रविवार, १४ एप्रिल, २०१३

जय भीम !!

एका सामान्य माणसामध्ये इतकं बळ कुठून यावं, की पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या समाजाच्या पद्धतीविरुद्ध जाऊन असामान्य ऐतिहासिक कामगिरी करायचं?

वर वर गोष्ट सोपी वाटते, पण ती गोष्ट तितकीही सोपी नाही.

एक आजच्या काळातलं उदाहरणच घेऊ,
समजा, एका मुलीनं इतर धर्मातल्या मुलाशी लग्न केलं. जर ती मुलगी आधी हिंदू होती आणि तिने मुस्लिम मुलाशी लग्न केलं. (फक्त उदाहरण म्हणून घ्या, हे चांगलं का वाईट याचा खल करणं इथं अपेक्षित नाही) आपण आधी देवाची जशी प्रार्थना करायचो तशी आता करू नये हे तिला सांगितलं जातं. किंवा नाही सांगितलं तरी, असं समजू कि ती मुलगी स्वत:हून मुस्लिम धर्म आत्मसात करू पाहते. तर नमाज पडते वेळी आपल्या श्रद्धेत फार फरक नसतो. ते ही देवाकडे तेच मागत असतात जे आपण नमस्कार करून मागतो. आणि हातांच्या जुळणीत सुद्धा फक्त एकमेकांवर जुळलेले तळवे उघडून देवाकडे दुवा करायची. पण हे करताना (निदान सुरुवातीला तरी ) तिचे हात थरथरले नाहीत तरच नवल. त्या थरथरण्या हातांमागचं कारण तिच्या श्रद्धेत नसून कुठेतरी आत्मविश्वासातल्या कमतरतेत आहे.

आजवर आपण जे समजत होतो. जे आचरत होतो ते न करता त्या जागी काहीतरी वेगळं करणं तितकीशी सोपी गोष्ट नाही. साधी तर नाहीच नाही. त्याची मुळं कुठेतरी मनात खोल गेलेली असतात. लहानपणापासून जे मनावर बिंबवलेलं असतं, ते झुगारून द्यायला मुळात काही गोष्टींची नितांत गरज असते. त्यातली मुख्य गोष्ट म्हणजे जे पाहत आलोय, जे बिंबवलय त्याची पराकोटीची चीड किवा त्याचा राग. मग ही चिडच माणसाला ते झुगारून देण्यासाठी लागणारं बळ देते. जर आजच्या पुरोगामी म्हणवणाऱ्या काळात त्या मुलीच्या मनात जर इतका "किंतु" असेल तर साधारण अर्ध्या शतकापूर्वीची तर आपण कल्पनाच करू शकत नाही.

जिथं कळायला लागल्यापासून गावातल्या नाल्यांना साफ करता करता माणसाची मनं त्या घाणीशी बेमालूमपणे एकरूप झालेली असतात, ढोरांना मारून त्यांची चामडी रंगवता-रंगवता त्या उग्र वासानं त्यांची नाकं मेलेली असतात, "जोहर मायबाप" म्हणत गावात महारकी / चांभारकी मागून मिळालेल्या तुकड्याला पोटं सरावलेली असतात, गावातल्या पाण्यापासून देव धर्म सुद्धा शिवता-शिवतीत बांधलेले असतात, तिथं जिणं कसं असेल याचा अंदाज बांधणं, आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. कारण आपण हे सगळं अनुभवणं / पाहणं तर सोडाच ते कधी साधं ऐकिवात सुद्धा नसतं. तिथं एखाद्या माणसाला ह्या जिण्याची चीड येणं सहज आणि नैसर्गिक असलं तरी जीव देण्यापुढे किंवा जीव घेण्यापुढे काही विचार करण्याची माणसाची क्षमताच खुंटलेली असते. समाजाने त्याच्या विचारांच्या इतर दिशेला जाणाऱ्या वाटा, अनामिक उंच भिंती घालून अशा काही अडवून धरलेल्या असतात, की त्या पलीकडच्या जगाची तो कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि केलीच तर त्या वाटेवर त्याला दिसते ती त्याची फरफट आणि त्याच्या आप्त स्वकीयांचे हाल.

जिथं नुसतं चांगलं धडूत जरी अंगावर दिसलं तरी "महार माजला" असं गावात म्हटलं जातं, तिथं शिक्षण घेणं ही त्या माणसाच्या नजरेला क्षितिजापलीकडे असणारी गोष्ट असते. त्यात बाबासाहेबांचं बॅरिस्टर होण्याला कोणतीही उपमा देण्यासाठी माझ्या नजरेत योग्य उपमान नाही. त्याला धाडसच म्हणावं लागेल. आपल्या मुठभर मावळ्यांना घेऊन अफाट पसरलेल्या यवनी साम्राज्याला ललकारू पाहणाऱ्या शिवाजी महाराजांइतकाच खंबीर निश्चय हवा. (इथं मी कोणाचीही कोणाशी तुलना करू इच्छित नाही. दोघेही महापुरुष माझ्या दृष्टीनं अत्यंत आदरणीय आहेत, आणि कुणाच्या भावना दुखावल्यास क्षमस्व).

आज बाबासाहेबांच्या १२२व्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना माझा नम्र नमस्कार. त्यांनी जे केलंय त्या उपकरातून बाहेर येण्याची या जन्मात तरी संधी नाही.

लोकांच्या माहितीसाठी म्हणून सांगू इच्छितो. मी जन्मानं हिंदू चांभार आहे. आमच्या वाड-वडिलांत बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही. पण म्हणून माझ्यावरचे बाबासाहेबांचे उपकार काही कमी होत नाहीत. आज इतकं शिक्षण घेऊ शकलो याला मी बाबासाहेबांचे उपकार मानतो. त्याच बरोबर मला माझ्या जाती बद्दल किंवा धर्म बद्दल कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही. आमचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे आमचं चप्पलचं दुकान. वडील गेल्या नंतर काकांना मदत म्हणून मी कॉलेज सुटल्यावर तिथे जाऊन त्यांना मदत करायचो. चपलेला टाके वगैरे घालणं हेही शिकलोय. कधीतरी तेही करायचो. पण चप्पल दुरुस्ती हा आमचा मुख्य व्यवसाय नसल्याने ते कधीतरीच व्हायचं. त्या वेळेस B. Sc. ला होतो. तिथेच बसून अभ्यास सुद्धा केला आहे. अगदी M. Sc. पर्यन्त. येत जाता लोक बघत जायचे. फाजील कौतुक म्हणून सांगत नाही. तर त्यांच्यासाठी सांगतोय ज्यांना त्यांची जात सांगायची लाज वाटते.

सांगण्यासारखं बरंच काही आहे. पुढे-मागे स्वत: बद्दल सांगायची वेळ आली की सांगायचा प्रयत्न करीन.

पण एक नक्की की, अजूनही आपली वैचारिक मुळं याच मातीत खोल रुतलेली आहेत. नाही म्हणालायला समाज बदलतोय खरा पण कासवाच्या गतीने. शिकलेली लोकं (मागास वर्गातली ) त्यांच्या शिक्षणाचा अजूनही योग्य उपयोग करतात असं नाही. या शिक्षणाला (फक्त ) नोकरी मिळवायचं साधन म्हणून पाहिलं जातंय. तिथंच कदाचित त्या शिक्षणाचं अपयश आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संधीचं सोनं करा इतकंच म्हणणं आहे.

"जय भीम !!"

Note:
इथं मला संधी म्हणजे reservation हा अर्थ अभिप्रेत नसून "एकूणच शिक्षणाची संधी" घ्या आणि स्वतःचा विकास करून घ्या. असं म्हणायचं आहे. त्यात जर नीट वाचलांत तर मी कुठेतरी लिहिलंय "जिथं नुसतं चांगलं धडूत जरी अंगावर दिसलं तरी "महार माजला" असं गावात म्हटलं जातं, तिथं शिक्षण घेणं ही त्या माणसाच्या नजरेला क्षितिजापलीकडे असणारी गोष्ट असते." हा झाला तेव्हाचा काळ. पण आताचा काळ सुद्धा काही फार बदललेला नाही. एखादा मागास वर्गीय विद्यार्थी शिकला तरी त्याला समाजात कौतुक करण्याबरोबर त्याची हेटाळणी करणारे लोक सुद्धा अजूनही आहेत. (स्वातंत्र्याच्या ६० वर्ष नंतर सुद्धा) आपण शहरात राहतो म्हणून तुम्हाला कधी हा अनुभव आलेला नसेल. किंबहुना मला पण हे मुंबई सोडल्यावर आणि इतर ठिकाणच्या बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकून कळलंय.

अजूनही निदान १२ वी पर्यंत आरक्षण असावं, पण उच्च शिक्षणातल्या आरक्षणाला मी सुद्धा support करत नाही. तिथं त्यानं त्याची बुद्धीच पणाला लावावी. आरक्षणाच्या कुबड्या तिथे वापरू नयेत. दिलंच तर उच्चशिक्षणात आर्थिक दृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदत द्यावी, ती पण पात्र विद्यार्थ्यांना. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. सगळे याच्याशी सहमत असतील असं नाही.

शेवटचं वाक्य कदाचित मी असं लिहायला पाहिजे होतं "बाबासाहेबांनी 'माणूस' म्हणून जगायची संधी दिली. तीचं सोनं करा. आणि इतरांनाही पुढे घेऊन चला. नाहीतर त्या शिक्षणाचं ते अपयश आहे."

२ टिप्पण्या:

  1. अतिशय मनस्वी मनोगत विनायक!
    माझेही विचार जवळ जवळ असेच आहेत.
    तुझं मला खूप कौतुक आणि अभिमान वाटतो.
    अनेक शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा