रविवार, ७ एप्रिल, २०१३

देवा तुला शोधू कुठं?

कुठल्या देशी कुठल्या वेशी, कुठल्या रुपात??
देवा तुला शोधू कुठं?

देऊळ हा चित्रपट पहिला. खरंच, आजवरचे आपण देवाला केलेले सगळे नमस्कार, सगळी गाऱ्हाणी, सगळे आभार समोर आले. जगण्यासाठी लागणारं मानसिक पाठबळ म्हणून देवाकडे न बघता, "तारणहार" म्हणून बघण्याच्या वृत्तीचा पुनर्विचार करावसं वाटलं. देव देवळात दगडाच्या मूर्तीत न शोधता किंबहुना माणुसकीत शोधावा या उक्तीचा पुनर्विचार करावासा वाटला. आणि स्वत:ची एक पुनर्पडताळणी नकळतच मनात सुरु झाली.

मोठमोठाली मंदिरं बांधून, दिवस-रात्र विक्षिप्त गाणी लावून (हिंदी गाण्यांच्या चालीवर रचलेली.) शेंदूर फसलेल्या मूर्तीत खरंच देव सापडतो का? कुठेतरी वाचलं होतं, कि "श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा धूसर असते". जर तसं असेल तर आपल्याही नकळत आपण ती रेषा ओलांडत तर नाही आहोत ना? हे आणि असे विचार एका मागून एक वारुळातून बाहेर येणाऱ्या मुंग्या प्रमाणे येतात. तेव्हा "खरंच, याचा विचार व्हावा का?" असं पण वाटून जातं. देव सगळ्यांचा सारखा असला तरी भक्ती सगळ्यांची सारखी नसते. मुळातच माणूस हा भावनिक प्राणी असल्याने, त्याच्या भावनांना चाळवायला फार प्रयत्न करावे लागत नाहीत. कुठून तरी दुरून येणारी उब पुरेशी असते हे लोणी वितळवयला. कुळाचार म्हणून घरच्यांसोबत देवळात जाणे कर्तव्य वाटे. ते सांगतील त्याप्रमाणे (आणि त्याचप्रमाणे ) पूजा करणे बंधन वाटे इतर सगळे करतात म्हणून आपणही हळद-कुंकू / गुलाल-बुक्का वाहिल्याने किंवा नारळ फोडल्याने आपली श्रद्धा देवाजवळ व्यक्त होईल का? पण हा डोक्यातला विचार कायम (फक्त ) डोक्यातच राहिला. विज्ञानाने आणि विवेकबुद्धीने फिरवलेलं डोकं कधी प्रचलित व्यवस्थेच्या विरुद्ध जायला धजावलं नाही. त्या भाबड्या भक्तीकडे विज्ञानवादी बुद्धी फक्त कुतुहलाने आणि उपहासाने पाहत होती. कदाचित मोठं झाल्यावर आपल्याला या भक्तीचा साक्षात्कार होईल असं वाटत होतं. पण काळाबरोबर या भक्तिचं रूप आणखी विद्रूप होत गेलं आणि माझा त्याबद्दलचा तिटकारा अजून वाढत गेला .

पण म्हणजे मी नास्तिक आहे असं नाही. पण तिथला एकंदर माहौल मला त्या देवळांपासून दूर ढकलत होता. पण तरीही यातून माझी देवावरची श्रद्धा संपलेली नव्हती. एकदम मंगळवार बघूनच किवा संकष्टीलाच असं नाही, तर कधी वेळ मिळेल तेव्हा किंवा जावसं वाटेल तेव्हा, मी सिद्धिविनायक मंदिरात जायचो. (आता बंगलोरहून ३-४ दिवसाची सुट्टी काढून गेलो तरीही एखाद्या दिवशी ही सवड काढतो.) गणपतीशी आधीपासूनच जवळचं नातं होतं. किंबहुना तिथे असले प्रकार कमी होतात म्हणून असेल कदाचित. पण तिथली अंधश्रद्धा वेगळी होती. हजारो रुपयांच्या नोटांच्या माळा चढवण्यापासून ते, १०-१५ तरुणांनी रात्रभर अनवाणी १५-२० किलोमीटर पायी चालून येण्यापर्यंतची. ती गर्दी टाळायला म्हणून मी अगदी पहाटेच नाही पण सकाळी साधारण ६ ते ७ च्या दरम्यान जायला प्राधान्य द्यायचो. तेव्हा हीच पदयात्री मंडळी कपाळाला शेंदूर लावून रस्त्याने धिंगाणा घालत, एकमेकांना शिव्या हासडत परतीचा वाटेला लागलेली दिसायची. कुणाच्या आचरणावरून त्याच्या श्रद्धेविषयी मला शंका घ्यायची नाहीये, किंवा वरवर शांत आणि सुस्वभावी "दिसणारी" लोकं जास्त श्रद्धेने येतात असंही म्हणायचं नाही , पण कदाचित ते त्यांच्या गांभिर्याचं प्रतिक असतं.

आगाऊपणाने मोठा हार किंवा पाच नारळाचं तोरण घेऊन जाण्याऐवजी एक दोन रुपयांचं जास्वंदाचं फूल आणि दुर्वा घेऊन कृतज्ञतेचं प्रतिक म्हणून देणं मी जास्त पसंत करतो. असंच एकदा सकाळी गेलो होतो आणि तिथे उभ्या असलेल्या बऱ्याच फूल विक्रेत्या स्त्रियांपैकी एका बाईकडे मी एक फूल-दुर्वा मागितलं. पैसे विचारले आणि २ रुपये काढायला खिशात हात घातल्यावर कळलं कि माझ्याकडे सुट्टे नाहीत. त्यांनी माझी गडबड बघून ओळखलं आणि म्हणाल्या "असुदेत, जाऊन परत आल्यावर दे." मी म्हटलं "तेव्हा तरी कुठे असणार आहेत?" तर म्हणाल्या "पुढच्या वेळेस दे. आणि हे एक दुसरं फूल घेऊन जा, माझ्याकडून देवाला वहा." ते घेऊन मी निघालो पण विचारचक्र सुरु झालं. त्या बाईचं इथं रोजचं येणं-जाणं, पण मंदिरा बाहेर उभं राहण्याऐवजी आत जाऊन दर्शन घ्यावं असं तिला वाटलं नसेल का?. तर आपली श्रद्धा (फुलामार्फत ) देवाकडे पोहोचवणं तिला जास्त महत्वाचं वाटलं. तो अनुभव भक्तीचं आणखी एक वेगळंच रूप दाखवून गेला. कदाचित हेच कारण आहे मी अजून पर्यंत शिर्डी किंवा इतक्या जवळ असून तिरुपतीला नाही गेल्याचं. तिथला बाजार मला देवापासून दूर ढकलतो. जिथं हा बाजार वाढू लागतो तिथनं देव नाहीसा होऊ लगतो. कारण देव बघण्याची किंवा ऐकण्याची बाब नसून, ती एक अनुभूती असते. स्वत:मध्ये जेव्हा जगण्याविषयीची उर्जा लोप पावू लागते तेव्हा तिला पुन्हा नवी उमेद देण्याची क्रिया म्हणजे भक्ती, आणि हि उमेद कायम टिकवून ठेवायला लागणारी मानसिक प्रेरणा म्हणजे श्रद्धा. आपापल्या परिनं यांची व्याख्या ज्याची त्यानं करावी. कारण देव जरी सगळ्यांचा एकच असला तरी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग (भक्ती ) प्रत्येकाचे वेगवेगळे असतात.

-विनायक कांबळे

टीप : हि पोस्ट साधारण वर्षभर आधी (देऊळ सिनेमा आला तेव्हा ) लिहिली होती पण काही कारणाने (अनिच्छा म्हणा हवं तर) ती पब्लिश केली नव्हती.

1 टिप्पणी:

  1. 'कारण देव बघण्याची किंवा ऐकण्याची बाब नसून, ती एक अनुभूती असते.'... well said!!

    उत्तर द्याहटवा