शुक्रवार, २४ मे, २०१३

अरबांच्या देशात… भाग ६

६ वाजून गेले होते तरी गर्दी अशी नव्हतीच. काही जेमतेम मोजकीच माणसं होती. मघाशी गाडीत भेटलेले, आणि काही नवीन असे मिळून १०-१५ जणच. त्यात आमच्या इन्स्टिट्युटचे एक प्रोफेसर आणि जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अडवान्स सायंटिफिक रिसर्च (JNCASR in short JNC) चे काही प्रोफेसर एका बाजूला उभे होते. मी त्यांच्याशी ओळख करून घेतली. पण त्यांच्या गप्पांमध्ये मला काही करमले नाही. शेरीफ सुद्धा नवीन ओळखी काढण्यात (आणि खाण्यात ) बिझी होता. त्याला बरेच अरबी मित्र मिळाले होते. म्हणून त्याचं घसा खाकरून अरबी बोलणं जोरात चालू होतं.

एकीकडे एक २-३ जणांचा ग्रुप उभा होता. त्यात एक केम्ब्रिजचे मोठे प्रोफेसर होते. त्यांचं नाव भिडेशिया. भारतीय वंशाचेच होते, ते चेहऱ्यावरून लगेच लक्षात येत होतं. पण जन्म आणि शिक्षण केनिया मध्ये झालं होतं, कारण त्यांचे पालक नोकरी निमित्त तिथे राहायला होते. पुढे उच्चशिक्षण आणि नोकरी दोन्ही केम्ब्रिज विद्यापीठात. स्टील आणि लोह-कार्बन (Iron-Carbon) यांच्या संयुगाच्या संबंधित संशोधानातलं एक मोठं नाव. (http://en.wikipedia.org/wiki/Harshad_Bhadeshia) स्वभावाने खूप साधे आणि बोलके. मुळात गुजराथी माणसं असतातच बोलकी. कायम परदेशात राहत असले तरी त्यांना थोडीफार गुजराथी भाषा येत होती. आम्ही गुजराथी आणि हिंदी भाषेत काही वेळ बोललो. त्यांची संवाद साधण्याची कला खूप विलक्षण होती. त्यांचे अमेरिकेतल्या विमानतळावरच्या सिक्युरिटी चेकिंग संदर्भातले विनोदी किस्से सांगत होते. त्यांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.( त्यामागचा संदर्भ विसरलोय ). एकदा असंच अमेरिकेतल्या एका विमानतळावर एक अमेरिकन सिक्युरिटी ऑफिसरने येऊन त्यांना हटकलं. "Excuse me, Sir" आणि त्यावर ते म्हणाले "When any American security officer calls you 'Sir', it means you are in real trouble.." आणि त्यांच्या त्या वाक्यावर हशा पिकला. ते इतकं लक्षात राहिलं की त्याच्या पुढचा त्यांचा किस्सा आठवत सुद्धा नाही. 

त्या घोळक्यातल्या एकाची (नायुकी त्याचं नाव ) एअरपोर्ट वरच ओळख झाली होती,  तो तोच जपानी माणूस होता, जो माझ्या आणि शेरीफच्या मागे बसून आमचं बोलणं ऐकत होता . त्याच्या सोबत एक चेहऱ्यानी जपानी वाटणारा माणूस होता. पण त्याची उंची साधारण जपानी लोकांपेक्षा जास्तच होती. (जपानी लोक उंचीने बुटके असतात हे मी कुठेतरी वाचलेलं ). त्याची ओळख झाली. त्याचं नाव "मिरब्बोस" (नंतर त्याला मी अब्बासच म्हणायला लागलो ). अब्बासपण खूप बोलका होता. म्हणून लगेचच आमची मैत्री झाली. तो मुळचा उझबेकिस्तानचा, पण टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये रिसर्च असोसीएट म्हणून काम करत होता. त्याला भारताबद्दल बरंच माहित होतं. त्याचे काही भारतीय सहकारी होते, त्यांच्याकडून तो बरंच ऐकून होता. 

थोड्या वेळाने खाऊन झाल्यावर तिथली सगळी लोकांची जत्रा पांगली. मी पण कुठे जायचं हा विचार करत होतो. मग मी नायुकी, शेरीफ आणि अब्बास यांना आधी माझी रूम दाखवायला घेऊन गेलो. त्यांना अल-हमरा विलेजच्या छोट्या छोट्या कौटेजेस मध्ये रूम्स मिळाल्या होत्या. त्यांना माझी रूम भयंकर आवडली. विशेषता: शेरिफ़ला. त्याने पुन्हा एकदा "ऑर्गनायझर हाय हाय… नताली हाय हाय" च्या सुरात त्यांच्या नावानी बोटं मोडायला सुरुवात केली. आणि आपली रूम कशी छोटी आणि दूर आहे हे सांगितलं. मग आम्ही खाली आलो. बीचवर एक फेरी मारून सगळा परिसर नीट बघितला. रात्री वातावरण थोडं थंड झालं होतं. स्विमिंग पूल पाहून अब्बासला राहवलं नाही, त्याने स्विमिंग करायची इच्छा बोलून दाखवली. आणि गंमत म्हणजे त्या पूलचं पाणी थंड नसून उबदार होतं. केवळ त्याखातर मीही तयार झालो. आणि मी पहिल्यांदा त्या थंड वातावरणात आणि उबदार गरम पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला. पोहण्याचा म्हणजे मला जमतं तितकं पोहण्याचा. अब्बास मात्र एकदम पट्टीच्या पोहणाऱ्यासारखा न थांबता सलग पोहत होता आणि मधून मधून त्या पाण्याची आणि पूलची स्तुती करत होता. त्या स्विमिंग पूलची देखरेख करणारा माणूस श्रीलंकेचा होता. बंद करायची वेळ होऊन देखील आमच्या खातर तो थांबला होता. 

पोहण्याचा कार्यक्रम झाल्यावर, आम्ही अल हमरा विलेज रेस्टौरंट मध्ये एक ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम होता तिथे गेलो. हा कार्यक्रम काही खास कॉन्फरंससाठी नव्हता. असे शनिवार-रविवार तिथे नेहमीच कार्यक्रम होत असत. तिथे सगळी रेसोर्ट मधली पर्यटक मंडळी जमली होती. नायुकी आणि शेरीफ काहीतरी सबबी सांगून आले नाहीत, पण मी आणि अब्बास त्या कार्यक्रमाला गेलो.  आम्ही गेल्या गेल्या तिथल्या एका बाईने स्वागत केलं. "काय घेणार" विचारलं. आम्ही म्हटलं कि "आम्ही फक्त बसलो तर चालेल का?" आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता हसून हो म्हटलं. आणि "Please enjoy the Band". असं म्हणून ती बाई  निघून गेली. हे रेस्टौरंट अल-हमराच्या त्या ओळीने लागलेल्या कौटेजेसना लागुनच होतं. तिथं पण शेजारी एक स्विमिंग पूल होता, आणि अंगणात खुर्च्या टेबलं टाकलेली आणि समोर band सुद्धा मस्तच गात होता. American contry music सुरु होतं. मध्येच प्रेक्षकांमधल्या कुणा एकाला गायची लहर आली की गात होते. नाचावंसं वाटलं तर नाचत होते. गम्मत म्हणजे एक साधारण साठीतले आजी आजोबा मध्येच उठून एक गाण्यावर कमरेवर हात ठेवून नाचायला लागले. मी असा प्रकार (प्रत्यक्षात ) पहिल्यांदाच पाहत होतो. मी त्यांचा विडिओ काढायला लागलो, तर मला अब्बासने अडवलं आणि म्हणाला असं करू नको. त्यांना कदाचित ते आवडणार नाही. मग मी ते थांबवलं. आणि त्या सगळ्याची मजा  घेत राहिलो. 
\
थोड्या उशिरा तो कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही तिथून निघालो. अब्बासने मला त्याची खोली दाखवायला घेऊन गेला. दुपारी आल्यावर मधल्या वेळात त्याने  मॉलमध्ये जाऊन बरंच खायचं सामान आणलं होतं. त्यातलं थोडसं खाऊन मी माझ्या रूमवर परतलो. अजून फक्त अकरा वाजले होते आणि एअरपोर्टहून येणारी शेवटची शटल आली नव्हती. सत्यजित त्याने येणार होता. त्याची वाट पाहण्यात अर्थ नव्हता. म्हणून मी रिसेप्शनवर चौकशी केली आणि झोपायच्या उद्देशाने त्या भल्या मोठ्या रूम मध्ये येउन पोहोचलो. खरंतर  प्रवासाचा शीण होता की त्या मऊ-मखमली गादीचा परिणाम म्हणा, कधी झोप लागली कळलंच नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा