गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

रंग माझा वेगळा…. - सुरेश भट

कॉलेजात असताना दादरच्या मॅजिस्टिक बुक डेपोचा मला नव्यानेच शोध लागला होता. सुरुवातीला आम्ही ग्रुपने ४-५ जण सहज गप्पा मारायला दादरच्या गर्दीने भरलेल्या सेनापती बापट रोड वरच्या एका टोकाला असलेल्या निवांत ठिकाण म्हणून त्या बुक डेपोत जायचो. तिथे पुस्तक वाचत असल्याचा आव आणून खूप गप्पा मारता यायच्या. या इतक्या खजिन्याच्या सानिद्ध्यात असताना सुरेश भटांची पुस्तकं नजरेला न पडणं शक्यच नाही.

'एल्गार' हा सुरेश भटांचा माझ्या हाताला लागलेला पहिला कविता संग्रह. त्या मागोमाग मग रुपगंधा, रंग माझा वेगळा, झंझावात. सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट ही होती की यातल्या बऱ्याच कविता माझ्या परिचयाच्या होत्या. पण कविता म्हणून नव्हे तर चित्रपटांची गाणी म्हणून. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, उष:काळ होता होता, केव्हा तरी पहाटे, मालवून टाक दीप, तरुण आहे रात्र अजुनी, मलमली तारुण्य माझे, आताच अमृताची बरसून रात गेली, चांदण्यात फिरताना माझा धरलास हात… एकसे-एक गाणी. नुसते शब्द म्हणून वाचता येणारच नाहीत. आपोआप चालीवरच ती गुणगुणली जातात इतकी ती गाणी प्रसिद्ध. पण त्याआधी कधी मी सुरेश भटांचं नाव ऐकलं नव्हतं. किंवा ऐकलंही असलं तरी कधी इतकं लक्षात राहिलेलं ते नाव नव्हतं.

या गाण्यांची ओळख पण खरंतर रेडियोने करून दिलेली. सकाळी ७ चं प्रॅक्टिकल असायचं. गोरेगावहून ग्रँट रोडला जायचं म्हणजे तासभर आधी निघायचो. सकाळी ५.४० ची स्लो ट्रेन पकडायची नाहीतर, उशीर झालाच तर अंधेरीला उतरून ६.१४ ची फास्ट ट्रेन. कसंही कमीत कमी पाऊण तास फुरसत असायची. या वेळेचा मी सदुपयोग करायचो रेडिओ ऐकून. (जर तुम्हाला आठवत असेल तेव्हा रेडिओ मिरची च्या नावाखाली छोटे छोटे रेडिओ विकत मिळायचे, खिशात मावतील इतकेच.) पहाटे साडेपाच ते सहा भक्तिगीते आणि सहा ते सात भावगीतांचा कार्यक्रम असायचा. ती पुस्तक वाचून कळलं, कि गेल्या १-२ वर्षात आपला असा एकही दिवस गेलेला नाही, जेव्हा आपण सुरेश भटांचं एकही गाणं ऐकलेलं नाही. या अज्ञात माणसाने वेड लावलेलं होतं ते सुद्धा केवळ शब्दातून.

सुरेश भटांच्या पुस्तकांनी एक वेगळ्या काव्यप्रकाराशी ओळख करून दिली. ती म्हणजे मराठी गझल. त्या आधी असं काही अस्तित्वात असतं हेच माहित नव्हतं. किंबहुना, गझल म्हटलं कि ती उर्दुच हवी, फार फारतर हिन्दी. मराठी गझल कल्पनेच्या पलीकडे होती. मग कळलं एकट्या मलाच नाही तर सगळ्यांना सुरेश भटांनीच मराठी गझलशी परिचय करून दिला होता. मराठीत गझलचं बीज रुजवायचं आणि त्याला खतपाणी घालायचं काम सुरेश भटांनीच केलं होतं. काही लोक अशीही टीका करतात की भटांच्या गझलमध्ये अनेकदा वैफल्य आणि निराशावाद दिसतो. पण भटांनी लिहिलेली प्रेमगीते, आशावादी कविता किंवा गझलही तितक्याच लोकप्रिय आहेत.

सुरेश भटांच्या असंख्य गझल मला जवळच्या आहेत. त्यात बरीचशी गाणीही आहेत. सुरेश भट पुस्तकांनी  नकळत गझलचे काही नियम शिकवून गेलेयत. गेल्या १५ एप्रिल ला सुरेश भटांचा स्मृतीदिन म्हणून कुठेतरी वाचलं आणि एकदम नजरेसमोरून मॅजिस्टिक बुक डेपो, तिथली पुस्तकं, रेडिओ, गझला सगळे तरळू लागले. ह्या त्यापैकी काही नक्कीच लक्षात राहणाऱ्या रचना… 

                      (१)
जगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी
आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी

झाले कशाचे बोलणे? केले जरा मन मोकळे !
जे राहिले सांगायचे ते टाळले अजिबात मी

माहीतही नाही मला आलो इथे केव्हा कसा
मीही अताशा एकतो ….. दिसलो म्हणे इतक्यात मी

बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली
कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी

कुठल्याच दारी मी कधी नेली न कागाळी तुझी
नाराज आयुष्या तुझी घालू कशी रुजुवात मी ?

तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी !

मजला असे पाहू नका …. रस्त्यावरी थांबू नका
धुंडाळतो आहे इथे माझा रिकामा हात मी !

माझ्या भविष्याची मला नाही जराही काळजी
उमटेल मी धरतीवरी ….. चमकेन त्या गगनात मी !

-  सुरेश भट

                      (२)
हा असा चंद्र अशी रात फ़िरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी !

चेहरा तो न इथे, ही न फ़ुलांची वस्ती,
राहिले कोण आता सांग झुरायासाठी !

कालचे तेच फ़िके रंग नकोसे झाले
दे तुझा ओठ नवा रंग भरायासाठी !

आडवी एक तिथे भिंत मनाची आली
दार होतेच कुठे आत शिरायासाठी !

नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू
ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी !

काय आगीत कधी आग जळाली होती?
लोक नेतील मला खोल पुरायासाठी!


- सुरेश भट

                      (३)
नाही म्हणायला आता असे करु या
प्राणात चंद्र ठेवू-हाती उन्हे धरु या

आता परस्परांची चाहूल घेत राहू
आता परस्परांच्या स्वप्नात वावरु या

नेले जरी घराला वाहुन पावसाने
डोळ्यातल्या घनांना हासून आवरु या

गेला जरी फुलांचा हंगाम दुरदेशी
आयुष्य राहिलेले जाळुन मोहरु या

ऐकू नकोस काही त्या दूरच्या दिव्यांचे
माझ्यातुझ्या मिठीने ही राञ मंतरु या

हे स्पर्श रेशमी अन् हे श्वास रेशमाचे
ये! आज रेशमाने रेशीम कातरु या

- सुरेश भट

                      (४)
कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही

हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही

जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही

मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही

थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्‍या कसलीच खंत नाही

मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही

दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)

मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!

- सुरेश भट

                     (५)
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
-सुरेश भट

                  (६ )
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?

ह्रदयात विझला चंद्रमा... नयनी न उरल्या तारका...
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले

अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा?
अजुनी मला फसवायला हे कुठले निमंत्रण राहिले?

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ...
मी मात्र थांबुन पाहतो मागे कितीजण राहिले?

कवटाळुनी बसले मज दाही दिशांचे हुंदके
माझे अता दु : खासवे काही न भांडण राहिले!

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले.

अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली
रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले?

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे अध्याप तोरण राहिले.

-सुरेश भट

३ टिप्पण्या:

 1. बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली
  कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी
  ....this line aavadli....

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. 'कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
  कळते मला अरे हा माझा वसंत नाही'- aaishappath lihilay re!

  mi khoop kami vachalya ahet yanchya kavita.. arthat tu mhantos tasa barich gani ji chitrapat madhyamanun samor ali ti tevhadhi atishay aawadati ahetach..

  प्रत्युत्तर द्याहटवा