रविवार, २ जून, २०१३

मावळा...

महाराजांना डोळ्या देखत पाहणारा सह्याद्री जर का कधी महाराजांबद्दल बोलू लागला तर कदाचित बाबासाहेबांच्या शब्दातच बोलेल. बाबासाहेब म्हणजे एक मूर्तिमंत चैतन्य आहेत. वयाच्या ९१व्य वर्षी सुद्धा महाराजांबद्दल बोलताना त्यांच्यातली उर्जा ओसंडून वाहत असते आणि ते तल्लीन होऊन बोलत असतात.

त्यांच्या उपस्थितीनेच वातावरणात एक चैतन्य दरवळत असतं आणि आपण त्या चैतन्याने भारावलेलो असतो. सुदैवाने आज तो अनुभव घेता आला. बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळाचे खरंच आभार त्यांच्यामुळे ही संधी मिळाली.

अनेकांच्या समजुतीनुसार बाबासाहेब फक्त शिवचारित्रातले ऐतिहासिक प्रसंग सांगतात. खरंतर तसे नाही. बाबासाहेब शिवचारित्रातल्या प्रसंगांचे दाखले देऊन "शिवाजी महाराज"या असामान्य व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू उलगडून दाखवतात. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, संस्कार, विवेक, धाडस, सामंजस्य अशा अनेक गुणांशी परिचय करून देतात. आजवर आपल्याला महाराजांबद्दल किती त्रोटक माहिती होती याची जाणीव करून देतात. शिवाजी महाराजांच्या नावाने उदोकार करत भगवे झेंडे घेऊन फिरणारे महाराजांना किती जाणतात कुणास ठाऊक? पण "शिवाजी महाराज" ही विचारधारा ज्यांना कळली ते बाबासाहेब कदाचित एकमात्र व्यक्ती असावेत, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.

 येणाऱ्या अनेक पिढ्यांना महाराजांबद्दल बाबासाहेबांच्या तोंडून ऐकण्याची संधी लाभो. देव त्यांना दीर्घायुष्य देवो. जीवेत शरद: शतम् .

२ टिप्पण्या: