बुधवार, १९ जून, २०१३

The Song that I came to sing...

कवितेचा भाव हा कवितेचा आत्मा असतो. तो जर का गवसला तर शब्दांची निवड, जुळणी आणि यमक-छंद वगैरे प्रकार गौण ठरतात. भाषांतर करताना मूळ कवीच्या कल्पनेला धक्का लागू न देता, केवळ त्या भाषेतून या भाषेत रूपांतर करायचं, ही मूळ भाषांतराची संकल्पना. त्याला इंग्रजीत translation पेक्षा transformation हा शब्द मला जास्त योग्य वाटतो.
पण बऱ्याचदा कित्येक  वाचक कवितांचे आपापल्या सोयीने अर्थ काढतात. त्यात गैर काहीच नाही. ते एखाद्या अमूर्त (abstract) चित्रामध्ये आपल्याला हवा तो आकृतीबंध शोधण्यासारखे आहे.  ग्रेस, आरती प्रभू, कुसुमाग्रज, बोरकर किंवा रवींद्रनाथ टागोर असोत? एका सक्षम  कवीच्या (लोकप्रियता हा केवळ निकष नाही) काव्याचा (त्याला अपेक्षित असलेला) अर्थ लावणं,  ही एक प्रकारची कसोटीच असते.

काही दिवसापूर्वी कवी रविंद्रनाथ टागोरांची "The Song that I came to sing..." ही कविता कुठेतरी वाचनात आली. तसे टागोरांच्या इतर कवितांच्या मानाने याचं इंग्रजी तसं सोपं आहे. पण तरीही ती समजायला थोडा वेळ घेते. इतकी आवडली की, तीचं मराठीत भाषांतर करायचा प्रयत्न केल्याशिवाय राहवलं नाही. जमेल किंवा नाही हा भाग वेगळा होता, पण प्रयत्न करायचा विचार होताच. कवी रविंद्रनाथ केवळ कवी म्हणून नाही तर एक आदर्श आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून अनेकांचे (माझे सुद्धा) श्रद्धास्थान आहेत. म्हणून उगाच कवितेच्या अर्थाशी प्रतारणा करायची इच्छा नव्हती. म्हणून मी या कवितेचा नेटवर अर्थ शोधायचा प्रयत्न केला आणि मला दोन वेगवेगळे अर्थ सापडले. दोन्ही अर्थ तसे पाहता व्यवस्थित जुळत होते. 

एक अर्थ असा होता की एक विधवा स्त्री आपल्या अकाली मृत्यू आलेल्या नवऱ्याच्या आठवणीत हे म्हणते आहे. तर दुसरा थोडा आध्यात्मिक होता. दुसऱ्या अर्थाप्रमाणे आपल्याला परमेश्वराने एका विशिष्ट हेतूने या भूतलावर पाठवले आहे. असं एक गाणं परमेश्वरानं प्रत्येकाला दिलेलं आहे, जे त्याला इथून जाण्यापूर्वी (मृत्युपूर्वी ) गायचे आहे. त्याला कवी आपला जीवनाचा हेतू मानतो आणि या जीवन काळात तो हेतू साध्य करणे हे आपले कर्तव्य आहे. फक्त तेच लोक खऱ्या अर्थाने हे जीवन जगतात जे ते गाणं गातात. सोप्या शब्दात सांगायचं तर बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टीची पूर्व तयारी करण्यातच आपला वेळ आणि श्रम वाया घालवतो. तो इतका की जे मुख्य काम आहे ते आपल्या हातून होतच नाही. परमेश्वराने हे जीवन जगण्यासाठी दिलय आणि त्याला कुठल्याही पूर्व तयारीची गरज नाही. तो गळा परमेश्वरानं प्रत्येकाला दिलेला आहेच. तुम्ही फक्त गायला सुरुवात करा. तुमचा सूर आपोआपच लागेल

The Song that I came to sing remains unsung to this day.
I have spent my days in stringing and in unstringing my instrument.

The time has not come true, the words have not been rightly set;
Only there is the agony of wishing in my heart. The blossom has not opened; only the wind is sighing by.

I have not seen his face, nor have I listened to his voice;
Only I have heard his gentle footsteps from the road before my house'.

The livelong day has passed in spreading his seat on the floor;
But the lamp has not been lit and I cannot ask him into my house.

I live in the hope of meeting with him; but this meeting is not yet.

-Guru Ravindranath Tagore


राहून गेले गायचे जे होते, गीत ओठावर आलेच नाही
दवडुनी वेळ सारा बसले, बांधल्या-उसवल्या तारा काही

वेळ कधी ती नाहीच आली, शब्दच कधी ते जुळले नाही
अजून कुठेशी हुरहूर आहे, अंतरात अजुनी सलते काही

वसंत माझा कुठे हरपला, बहर मनाला स्पर्शत नाही 
वारा भरतो फक्त उसासे, जवळूनी माझ्या जेव्हा जाई.

मूर्त त्याची अनोळखीच आहे, स्वर कधीसा ऐकलाच नाही
घरासमोरून त्या जाणाऱ्याच्या, पावलांची हलक्या चाहूल येई

दिवस लागे मावळतीला, अन संध्याछाया उजळून येई
अगम्य कैसी कुचंबना ही, हाकारण्या मन धजावत नाही 

अंतरात अजुनी दीप कुठेशी, आशेचा मनी तेवत आहे
घडेल केंव्हा भेट आपुली, प्राणांतिक ज्याची वाट मी पाहे.

-विनायक कांबळे

1 टिप्पणी: