी जायचं तसं थोडं धाडसाचंच म्हणालायला पहिजे. त्यात ज्या कामासाठी आलो ते पोस्टर आलेलं नाही म्हणजे काय विचित्र अवस्था असेल त्याची! असो. 

आम्ही तयार होऊन खाली रेस्टोरंट मध्ये आलो, खायला खूप काही होतं पण उशीर झाल्यामुळे कसंबसं पटापट आवरलं. हॉलमध्ये पोचलो तेव्हा उद्घाटन सोहळा सुरु होऊन संपत सुद्धा आला होता. शेख चं भाषण सुद्धा झालं होतं. एक बाई काहीतरी सादर (present) करत होत्या. त्या तिथल्या स्थानिक युनिव्हर्सिटी किंवा तत्सम संस्थेच्या वाटत होत्या, कारण एकूण यु. ए. ई. मधल्या विज्ञान आणि संशोधन विषयी घडामोडींची माहिती देत होत्या. बघून कळत होतं की एकूणच सरकार या संबंधी खूप जागरूक होतं आणि बऱ्याच अंशी लोकांना विज्ञान आणि संशोधनासाठी प्रोत्साहन देत होतं. पण तिथल्या रस अल खैमह च्या इन्स्टिट्युट च्या काही लोकांशी नंतर बोलून कळलं की परिस्थिती काही फारशी बरी नव्हती. कुणी फारसं संशोधनाकडे वळू इच्छित नाही आणि त्याहीपेक्षा तिथली शालेय शिक्षणाची परिस्थिती पण तशी आल-बेलच होती. अशी माहिती तिथल्या रस अल खैमह च्या इन्स्टिट्युट मध्ये शिक्षिकेचं काम करणाऱ्या एका भारतीय वंशाच्या बाईंकडून मिळाली. त्या तिथे गेली वीसेक वर्ष काम करत होत्या. त्यांना याची बऱ्यापैकी जाणीव होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी भारतात पाठवलं होतं. त्याही उपर तिथे स्थानिकांसाठी एक कायदा आणि परकीयांसाठी वेगळे कायदे आहेत. कितीही वर्षे राहिलं तरी तिथलं नागरिकत्व न मिळणं आणि बरेच असे इतर नियम. 

Conference hall
उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यावर शेख निघून गेला आणि रेग्युलर कार्यक्रमाला सुरुवात झाली. ३ दिवसांचं वेळापत्रक तसं काहीसं  (इतर कॉन्फेरेन्सेस सारखंच) एकसूरीच (monotonous) होतं. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत एकेका तासांचे talks आणि मधल्या वेळेत खाणं-पिणं इतकंच. संध्याकाळी ५ ते जेवण वेळे पर्यंत (म्हणजे साधारण ८ वाजेपर्यंत ) पोस्टर्सचं प्रदर्शन. काहींचं पहिल्या दिवशी काहींचं दुसऱ्या दिवशी. माझं, सत्यजित आणि प्रीतीचं नाव पहिल्या दिवसाच्या यादीत होतं. पण यांच्या पोस्टर्सचा हा असा घोळ होऊन बसलेला. एअर लाईन्सवाल्यांनी पत्ता घेतला होता आणि ते इथे आणून देणार होते पण वेळ निघून गेल्यावर पोस्टर येऊन काही उपयोग नव्हता. म्हणून पुन्हा नव्याने पोस्टर प्रिंट करायला पाठवले (बहुतेक २५ किमी लांब असलेल्या रस अल खैमह शहरातून ). आणि ते नवीन प्रिंट केलेले पोस्टर आणि गहाळ झालेले पोस्टर दोन्ही एकाच वेळी साधारण ३ च्या सुमारास आले. पण चांगली गोष्ट म्हणजे या नवीन प्रिंटिंगचे पैसे आयोजकांनी दिले होते. दुपारच्या जेवणानंतर सुस्तावलेल्या वातावरणात उरलेला कार्यक्रम पार पडला सगळे चला हॉलबाहेर पडले. अजून पोस्टर प्रदर्शन सुरु व्हायला तासभर होता. आम्ही तेवढ्यात आजू बाजूचा समुद्र किनारा फिरून यायचं ठरवलं पण चहाच्या वेळी आमची एका फ्रेंच प्रोफेसरशी ओळख झाली आणि त्याने प्रीतीला तिचं पोस्टर दाखवायला सांगून चांगलं २०-२५ मिनिटं तिला गुंतवून ठेवलं आणि आम्हाला जाता आलं नाही. खरंतर त्या प्रोफेसरच "फक्त मुलींच्या" पोस्टर आणि रिसर्च मध्ये "विशेष रस" दिसत होता. 


Me in Sheikh's chair

Me with prof. CNR Rao

from Left Abbos, Yasin, Priti, Me, Natalie and Satyajeet

पोस्टर्सच्या प्रदर्शनात शेख स्वतः येणार होता. सगळीकडे लगबग सुरु होती. एकूण सगळा थाट राजेशाहीच होता. त्याची बसायची खुर्ची (सिंहासनच होतं ते ) एकदम साजेशी होती. पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी प्रत्येक जण आपापल्या पोस्टर जवळ उभे राहून ते बघणाऱ्यांना लोकांना समजावून सांगत होते आणि त्यांच्या शंकाना उत्तर देत होते. तेवढ्यात शेख आला आणि त्याने प्रत्येक पोस्टर जवळ जाऊन त्यांच्या सोबत फोटो काढून घेतले. शक्य तितकं समजावून घेतलं. दुर्दैवाने मला 'माझा शेख सोबतचा फोटो' त्यांच्या फोटोग्राफर कडून घेता नाही आला. बरेच लोक हॉलमध्ये होते. त्यात कुणीतरी "अज्ञात" व्यक्ती परीक्षक पण होते. पण एकूणच शेखच्या उपस्थितीने भारावलेल्या लोकांना त्याचं टेन्शन दिसत नव्हतं.

ते उरकल्यावर आम्ही शक्य तितकं खाऊन पुन्हा आपापल्या मार्गाला लागलो. बीचवर जायचा कार्यक्रम आखला होता. पुन्हा एकदा मी, सत्यजित, प्रीती आणि अब्बास असे चौघे आधी आमच्या (माझ्या) रूमवर गेलो. प्रीतीला एव्हाना आम्ही आमच्या रूमचं खूप कौतुक ऐकवलं होतं. ती तिला बघायची होती आणि तसाच bags टाकून बीचवर जाणार होतो. पण रूम येऊन सगळेच जरासे सैलावले. किचनमध्ये ४ लोकांना चहा करता येईल इतकं साहित्य होतं. आम्ही चहा करून मस्त बाल्कनीत गप्पा टाकत बसलो. पुन्हा बऱ्याच वेळाने प्रीती आणि अब्बासने आपापल्या खोल्यांची वाट धरली आणि आम्ही आमच्या शयनगृहाची...

 २ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. खरंय तुझं!खूप दिवस झालेत त्याला आता, पण खरंतर ते लिहायला बसलं की ओघानं एकामागोमाग एक प्रसंग आठवत जातात. आणि फोटोस आहेतच की. पण आता आवरतं घ्यावं म्हणतो. बघुयात कुठवर आठवतंय ते.. :-)

      हटवा