शनिवार, ६ एप्रिल, २०१३

अरबांच्या देशात... भाग ४

फोटो सौजन्य : विकिपीडिया 

युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजेच यु. ए. ई. हा देश सात स्वायत्त अरब राजवटींचा मिळून बनलेला देश आहे.  अबू धाबी, शारजाह, अजमान, दुबई, फ़ुजैराह, रस-अल-खैमाह आणि उम्म-अल-कुवैन हि ती सात राज्य. प्रत्येकाचा स्वत:चा  वंश परंपरेने ठरणारा शेख / सुलतान राज्यकर्ता असतो आणि त्या सात जणांची सुप्रीम कौन्सिल असते. हेच लोकं त्यांच्यातून एक राष्ट्राध्यक्ष निवडतात. अबू धाबी ही राजधानी असली तरी दुबई सारखं त्या शहराला वलय (glamour) नाही. किंबहुना जगातल्या सर्वोत्तम शहरांच्या यादीत दुबईचं नाव घेतलं जातं. दुबई एअर पोर्ट वर उतरल्यावर हे जाणवल्याशिवाय राहत नाही.

उतरलो तेव्हा साधारण दुपारचे बारा वाजले होते (तिथले). चेक इन केलेलं सामान किती नंबरच्या बेल्टवर येणार आहे हे साधारणपणे विमानातून उतरताना सांगतात पण आम्हाला तसं काहीच सांगितलं नव्हतं. पुन्हा सेवेची संधी द्या, Have a nice day! वगैरे म्हणून आम्हाला विमानातून चालतं केलं होतं. मी पण उत्साहात बाहेर पडलो होतो. टर्मिनलवर आल्यावर या गोष्टीची जाणीव झाली. म्हटलं बघू जिथे सगळ्यांचं येईल तिथेच माझं पण येईल, म्हणून त्यांच्या मागून चालत राहिलो. पुणे -बंगलोर हायवेवर हिरव्या रंगांच्या बोर्डवर जसं येणाऱ्या गावाची अंतरं लिहिलेली असतात तश्या पाट्या वर डकवलेल्या होत्या. त्यातल्या baggage claim चा बाण जिथे दाखवेल तिथे जायचो. सरळ चालत होतो. मध्येच एका मागोमाग बरेच लांबच्या लांब flat escalators होते. त्याच्यावर उभं  राहून लोक तो लांबचा पल्ला गाठतात  खरंतर खूप अंतर आलो होतो. पण त्या escalators मुळे जाणवलं नव्हतं. मध्येच वीसा काउंटर दिसलं. माझ्याकडे असलेली इलेक्ट्रोनिक वीसाची कॉपी दाखवून ओरिजिनल वीसा मिळवला. परत सामानाच्या शोधात पुढे झालो. पुढे इमिगरेशन चेकचे बरेच काउंटर होते. मी पुढे होणार इतक्यात तिथे उभी असलेली एक मिचमिच्या डोळ्याची मुलगी आली (बहुतेक चायनीज असावी ) आणि मला तिने कोपऱ्या जवळच्या रांगेत जाऊन उभं  राहायला सांगितलं. तिथे गर्दी नव्हती, बाकी मधल्या रंगांमध्ये बरीच गर्दी होती. मी पुढे जाऊन वाचलं तर वर First class असं लिहिलं होतं. मी परत मागे येउन त्या मधल्या रंगांकडे जायला निघालो तर तिने परत मला तिकडे पिटाळलं. मी मनात म्हटलं त्यांनी परत हाकलल्यावर या मुलीकडेच बोट दाखवायचं म्हणून जाऊन त्या लाईनीत उभा राहिलो. एक-दोन माणसं असतील पुढे. मध्ये एक ऑफिसर (पायलट असावा ) एका कुटुंबाला घेऊन मध्ये घुसला. मी शांतपणे माझा नंबर यायची वाट पाहत होतो. काउंटरवर शुभ्र सफेद रंगाचा पायघोळ सदरा, डोक्यावर पांढरं कापड आणि काळी रिंग असा पारंपारिक वेश असलेल्या माणसाने मला बोलावलं, पासपोर्ट घेतला, वीसा बघितला, स्कॅनरकडे बघायला सांगितलं. शिक्का मारला आणि एक चकार शब्दही न बोलता पासपोर्ट-वीसा शिक्का मारून परत दिला. सुटलो एकदाचा. हुश्श करून पुढे झालो. पुढे कन्वेयर बेल्टवर माझी बॅग फिरत होती. ती उचलली. आता अजून काय राहिलंय कळेना. कोणाला विचारायला कुणी ऑफिसर सुद्धा दिसत नव्हता. एका खांबाजवळ, छाती इतक्या उंचीच्या डेस्क मागे एक बाई (पूर्ण बुरख्यात आणि डोक्याला हिजाब बांधून) उभी होती. मी तिला विचारलं की, "मी वीसा घेतला, एमिगरशन चेक आणि डोळ्याचं स्कॅन झालं. बॅगेज मिळालं, इतकंच असतं की अजून काही बाकी आहे बाहेर जाण्यापूर्वी?" तिने म्हटलं की "झालं, आता तुम्ही जाऊ शकता…" माझा विश्वास बसत नव्हता. कारण एकदा मुंबई एअर पोर्ट वर उतरून मी माझी बॅग न घेताच सरळ बाहेर पडलो होतो. मग थोडं पुढे झाल्यावर आठवलं आणि परत आत सिक्युरिटी गार्ड जाऊ देत नव्हते. मग कसं बसं विनंती करून त्यांच्यातल्या एकाला सोबत घेऊन परत आत गेलो आणि बॅग घेऊन आलो. म्हणून तेव्हापासून एअरपोर्ट च्या बाहेर पडण्याआधी मी काही राहिलं तर नाही ना, याची तीन-तीनदा खात्री करून घेतो. त्यात ही दुबई होती. आधीच लोकांनी इथल्या कडक कायद्यांचं भूत माझ्या डोक्यात घुसवलं होतं. परत सगळ्या वस्तू चेक केल्या आणि बाहेर पडलो.

आम्हाला (कॉन्फरन्सला येणाऱ्या) लोकांसाठी दुबई एअर पोर्ट हून रस-अल-खैमाहला त्या हॉटेल पर्यंत सोडायला आयोजकांनी ठराविक वेळेला शटल बसेसची सोय केली होती. पुढची बस २ वाजता होती. मी त्या आयोजकांपैकी कोणी बाहेर दिसतंय का बघत होतो. पण कुणीच दिसत नव्हतं. सगळे कॉर्पोरेट किवा हॉटेलवाले हातात नावाच्या पाट्या घेऊन उभे होते. आता काय करायचं? टर्मिनलच्या गेटला लागुनच एक गेट होता. तिथे आत बसायला खुर्च्या होत्या. जाऊन बसलो. ते दुबई मेट्रोच स्टेशन होतं. तिथे समोर बरीच दुकानं होती. एका दुकानावर बरीच गर्दी होती. ते मोबाईलच्या सीमचं दुकान होतं. एका सीमची किंमत ५० दिरहम. म्हणजे भारतातले ७५० रुपये. चार दिवसासाठी मला ते खर्चिक वाटलं. काही नको याच फोन वर चालवू. त्या आयोजकांचा एक नंबर माझ्याकडे होता. सत्यजितने त्याची येण्या जाण्याची माहिती दिली नव्हती म्हणून आयोजकांनी एकदा त्याला फोन केलेला. तो नंबर मी मागून घेतला होता. त्याच्यावर फोन केला (माझ्याच फोनवरून). त्यांनी सांगितला आमचा माणूस टर्मिनल १ वर उभा आहे. मी तर टर्मिनल १ वरच होतो पण मग मला कसं कुणी दिसलं नाही?  मी परत जाऊन बघितलं. आता एक उंच, गोरा, लांब नाकाचा आणि मोठ्या केसाचा मुलगा तिथे उभा होता हातात कॉन्फारेंसच्या नावाचा बोर्ड घेऊन. मी त्याला जाऊन भेटलो. त्याचं नाव 'किनान'. बस यायला अजून अवकाश होता, त्यांनी मला परत आत आणून त्या सिटींग एरिआ मध्ये बसवलं. आणि होता तिथे जाऊन परत उभा राहिला.

मी बसायला चांगली जागा शोधत होतो (जिथे बॅग आणि पोस्टर होल्डर व्यवस्थित ठेवता आला असता). तोच पाठून एका माणसाने विचारलं. "Have you come for IWAM?" मी मागे वळून बघितलं. एक गोरा, थोडा जाड वयस्कर माणूस मागे बसला होता. वय साधारण ६० च्या आसपास. त्याने विचारलं होतं. मी म्हटलं "Yes…". तो बघून छान हसला. "Oh good to see you! Come, sit here." तो एकदम अधिकारवाणीने बोलत होता. त्याचं नाव प्रोफेसर शेरीफ एलुई. इजिप्त मधल्या कैरो इन्स्टिट्युट मध्ये काम करतो. "I saw your poster holder. So, thought of asking you." तो म्हणाला. मला गंमत वाटली, कारण हे पोस्टर होल्डर वागवायचा मला जाम कंटाळा आला होता आणि त्याच पोस्टर होल्डरने मला सोबत मिळवून दिली होती. प्रोफेसर शेरीफ खूपच मिश्किल आणि jolly माणूस होता. तसा अनोळखी व्यक्तीशी बोलायला माझीही activation energy कमीच आहे. (सोप्या शब्दात सांगायचं तर, मी कुणाशीही सहज बोलू शकतो ). आमच्या गप्पा सुरु झाल्या. लगेचच आम्ही एकमेकांशी खूप comfortably बोलू लगलो. तो माझ्या देशाबद्दल विचारात होता आणि मी त्याच्या. त्याला भारताबद्दल थोडीशी माहिती होती. आणि विशेष करून IISc बद्दल माहित होतं. कारण सी. एन. आर. राव तिथे काम करतात असं तो ऐकून होता. तो बरंच विचारत होता. "भारतात वाळवंट आहेत का? कुठली पिक घेतात वगैरे वगैरे" आणि थोडं बहुत इथल्या संस्कृती विषयी. मग  मी ही माझं नाईल नदी बद्दलचं ज्ञान तिथे पाजळलं.  हे या कॉन्फेरंसला यायचं त्याचं तिसरं वर्ष होतं. त्याचा गेल्या वेळेचा एअर पोर्टहून जाणाऱ्या शटल बसचा अनुभव वाईट होता. गेल्या वेळी बस त्याला न घेताच निघून गेली होती. आणि मग त्याला Taxi करून जावं लागलं होतं. पण तो हे सगळं पण मजा घेऊन सांगत होता. या वेळेला त्याचं फलाईट टर्मिनल ३ ला आलं होतं. तिथून तो Taxi करून टर्मिनल १ ला आला होता. दुबई एअर पोर्ट इतका अवाढव्य आहे की हे टर्मिनल एकमेकापासून बरेच लांब आहेत आणि Taxi ने जावं लागतं. त्यात टर्मिनल ३ फक्त Emirates च्या विमानांकरता राखीव आहे. हे मला त्याच्या कडूनच कळलं.


अजूनही शेरीफला तो बसवाला भेटला नव्हता. माझ्यासारखा तो सुद्धा शोधून इथे येउन बसला होता. मी त्याला सांगितलं की एक माणूस बाहेर उभा आहे. किनानचं वर्णन सांगितलं. शेरीफ त्याला जाऊन घेऊन आला. आणि त्याला दम सुद्धा दिला (प्रेमाने), कि "या वेळी जर बस मला न घेता निघून गेली तर याद राख…" त्याच्या या वाक्यावर किनान फक्त हसला. मग दोघं अरबी भाषेत बोलायला लागले. तेव्हा कळलं अरबी भाषेत बोलणं तेवढं सोपं नाही. घसा खरवडून बोलतात आणि पोटातून आवाज काढतात. म्हणून ते घसा खाकरून काढलेले आवाज कानाला वेगळे वाटतात.

खरंतर शेरीफचा एक (गैर)समज झाला होता. कॉन्फेरेंस च्या लोकांना email करणं आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याच काम एक अमेरिकन मुलगी करत होती. तिचं नाव नताली (Natalie ). शेरीफच्या काही emails ची तिने उत्तर दिली नव्हती. त्याच्या मते तो एका मुस्लिम राष्ट्रातून असल्यामुळे, ती मुलगी कुठल्या तरी पूर्वग्रहाने त्याच्याशी वागत होती. तसं त्याने मला बोलून पण दाखवलं. आणि त्यात ते बसचं त्याला न घेता निघून जाणं त्याच्या चांगलंच डोक्यात बसलं होतं. मी उगाच त्याची समजूत घालायला "तसं काही नसेल, आणि कदाचित तुझा गैरसमज झालाय वगैरे वगैरे…. " असं बोललो.

आमच्या मागे एक जपानी माणूस बसला होता, आणि तो आमच्यासारखा याच कॉन्फेरेंसला आला आहे हे आम्हाला जेव्हा बस आली आणि बसकडे जायला निघालो, तेव्हा कळलं. त्याचं नाव नाही आठवत. या जपानी लोकांची नावं साधी दोन-दोन अक्षरांची असतात पण स्मरणशक्तीची नेहमी परीक्षा बघणारी असतात. आम्ही बस कडे निघालो. १० -१ २ जण बसतील इतकी ती बस होती. आतमध्ये आधीच एक वयस्कर जोडपं आणखी एक माणूस होता. बसला यायला उशीर झाला कारण बस आधी टर्मिनल ३ ला गेली होती, मग २ आणि मग १ अशी फिरत फिरत आली. हे कळल्यावर शेरीफला पुन्हा त्या ईमेल करणाऱ्या मुलीचा राग आला कारण आम्हाला आलेल्या ईमेल मध्ये लिहिलं होतं की बस फक्त टर्मिनल १ वरून पिक अप करेल. आणि म्हणून शेरीफ taxi करून टर्मिनल ३ वरून टर्मिनल १ ला आला होता. त्याने मग त्या लोकांशी अरबी भाषेत वाद घालायला सुरुवात केली. मग काय बोलले कोण जाणे, ते प्रकरण २ मिनिटांमध्ये मिटलं, आणि बस निघायला तयार झाली. सगळे किनानला बाय करायला लागले. "खुदा हाफिज…  वल्लाह.…  माशाल्लाह, सुभानअल्लाह… हबीब" वगैरे वगैरे शब्द कानावर पडत होते. आणि बस निघाली.


लोक तसे एकमेकांपासून सुट्टे सुट्टे बसले होते.  मी खिडकीबाहेर बघत होतो. टळटळीत दुपार झालेली. रस-अल-खैमाह साधारण १०० किलोमीटर दूर होते. पण बाहेर गाड्या भरधाव जात होत्या. त्यांना बघून आमच्याही बसच्या वेगाचा अंदाज येत होता. साधारण ताशी १०० किमी च्या वेगाने जात असावी. हळूहळू शहर मागे जाऊन बस वाळवंटातल्या रस्त्याहून जायला लागली. आजूबाजूचा परिसर बदलला तरी रस्त्याची ठेवण काही बदलली नव्हती. तसाच शहराताल्यासारखा सुंदर आणि दुतर्फा तीन पदरी. पण वाढत्या ऊनामुळे आणि कदाचित इतक्या प्रवासामुळे मरगळ आली होती. कधी एकदाचं हॉटेल वर पोचतोय असं झालं होतं. त्यात त्यांनी येणाऱ्या लोकांची एक लिस्ट दिली होती त्यात आपलं नाव आहे कि नाही शोधायचं होतं. बराच शोधून (दुर्दैवाने) माझं नाव नाहीच सापडलं. शेरीफ म्हणाला काळजी करू नको तिथे दुसरी एखादी लिस्ट असेल तर त्यात तुझं नाव असेल. त्याचा अनुभव कामाला आला. माझ्या मात्र मनात धाकधूक होतीच. नाव नसेल तर? आणि registration चा गोंधळ झाला असेल तर? तिथे गेल्याशिवाय काही कळायला मार्ग नव्हता.


Dubai Airport
    
On the way to Ras -Al-Khaimah
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा