शुक्रवार, १९ एप्रिल, २०१३

अरबांच्या देशात… भाग ५

हॉटेलवर यायला साधारण साडे तीन-चार वाजले असतील.

खरतंर, हे हॉटेल नव्हतं. "अल-हमरा बीच रेसोर्ट" असं याचं नाव होतं. रस अल खैमाह शहरापासून पण हे साधारण विसेक किलोमीटर दूर होतं. जिथे हायवेवरून इकडे यायला बस वळली, तिथं एक मोठा मॉल होता. त्याचं नाव सुद्धा "अल-हमरा मॉल". पुढे तिथून रस्त्याच्या दुतर्फा बंगलेवजा दुमजली घरं एका ओळीनं कॉपी पेस्ट करून लावल्यासारखी दिसत होती. ते अल हमरा विलेज. ती लांब लचक घरांची रांग संपली की वळायचं, म्हणजे थेट अल-हमरा पॅलेस रेस्टौरंट. नावाप्रमाणेच हे एखाद्या पॅलेसच्या तोडीचं होतं. पुढच्या बाजूला मोठं गोल्फचं मैदान मागच्या बाजूला सुंदर समुद्र किनारा. छोटे मोठे असे मिळून सगळे ७-८ स्विमिंग पूल असतील. पुढे मागे अश्या बऱ्याच इतर छोट्या इमारती. त्यापैकीच एक म्हणजे अल हमरा कन्वेन्शन सेंटर, जिथं कॉन्फेरंस होणार होती. या भागात हे रेसोर्ट सोडलं तर फारसं असं काही नव्हतं. नाही म्हणायला एक मॉल होता पण तो सुद्धा यांचाच. पर्यटकांच्या सोयीसाठी बनवलेला. मागचा समुद्र किनारा सगळा इथल्या पर्यटकांना आंदण दिला होता. सगळीकडे लोकांना बसायला खुर्च्या, स्विमिंग करून आल्यावर झोपायला एरव्ही स्विमिंग पूल कडे असतात तसे बाकडे. त्या मोठ्या छत्र्या. आणि नवल म्हणजे मच्छरदाणी सदृश्य पडदे लावलेले मोठ मोठे पांढरे डबल बेड सुद्धा. मोठाल्या कापूस भरलेल्या रेशमी कपड्याच्या रंगीत गाद्या. आणि माणसंच माणसं.हॉटेल च्या रिसेप्शन ला आलो. तिथे ती दुसरी लिस्ट मिळाली. सुदैवाने माझं नाव त्यात होतं. त्या रिसेप्शनिस्टने सांगितलं. "Mr. Vinayak Kamble, your room no is 7503. and you will be sharing room with "Mr. Satyajeet Gupta." माझा जीव एकदम भांड्यात पडला. ते म्हणतात ना 'अनोळखी माणसापेक्षा ओळखीचं भूत परवडलं' तसंच काहीतरी. सत्यजित तसा स्वभावाने शांत आणि चांगला मुलगा होता. फक्त त्याला सिगरेटचं व्यसन होतं. पण २ दिवस मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं. मला किल्ली म्हणून एक स्मार्ट कार्ड दिलं. त्या रिसेप्शनिस्टने तिथल्या एका माणसाला माझ्या सोबत पाठवलं. साधारण चाळीशीतला तो माणूस होता. त्याने रूम नंबर विचारला आणि माझं समान घेऊन निघाला. मी त्याच्या मागोमाग. अचानक त्या माणसाने बोलायला सुरुवात केली. त्याची चेहरेपट्टी भारतीयच होती. त्यांनी हिंदीतच सुरुवात केली. "आप कहासे हो?, यहां क्या कामसे? कितने दिन रहेंगे वगैरे वगैरे." पण बोलण्यात आपुलकी होती आणि एक पंजाबी ढंग होता. मी त्याला उत्तरं दिली आणि आता प्रश्न विचारायची माझी पाळी होती. मी पण त्याला विचारलं " आप कहांसे हो?" तो म्हणाला पाकिस्तानसे. त्याचं उत्तर मला एकदम अनपेक्षित होतं. एक पाकिस्तानी आपल्याशी इतक्या आपुलकीने बोलत होता यावर विश्वास बसत नव्हता. "यहां आपको बहोत लोग मिलेंगे इंडियासे, पाकिस्तानसे, बंग्लादेशसे और ज्यादातर फिलीपाइन्ससे।" माझ्या डोक्यात प्रकाश पडला, ते एअरपोर्ट वरचे सीम कार्ड विकणारे, हॉटेलकडून इतरांना रिसीव करायला आलेले, खालचे रिसेप्शनवरचे आणि जागोजाग दिसणारे हे सगळे चीनी नसून फिलीपाइन्सचे होते.

आम्ही जिथे जाऊ तिथले दिवे आपोआप लागायचे. एक वेगळंच फील होत होतं. "ये लो जी आ गायी आपकी रूम, है के नही आलिशान ?" आम्ही रूम पाशी आलो. ती रूम नव्हती. तो २ बेडरूम, एक मोठा हॉल, एक किचन आणि २ छोट्या छोट्या इतर खोल्या असा आलिशान फ्लॅट होता, तो ही पाचव्या मजल्यावर. मी त्यातल्या एकात माझं सामान टाकलं. सगळ्या रूममध्ये एक चक्कर मारली. किचनमध्ये फ्रीज, कॉफीमेकर, बाहेर वॉशिंग मशीन, हॉलमध्ये ४२ इंचाचा फ्लॅट टीव्ही. मला एक क्षण कुठेतरी स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. बाहेर हॉलपासून इतर दोन्ही रूमला जोडून सामायिक लांबलचक बाल्कनी. त्यात समोरचं दृश्य खुपच सुंदर दिसत होतं. दिवस मावळायला आलेला. समोर गोल्फचं मैदान दिसत होतं आणि दूर क्षितिजा पर्यंत दिसत होतं कुठे नव्याने होणारं बांधकाम, तो मॉल, ती अल-हमरा विलेजच्या घरांची रांग, पुढचा निर्जन वाळवंटी भाग. समुद्र किनारा पाठच्या बाजूला होता. त्या बाजूची रूम आपल्याला मिळाली नाही ही खंत वाटली, पण हे दृश्य ही काही कमी सुंदर नव्हतं. त्यात त्या रूमचा राजेशाही थाट.

     


थोडाच वेळ गेला असेल, मी टीव्ही लावला पण त्याच्यावर बहुतेक चॅनेल अरबी होते. आणि उरलेले इंग्रजी. एका चॅनेलवर 'चक दे इंडिया' पिक्चर अरबी भाषेत होता. पण मला त्या इतक्या मोठ्या रूम मध्ये करमेनासं झालं. हॉटेलमध्ये इंटरनेट सुद्धा नव्हतं. घरी फोन करून पोहोचल्याची बातमीसुद्धा अजून दिलेली नव्हती. मी रूम सर्विसला फोन करून नेट बद्दल विचारलं, तर कळलं की नेट फ्री नाही. तासाला ४० दिरहाम. माझा विचार बारगळला. बाहेर काहीतरी आवाज झाल्यासारखं झालं म्हणून कॉरीडोर मध्ये आलो. रूम सर्विसवाले शेजारची रूम साफ करायला आले होते. त्यात पण एक फिलीपाइन्सचा आणि एक इंडियन. म्हणून त्याच्याशी बोलायला लागलो. तो मुलगा गोव्याचा होता. त्याला आजूबाजूची माहिती विचारायला लागलो. दुबईला कसं जायचं? किती वेळ लागेल? तो सुद्धा नवीनच होता. २-३ महिने झाले असतील कामाला लागून. त्याला मी विचारलं तुला मोबाईलवर भारतात फोन करायला मिनिटाला किती चार्ज पडतो? मी त्याला तितके पैसे देऊन घरी फोन करणार होतो. त्याने मला फोन दिला. मी पटकन सुखरूप पोहोचल्याचं घरी सांगितलं आणि एका मिनिटाच्या आत फोन कट केला. मी खूप आग्रह करूनसुद्धा त्याने पैसे काही घेतले नाहीत. 

थोड्या वेळाने मी वैतागून फिरायला म्हणून खाली उतरलो. बाहेर दरवाजा जवळ तोच पाकिस्तानी माणूस आणखी दुसऱ्या एका तरुण मुलासोबत गप्पा मारत होता. ते दोघेही हॉटेलच्या युनिफॉर्ममध्ये होते. मला बघून तो म्हणाला. "आइये, अकेले उस इन्ने बडे रूममे बोर तो नही हो रहे?" मी म्हटलं" इसीलिये थोडा नीचे घुमने निकला हू।" तो हसला. त्याने त्या दुसऱ्या माणसाशी ओळख करून दिली. तो पण पाकिस्तानचाच होता. कुठल्याशा क्रिकेटरच्या गावा जवळचा. सियालकोटजवळ कुठेतरी. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. माणसं मन मिळावू वाटली. किती विचित्र आहे नं? एरव्ही जो शेजारी आपल्याला उपद्रवी वाटत असतो, दूर परगावी तोच भेटल्यावर आपलं माणूस भेटल्याचा वेगळाच आनंद होतो. असो, आणि मी परत रूमकडे जायला निघालो.रिसेप्शनिस्ट कडून कॉन्फरन्सच्या लोकांचा नंबर घेतला. रूम मध्ये जाऊन फोन केला. ते म्हणाले ६ वाजता एक वेलकम मिटींग आहे. वेन्यू हॉटेलच्या बाजूलाच होता. तिथे Wi-Fi आहे का याची खात्री करून घेतली. आणि जायला म्हणून खाली येऊन निघालो. त्या पाकिस्तानी माणसाने एक शटल बस बोलावली. ती बस हॉटेलच्याच मालकीची होती आणि मॉल पासून बीच पर्यंत अशा बऱ्याच बसेस इथल्या लोकांना आवारात फिरायला सोय व्हावी चकरा मारत होत्या. त्याचा ड्रायवर आफ्रिकन दिसत होता. पण त्या पाकिस्तानी माणसाने त्याला हिंदीतच सांगितलं "इनको कन्वेंशन सेंटर छोड दो|" तसं पायी अंतर २०० मीटर हून जास्त नसेल. पण मला माहित नसल्याने बस सोयीची होती. मी त्या माणसासोबत बोलायचा प्रयत्न केला. तो लिबियाचा होता. त्याची भाषा अरबीच. मी त्याला विचारलं "आपको हिंदी आती है?" त्याने इंग्लिश मध्ये उत्तर दिलं "I can understand." तुटक तुटक बोलायचा, मग माझा बोलण्याचा उत्साह सगळा संपला आणि बसमधून उतरलो. उतरताना त्याला अरबी भाषेत "शुक्रान" म्हटलं. हा शब्द मी मघाशी याच माणसाला या बसमधून उतरणाऱ्या लोकांनी म्हटलेलं ऐकलं होतं. त्याचा अर्थ "धन्यवाद." हिंदी किंवा उर्दू मधल्या "शुक्रिया" शब्दाचं ते भ्रष्ट रूप होतं. 

कन्वेंशन सेंटर मध्ये मोजकीच लोकं होती. अजून बरेच लोक यायचे होते.त्या रजिस्ट्रेशन डेस्क वरचे लोक, केटरिंगवाले, मी आणि आजूबाजूचे मिळून ५-६ लोक असू तिथे. तिथे साईडला एका लांब टेबलावर सगळं खायचं एकदम आकर्षकरित्या मांडलं होतं. फळं, चेरी, केक्स, सँडविच आणि शेजारी कसलेतरी तळलेले पदार्थ . शेजारी ज्युसेस, चहा, कॉफी वगैरे वगैरे.. भूक तर लागलीच होती आणि हे बघून ती अजूनच वाढली. पण फारसं अजून कुणीही आलं नव्हतं. मन आवरून लोकं यायची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. ऑलिम्पिकपटू सारखं पाळणारं घड्याळपण कधी कधी माणसाच्या सबुरीचा अंत पाहतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा