मंगळवार, २६ मार्च, २०१३

अरबांच्या देशात... भाग २

acceptance आल्यावर पहिली गोष्ट करायची होती ती म्हणजे हे सगळं सरांच्या कानावर घालायचं होतं. त्यांना न विचारताच हे केलं हे ते फारसं मनावर घेणार नाहीत याची खात्री होती. पण जायचं का? आणि जायचं झाल्यास पैसा कुठून आणायचा ? या प्रश्नाची उत्तर तयार ठेवायला हवी होती. आणि बर तर बरं जे काम लिहून पाठवलंय (म्हणजे absract) ते पूर्ण तरी कुठे झालं होतं. सगळंच असं अधांतरीच होतं. पण का कोण जाणे मी हे धाडस करायचं ठरवलं तर होतं.

सरांना भेटणं म्हणजे एक दिव्य गोष्ट होती. कारण सर कधी येतील (किंवा येतील पण कि नाही??) याचा काही नेम नसायचा. एक गोष्ट मात्र नक्की की रोज सकाळी ८-१० या वेळेत तरी असायचे. पण ही वेळ माझ्यासाठी म्हणजे एकदमच पहाटेची वेळ असते. आणि आमचं नशीब इतकं जोरदार की, ज्या दिवशी मी सकाळी भेटायचंच म्हणून डोळे चोळत यावं, त्या दिवशी नेमके सर उशिरा तरी येतील नाहीतर येणारच नाहीत. अशाच काही दिवसाच्या लपाछपी नंतर भेट झाली. मी म्हटलं, "Sir, there is a conference." "where?" सरांनी विचारलं. "सर, दुबई… " मी हळूच म्हटलं. "ओह दुबई…" सर खुर्चीतल्या खुर्चीत उडाले… "and who is organizing..? मी सगळी माहिती दिली. "and you want to go, is it??" मी फक्त होकारार्थी मन हलवली. मग सरांनी एक मोठा उपदेश सुरु केला. प्रत्येक विद्यार्थ्याला इन्स्टिटयूट विदेशातली कॉन्फेरेंस अटेंड करायला ५० हजार रुपये देते. पण हे तो त्याच्या विद्यार्थी दशेत फक्त एकदाच वापरू शकतो. आता तू ठरवायचं कि हे पैसे तुला कधी वापरायचे. सर पुढे काही बोलणार, इतक्यात मी भडा-भडा ओकलो, कि "हे लोक येणाऱ्या विद्यार्थ्यांना T. A. देत आहेत. त्यामुळे अशी गरजच पडणार नाही. आणि १५० डॉलर मध्ये रजिस्टरेशन-रहाणे-खाणे सगळेच. मी absract पाठवला होता, तो सिलेक्ट झाला आहे. आता फक्त तुम्हाला त्याना रेकमेंडेशन लेटर पाठवायचा आहे वगैरे वगैरे…. " मग त्यांना विरोध करण्यासारखं काही उरलंच नव्हतं. (मी पण तितकीच तयारी करून गेलोय, हे कदाचित त्यांनी ओळखलं). आणि होकार दिला.

मग मी गड "सर" केल्याची बातमी माझ्या labmates ना सांगितली. अमेरिका-युरोपात सगळेच जातात, पण आपल्यापैकी कुणी दुबईला कॉन्फेरंस करता चालला आहे याचा आमच्या lab मधल्या लोकांना कोण आनंद!! ओळखीच्या चारेक लोकामध्ये पण हि गोष्ट सांगितली. एव्हाना घरी काही सांगितलं नव्हतं, त्यांना पण सांगितलं. चारेक दिवस गेले असतील आणि आईची तब्येत अचानक बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलं. मी मुंबईला जाऊन आलो आठ दिवस. थोडं मन उडालं होतं दुबई वरुन. पुन्हा उरलेली कामं आवरायची होती. तिकीट-वीसाचा व्याप निस्तरायचा होता. कदाचित वीसा (VISA) इंटरव्ह्यू साठी परत एकदा मुंबईत यावं लागणार होतं. अजून पोस्टरचं काम कुठेच नव्हतं. आणि फक्त जेमतेम एक महिना उरला होता.

हे सगळं चालू असताना, एक गोष्ट घडली. माझ्या labmate ने या कॉन्फेरेंस ची चर्चा त्याच्या मित्रांमध्ये केली. त्यातल्याच एकाला या कॉन्फेरंसच्या वेबसाईटची लिंक मेल करताना ती सोमनाथ बोस (S. Bose) ला पाठवण्याऐवजी चुकून सुर्यसारथी बोस (S. Bose) ला पाठवली होती. जे materials Engineering department मध्ये faculty आहेत. मग असं कळलं कि हा मेल मिळाल्यावर त्यांनी त्यांच्या student ना सांगितलं असावं, कारण त्यांची एक स्टुडंट आणि दुसऱ्या lab मधला एक मुलगा हे दोघे पण त्याच कॉन्फेरेंससाठी जाणार होते. मग आमची ओळख झाली. अपघाताने का होईना पण मला सोबत मिळाली होती. पण आम्हा तिघांच्या flight वेगवेगळ्या ठिकाणाहून होत्या. माझी मुंबईहून, त्या मुलीची (प्रीती ) कालिकतहून आणि त्या मुलाची (सत्यजित ) बेंगलोरच पण व्हाया मद्रास अशी flight होती. प्रीतीचा कुणी काका तिथेच होता. त्यामुळे तिचा तिथे २ दिवस जास्त राहायचा प्लान होता.

इथे ज्यांना ज्यांना कळलं होतं, त्या लोकांनी अनेक उपदेश करायला सुरुवात केली. तिथे इलेक्ट्रोनिक स्वस्त मिळतं, सोनं स्वस्त मिळतं, flat tv स्वस्त मिळतात. घेवूनच ये. इथपासून ते, कायदे खूप कडक आहेत, जपून रहावं. पासपोर्ट जप्त करतात, स्मगलिंगवाले असतात असे किती तरी उपदेशवजा सल्ले. दुसरी गोष्ट म्हणजे वीसा ते लोक पाठवणार होते. त्यासाठी त्यांच्या वेबसाईट वर एक फॉर्म भरून द्यायचा होता आणि पासपोर्टची स्कॅन केलेली कॉपी पाठवायची होती. तिकीटं बुक झाली. आणि वीसाची वाट बघत होतो. पोस्टरचं काम पूर्ण करत होतो. यु. ए. ई. वीसा आणि ट्रिप संदर्भात अनेक वेबसाईट शोधून झाल्या. तिथली सोन्याची किंमत बघून झाली. फेब्रुवारी चा पहिला आठवडा संपत आला होता आणि वीसाचा कुठेच पत्ता नव्हता. बरं त्या नंतर इंटरव्ह्यू द्यावा लागणार आहे का? हे सुद्धा माहित नव्हतं. सगळीच बोंब होती. इथं माझ्या बहिणी त्यांच्या मुली रडायला लागल्या कि समजवायच्या की मामा दुबईहून जी सोन्याची वीट आणेल त्यातनं तुला चेन करू वगैरे वगैरे.

कॉन्फेरंस च्या साधारण एक आठवडा आधी (फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात) वीसा आला. सुदैवाने मला इंटरव्ह्यू द्यावा लागणार नव्हता. experiments अजूनही चालूच होते. ३-४ दिवसात बऱ्यापैकी संपवून पोस्टर रेडी केलं. पोस्टर होल्डर मागून आणला. जायच्या १ दिवस आधी तयारी केली. गुरुवारी मुंबईत जाणार होतो. शुक्रवारी राहून शनिवारी सकाळी ९ चं फ्लाईट होतं. गुरुवारी सगळा काजा-बोजा उचलून संध्याकाळी विमानाने मुंबईत पोहोचलो. घरी गेल्यावर अजूनही सरप्राईज बाकी होतं. आईला परत हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं होतं. काय करावं कळत नव्हतं. पण या वेळेस डॉक्टरांनी फक्त काही तपास करायला म्हणून एडमिट करून घेतलं होतं. सगळा उत्साह असा दाणकन खाली आला होता.

शुक्रवार सगळा हॉस्पिटलमध्ये घालवून शनिवारी सकाळी 5 वाजता Taxi मागवली होती. taxi वाला तसा ओळखीचाच सांगितला होता. त्याच्याशी बोलता बोलता airportवर पोहोचलो. domestic चा बराच अनुभव असला तरी international departure ची पहिलीच वेळ होती. immigration वगैरे प्रकार नवीनच होता. धाक-धुक होतीच मनात. गणपती बाप्पा मोरया म्हटलं आणि पाय पुढे टाकला.

1 टिप्पणी:

  1. arey masta!! tu samor basun sangtoys asa bhas hoto. Wachta wachta baryach thikani haslo. Sonyachya kimti ani weet :) .. ti anli ka? pudhchya bhagat kalel ashya khubini utkantha wadhawliye :)

    Btw, ya saglya gadbadit kakuncha ajarpan mhanje khupach tension ala asel na. Atta wachtana sagla chhan wattay, pan actually tu kay paristhitit tikde gelas he imagine karvat nahi.

    उत्तर द्याहटवा