रविवार, ३१ मार्च, २०१३

अरबांच्या देशात... भाग ३

फ्लाईट ९ चं होतं आणि मी साधारण सहालाच ऐअर पोर्ट वर पोहोचलो होतो. खूप मोजकीच माणसं होती आजूबाजूला. टर्मिनलमध्ये प्रवेश केला. जेट एअरवेजचं काउंटर शोधून काढलं आणि चेक इन केलं, सामान दिलं. पोस्टर होल्डर बद्दल शंका होती की, विमानात घेऊन जाऊ देतील की नाही. साधारण ३ फुट उंच होतं. आणि रामायणात दाखवतातत तसं बाणाच्या भात्यासारखा माझ्या उजव्या खांद्यावर लटकत होतं. काउंटरवरच्या बाईने सांगितलं विमानात तुमच्यासोबत ठेवा, काहीही हरकत नाही. शेजारीच एक माणूस दुसऱ्या एअर होस्टेस सदृश्य बाईशी हुज्जत घालत होता. त्याच्या सामानाचा काहीतरी गोंधळ झाला होता. मी कन्वेयर बेल्टवरून जाणाऱ्या माझ्या बॅगला मनातच म्हटलं व्यवस्थित पोचलीस तर दुबईत भेटू. या एअरलाईन्सवाल्यांचे प्रताप मी ऐकून होतो.

पासपोर्ट, बोर्डिंग पास, इमिगरेशनचा फॉर्म, पाठीची बॅग आणि पोस्टर होल्डर असं सगळं घेऊन निघालो. फॉर्म न भरताच इमिगरेशन चेकच्या काउंटरवर गेलो. त्या माणसाने मला बाघितलं, पासपोर्ट वरचं नाव वाचून मराठीतच बोलला. फॉर्म भर म्हणाला. आणि कशाला जाताय? काय करता? वगैरे नेहमीची चौकशी सुरु केली. मी PhD करतोय हे सांगितल्यावर थोडं चकित झाल्यासारखं त्याने माझ्याकडे पहिलं. त्याच्या डोळ्यात वेगळीच कौतुकाची चमक दिसली. मग घर कुठे? इन्स्टिट्युट कुठेय वगैरे एकदम ओळखीच्या माणसाने हालहवाल विचारावे तसे विचारले आणि "all the best" म्हणत शिक्का मारत पासपोर्ट परत केला. सिक्युरिटी चेकिंग झालं आणि थोडा वेळ इकडे-तिकडे ड्युटी फ्री मध्ये फेरफटका मारून बोर्डिंग गेट शोधला. वास्तविक माझ्या हितचिंतकांनी मला अनेक सल्ले दिले होते, त्यातला एक म्हणजे "जाताना मुंबई एअर पोर्ट वर ड्युटी फ्री मध्ये कितीही चांगली आणि स्वस्त वस्तू दिसली, तरी खरेदी करू नको. कारण येताना ते cabin  Babbage मध्ये मोजलं जातं आणि उगाच नको इतका भुर्दंड बसतो, त्या अनावश्यक खरेदीचा." पण मला इथे सगळंच खूप महाग वाटलं. त्याच्यामुळे खरेदीचा प्रश्नच नव्हता.

जेट एअर वेजला दिलेला गेट एकदम टोकाला आणि कोपऱ्यात होता. अजून फक्त साडेसहा वाजले होते आणि  बाहेर उजाडलं नव्हतं. बोर्डिंग साडेआठला सुरु होणार होतं. बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्या मागेच एक मराठी कुटुंब बसलेलं. साधारण पन्नाशीतले आई-वडील, विशीतले मुलगा-मुलगी आणि एक तसंच वयस्कर जोडपं. सगळे मिळून सहलीला चाललेले बहुतेक. परुष मंडळी एकीकडे बोलत होती. आणि ते मुलगा मुलगी अनुक्रमे फोन आणि आयपॉडवर बिझी होते. त्या दोघी स्त्रिया माझ्या मागे बसूनच गप्पा मारत होत्या.  अनवधानाने का होईना त्या गप्पा माझ्या कानावर पडत होत्या. "येत्या शुक्रवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला उपवास करायचा का?" याच्यावर त्यांची चर्चा चालू होती. त्यांची चर्चा ऐकुन मी मनातल्या मनात गणपतीला हात जोडले होते. बायकांना गप्पा मारायला विषय लागत नाहीत हेच खरं. वैतागून उठलो आणि समोरच्या काचेच्या भिंतीजवळ जाऊन उभा रहिलो, बराच वेळ. समोर दिसत होता एअर पोर्टचा मोठ्ठं पटांगणवजा रनवे,  त्या पलीकडे क्षितिजाजवळ झोपड्यांची रंग आणि त्यावरून उगवणारा सुर्य. बघता बघता सूर्य त्या क्षितिजावरून वर आला, झोपून उठलेल्या लहान मुलाने पांघरुणातून हळूच डोकं वर काढावं तसा….

तासभर निघून गेला होता.  आणखी एक तास काढायचा जीवावर आला होता. मध्येच एक बोर्डिंगची अनौन्स्मेण्ट झाली. गडबडीने लाईनीत जाऊन उभा राहिलो, मिचमिच्या डोळ्याच्या लोकांमध्ये उभं राहून कळलं काहीतरी गंडलय. स्क्रीन कडे पहिलं तर ते बॅंकौकला जाणाऱ्या फलाईटचं बोर्डिंग होतं. परत जाऊन बसलो. बराच वेळ हे बोर्डिंग चाललं. लुंगी सद्दृश्य काहीतरी घातलेले काही थाई लोक खूप उशिराने आले, कदाचित त्याच्यामुळे हे बोर्डिंग लांबलं. मग १० -१५ मिनिटात आमचंही सुरु झालं. माझ्याहीपेक्षा कुणालातरी इथे बसायचा जास्त कंटाळा आला होता कारण, मी रांगेत दुसरा होतो. मग शटल बस आणि विमानात प्रवेश. साडे आठ वाजले होते. सुर्य बराच वर आला होता. शटलमध्ये बहुतेक लोक फोनवर बोलत होते. बस थांबली विमानात प्रवेश केला. एअर होस्टेस आणि एअर होस्ट (पुरुष) यांनी स्वागत केलं. बायकांना हवाई सुंदरी म्हणतात तर या पुरुषांना काय म्हणत असावेत? असो. जागा शोधून पाठीवरची बॅंग वर टाकली. पण पोस्टर होल्डर कुठे ठेवावं हा प्रश्न होता. एअर होस्टेसला विचारलं तर ती म्हणाली  डोक्यावरच्या सामानाच्या लॉकर मध्ये ठेवा. तो ठेवला तसा घरंगळत एकदम मागे जाऊन पडला . म्हणलं "मरो, उतरताना बघू …". मधल्या पेसेजच्या शेजारची सीट होती. मला खरंतर खिडकी हवी होती पण मनाचा हिय्या करून तिथेच बसलो. ते मराठी कुटुंब माझ्या पुढच्याच रांगेत होतं. सुदैवाने त्या दोघी काकू पलिकडच्या बाजूला बसल्या होत्या. अजून पण बोर्डिंग सुरूच होतं. समोरच्या सीटच्या मागची स्क्रीन सुरु झाली.पण त्याच्यावर पॉप कॉर्न ठेवलेला वाडगा (bowl ) आणि जेटच्या लोगोशिवाय काही दिसत नव्हतं. लोकांनी मात्र समोर ठेवलेला हेडफोन कानाला लावून त्या स्क्रीनच्या आजूबाजूची दिसतील तेवढी सगळी बटणं कचाकच दाबायला सुरुवात केली होती. तरी काही उपयोग नव्ह्ता. कदाचित ऐरावत बसच्या ड्रायवरनं, अजून घटका भरलेली नाही म्हणून एसी चालू न करावा तसं या पायलटने स्क्रीन चा प्रोग्राम सुरु केला नव्हता.

बोर्डिंग पूर्ण झालं आणि एकदाची ती समोरची स्क्रीन सुरु  झाली. लोक त्यात गुंग झाले.  बरेच पर्याय होते, प्रादेशिक सिनेमा-गाणी सुद्धा. मराठी मध्ये आशाताईंचं "नक्षत्रांचे देणे" आणि काकस्पर्श हा सिनेमा होता. सगळ्याची चव घेऊन मी ते सोडून, नवीन काहीतरी म्हणून एक बंगाली सिनेमा सुरु केला. "दिन प्रतिदिन " असं त्याचं नाव होतं. मराठी आणि हिंदी येत असेल तर बंगाली समजणं काही फार कठीण नाही. आणि त्यात खाली subtitles होती. म्हणून जड गेलं नाही. एव्हाना विमान बराच अंतर आलं होतं. स्क्रीन वर एका channel वर position सुद्धा  दाखवत होतं. ढगाशिवाय बाहेर काहीच दिसत नव्हतं. म्हणून खिडकी न मिळण्याची माझी खंत आता ओसरली होती. खाणं-पिणं आलं. सगळं व्यवस्थित चालू होतं. मागे वळून बघितलं तर मागे बाथरूमला जायला चाळीतल्या संडासाला लाईन लागावी तशी लाईन लागली होती. माझा विचार बारगळला. विमान कुठे तरी मस्कतच्या किनाऱ्यावरून उडत होतं. आणि असा एका बाजूकडे किंचित झुकलं, तर खाली समुद्र किनारा आणि तिथून वर चढणारी तांबड्या-चोकलेटी रंगाची जमीन दिसली. रुक्ष आणि बोडकी…

बघता बघता वेळ निघून गेला. नकाशावरून कळत होतं की, विमान बऱ्यापैकी दुबईच्या जवळ आलं होतं.  सगळा वाळवंटी भाग दिसत होता. पायलटने landingची announcement केली. हे पायलट लोक विमानतळाच्या यायच्या आधीच ही अशी announcement करतात. मग लोकांचे जीव इथे टांगणीला लागतात उतरण्यासाठी. हळू हळू विमान जमिनीच्या जवळ येत होतं पण दूरपर्यंत कुठेही मनुष्यवस्ती दिसायची तिळमात्र शंका नव्हती. जसं मुंबईत उतरणारं विमान हा पाण्यातच उतरवतोय की काय ? अशी मला नेहमी भिती वाटते, तसाच कुठेतरी वाळवंटात उतरवतोय की काय, अशी भिती वाटायला लागली. उतरण्याच्या जरा आधी शहर दिसायला लागलं पण दुबईची कल्पना केलेली तसं टोलेजंग काहीही दिसत नव्हतं. अलिफ लैला मध्ये बघितल्यासारखा अरबी धाटणीच्या शहराचा तोंडावळा दिसत होता. कदाचित विमानतळ शहरापासून लांब असावं. विमान उतरलं. चाकं जमिनीला आपटल्याचं जाणवलं. लोकांची घाई सुरु झाली. मोबाईल सुरु  झाल्याचे आवाज आले. मी वरची बॅग काढली. मागच्या उंच माणसाला सांगून हात घालायला लावून कष्टानं पोस्टर होल्डर काढलं. आणि सज्ज झालो, दुबई नामक माया नगरीत दरवाजे उघडण्यासाठी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा