रविवार, १९ फेब्रुवारी, २०१२

शिवजयंतीच्या निमित्ताने थोडंसं...

आमच्या जुन्या घराच्या पाठच्या बाजूला शिवसेनेची शाखा होती. (ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो ) शिवसेनेची शाखा म्हणजे जिथे शिवसैनिक एकत्र येतात आणि विविध सांस्कृतिक, राजनैतिक कार्यक्रम करतात अशी जागा. तर, कळायला लागल्यापासून आम्ही तिथे लोकांना भगवे झेंडे घेऊन महाराजांच्या फोटोसमोर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करताना बघत आलो. (महाराज म्हणजे कोण ते सांगायाला लागू नये.. जर तुम्ही "मराठी" वाचू शकता, तर तुमच्या लेखी महाराज म्हणजे प्रत्यक्ष "शिवाजी राजे"च असावेत , हे मी गृहीत धरतो.) वर्षातून  खूप दिवस असे धूम धडाक्यात साजरे व्हायचे. गुढी पाडवा, गणपती उत्सव आणि  स्त्री वर्गाचे इतर कार्यक्रम सुद्धा.  पण, एका विशिष्ट दिवशी सगळा आजूबाजूचा भाग रोषणाई करून सजवला जायचा, शाखेच्या दारात रांगोळी काढली जायची, सकाळपासून लाउड स्पीकरवर शिवभक्तीपर गीते लावली जायची आणि महाराजांच्या फोटोची, पुतळ्याची पूजा केली जायची. पुढे मोठे होताना कळायला लागलं की हे  काही सेनेच्या याच शाखेत घडतं असं नाही. सगळ्या मुंबईत (किंबहुना महाराष्ट्रात) थोड्या फार फरकाने हेच वातावरण असतं. संध्याकाळी मिरवणुकी काढल्या जात. नऊवारी नेसलेल्या स्त्रिया, मुली आणि सदरा फेट्यावाले पुरुष, सजवलेल्या आणि महाराजांची मूर्ती असलेल्या वाहनासोबत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढायचे. मज्जा यायची ते बघताना. पण कारण काय ते कळायचं तेव्हा वय नव्हतं. मोठं झाल्यावर लक्षात आलं की हे सगळं शिव जयंतीच्या निमित्ताने साजरं केलं जात होतं. 

शिव जयंती म्हणजे, अर्ध्या झोपेत असलेल्या मराठी माणसा समोर जर कुणी ओरडला की "छत्रपती शिवाजी महाराज की ...." तर तो  माणूस ताडकन उठून "जय" असं म्हणून परत झोपेल, त्या छत्रपतींचा जन्मदिन. आदरच नाही तर श्रद्धा आहे त्यांच्याबद्दल आम्हाला. जे नाव घेताना छाती अभिमानाने फुलून येते, आणि डोळ्यासमोर एक राजबिंड रूप येतं त्यांचा जन्मदिन. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातली चित्र पाहून, पहिल्यांदा ज्यांच्या रूपाची, व्यक्तिमत्वाची आणि पराक्रमाची कल्पना आपण करतो त्यांचा जन्मदिन. असंख्य काव्यातून, खंडांमधून, पुस्तकांतून ज्यांची ओळख झालेली असते त्यांचा जन्मदिन. असं एक नाव जे घेल्यावर " मी मराठी आहे" असं म्हणून स्वत:चीच पाठ थोपटावी वाटते, त्यांचा जन्मदिन. मग त्या दिवसा करीता हा जल्लोष सार्थ वाटतो...

मध्यंतरी ह्या दिवसावरून जे राजकारण आणि पर्यायाने जो गोंधळ चालला होता तो अनाकलनीय होता. नक्की काय चाललं होतं तेच कळत नव्हतं. मग एक खुलासा झाला की, ही  भानगड शिव जयंतीच्या तिथीविषयक असलेल्या वादातून निपजली आहे. आणि इतकं होऊन मग तीन-तीन शिव जयंत्या अस्तित्वात आल्या. एक सरकार मान्य इंग्रजी कालगणनेनुसार केली जाणारी. दुसरी पूर्वापार चालत आलेली तिथीसंगत, आणि एक नव्या संशोधनानुरूप आलेली तिथी. ३५० वर्षे जुन्या घटनेच्या तारखेबाबत मतभिन्नता असणे काही गैर नाही. कारण आता दावे करणारे कुणीही तेव्हा हजर नव्हते. म्हणून वेगवेगळे अंदाज असणे सहज शक्य आहे.

असो, मला बोलायचं आहे ते थोड्या वेगळ्या विषयावर. म्हणजे अमराठी भारतीयांमध्ये (आणि काही मराठी लोकांमध्ये सुद्धा ) असलेल्या या दिवसाबद्दल किंवा एकंदर महाराज आणि त्यांच्या कर्तुत्वाबद्दल असलेल्या उदासीनतेबद्दल. आम्हाला महाराजांविषयी आदर आहे, श्रद्धा आहे कारण आम्ही त्यांच्या शौर्यकथा, कर्तुत्व आणि दातृत्वाबद्दल लहानपणापासून वाचत-लिहित आलो आहोत. तो जरी शालेय शिक्षणाचा भाग असला तरी पुढे जाऊन ती अस्मितेची गोष्ट झाली. किंबहुना हेच कारण आहे इतरांच्या याविषयीच्या उदासीनते बद्दल, की त्यांना हा इतिहास अभ्यासाला नव्हता. मध्यंतरी वाचलेलं की CBSE बोर्डाच्या इतिहासाच्या पुस्तकात महाराजांविषयी फक्त मोजून ४ ओळी होत्या, आणि उर्वरित सगळा इतिहास मोगलांचा होता. मोगलांनी बरीच वर्ष (तब्बल ४ शतकं) भारतभूमीवर राज्य केलं, पण महाराजांचा कालावधीही काही थोडा-थोडका नव्हता. दक्षिणेतल्या तंजावर पासून उत्तरेतल्या अटके पर्यंत पसरलेल्या मराठा साम्राज्याबद्दल सांगण्यासारखं CBSE बोर्डाला काहीच सापडू नये, ही शोकांतिका आहे. याची जाणीव तेव्हा होते जेव्हा माझी माझ्या अमराठी सहकार्यांसोबत (labmates आणि इतर मित्र)  चर्चा होते. त्यांच्या मते ही माहिती मी एकतर "कट्टर मराठा" असल्यामुळे असावी किंवा, मी कुतूहल आणि वैयक्तिक जिज्ञासेपोटी मिळवलेली असावी. पण मला वाटतं कि या राष्ट्रपुरुषाबद्दल काही जुजबी माहिती प्रत्येक भारतीयाला असावी. कारण आज आपण स्वत:ला स्वतंत्र म्हणतो, आणि इंग्रजांविरुद्धच्या लढाईचे गोडवे गातो. पण त्याही आधी एक स्वातंत्र्य संग्राम झाला होता आणि मोगलांच्या मुस्लीम राजवटी विरोधात जाऊन हिंदू स्वराज्य स्थापन करणाऱ्या युगपुरुषाबद्दलची कृतज्ञता प्रत्येक हिंदुच्या मनात असावी. नाहीतर आज आपली परिस्थिती अफगाणिस्तान आणि पाकिस्तानहून वेगळी नसती. धार्मिक कारणसोबतच याला वेगवेगळे सामाजिक पैलूही आहेत. महाराजांची राजवट ही जुलमी नव्हती, तर प्रजेच्या कल्याण आणि सुख-समृद्धी खातर होती. खऱ्या अर्थाने रयतेभीमुख राज्य केलं महाराजांनी. साधू-संत,  गोर-गरीब आणि स्त्रिया यांच्याप्रती महाराजांच्या मनात किती आस्था होती हे त्यांच्याविषयी जुजबी ज्ञान असणा-यालाही ठाऊक असेल. खऱ्या अर्थाने "शिवकल्याणराजा" हा समर्थांचा विचार सार्थ होता.  

आज शिवजयंतीच्या निमित्ताने हे सगळं काही पुन्हा एकदा इतकं दाटून आलं की, त्याला कागदावर वाट करून देण्याशिवाय पर्याय नव्हता. ती शिवभक्तीपर, शौर्य गीते, महाराष्ट्र गीते आपसूक कानात घुमू लागली. "म्यानातून उसळे तलवारीची पात...", "हे हिंदुमुक्ती शम्भूत्दिप्तीतम तेजा..." वगैरे…  मला आठवतं असंच एकदा शिवजयंती होती आणि मी कॉलेजला चाललो होतो आणि नाना चौकाच्या ब्रिजच्या बाजूला असलेल्या "जगन्नाथ शंकरशेठ शाळे"च्या बाजूने काही शब्द कानावर पडले.  आपसूक तिथे वळलो, तर लाउड स्पीकरवर हेच गाणं चालू होतं" हे हिंदुमुक्ती शम्भूत्दिप्तीतम तेजा..." तिथल्या कट्यावर हात ठेऊन तिथे उभं राहून ते ऐकलं, आणि संपल्यावरच माझा पाय तिथून निघाला. 

सद्य परिस्थिती काहीही असो, इतरांना त्यांच्या कर्तुत्वाची जाणीव असो वा नसो.. पण मराठी म्हणून घेणाऱ्या प्रत्येक मनात त्यांच्यासाठी कायम स्थान आहे. उगीच "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" सारखा सिनेमा आपल्याला अंतर्मुख करीत नाही.  कधी-कधी उगीच असं वाटून जातं अचानक दैवाकृपेने म्हणा किवा काहीही म्हणा त्या सिनेमासारखं जर साक्षात महाराज समोर उभे राहिले तर काय प्रतिक्रिया असेल माझी? कल्पनेने रोमांच उभे राहतात अंगावर. तुम्हीही कल्पना करून पहा.. श्वासाने एक गती घेतली असेल... छातीतली धडधड वाढलेली असेल आणि आपसूकच मान खाली गेलेली त्यांच्या समोर मुजरा करण्यासाठी...

" प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक ,
कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज, हिंदूपदपादशाह श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय ....!!!

४ टिप्पण्या:

  1. Good....made me think....CBSEchya boardbaddal bolaych jhala tar mala asa vatat ki to central board aahe mhanun tyanna overall Indian history lakshat thevun syllabus banvava lagat asel....kinwa asa hi asel ki syllabus committee madhye je members aahet te dusrya prantatle aslyamule tyanna shivaji maharajanbaddal mahiti nasavi aani tya mulech aastha nasavi,aaplya rajyatle tyat members kami astil kinwa jevdhe aahet tyanna interest nasel kinwa ajun kahi regional politics asel....you have described about your childhood....te vachat astana mala ek gosht janavli.....khup aadhipasun mala asa prashna padaycha kinbahuna mi tulna karayche ki kahi jananna shivaji maharajanbaddal kinwa aaple san or in general aaplya sanskruti baddal itki mahiti kashi....i think sarvanach ichha asli tari itka marathmola vatavaran milat nahi...mhanun aapsukach 'aaplya goshtibaddal' attachment vhayla vel lagto kinwa kadhi kadhi ti hotach nahi....tyat shivaji maharajanchi ji thodiphar mahiti milte ti TVvarun kinwa itar madhyamantun.....aata jar te madhyam negatively influenced asel tar pudhe kay vicharaylach nako....you are lucky ki tujhya bhagatle shivseneche karyalay 'active' hote....pan saglikade tasa nahiye....in my 5 years of my college life parlyala je karyalay aahe tyala mi nehmi taalach pahilay(parlyasarkhya bhagat unbelievable)......aso.....I only wanted to say that aaplya ajubajula jasa vatavaran aaplyala milta(tyala aaplyakade paryay nasto)....tyanusar aapan ghadat jaato....aani pudhe aaplya aavdinivdi,aaplya aasthechya goshti tashya tharat jaatat....

    उत्तर द्याहटवा
  2. @Harshada: tu nehmi mala mazyach likhanavar vegla vichar karayala lavtes.. it's gud avtually tyane yachi janiv hote ki maze vichar ajun titke paripakva nahit..
    but alongside I 200% agree wid u ki aapli sanskruti aani dharma blah blah yanchi janiv honya karita te balkadu lahan panapasun milayala hava.. mi majha bhagya samjen ki mi tya vatavarnat vadhlo.. ani parlyachya shakhebaddal tar kay bolav ha ha ha..
    anyways unkowingly u've give me one topic for my new post... Vichar chalu zalay aata kagdavar(screen war)kadhi yetoy te baghu...

    उत्तर द्याहटवा