शनिवार, ७ जानेवारी, २०१२

पेन्सिल पुराण

आज नव्या को-या पेन्सिलीची टोक काढताना, मनातल्या मनात शाळा आठवत होती.
जस-जशी पेन्सील फिरत होती, तशी काळाची चक्र मागे-मागे जात होती.

अशा कित्येक पेन्सिली वापरून शाळा पूर्ण केलेली
कधी गणित, कधी भाषा तर कधी चित्र पानावर तिच्यामुळेच उतरलेली..
पेन्सिलीच्या प्रत्येक वळणासोबत अक्षर वळत होती,
कधी समजून-उमजून लिहिलेली तर काही कळत-नकळत होती...
शिक्षणाच्या नावाखाली कित्येक पेन्सिली झिजून-झिजून घासलेल्या
गरीब बिचा-या वह्या मात्र पेंसिलीखाली भरडून-भरडून तासलेल्या..

अक्षर सुंदर येत म्हणून पान फाटेस्तोवर दाबून लिहायचं
नंतर बोटांवर उमटलेल्या पेन्सिलीच्या ठश्याकडे पाहत राहायचं
पहिल्या पानावर लिहिलेलं पाचव्या पानावर उमटायचं..
पानाच्या मागच्या बाजूवर हात फिरवल्यावर कसं बरं-बरं वाटायचं...

शेजारच्याच्या वळणदार अक्षराचा आपल्याला जाम हेवा होता,
त्याच्या शुद्धलेखनाला मिळणारी दाद, म्हणजे जणू त्याच्या हातात सरस्वतीचा ठेवा होता..
आपल्याही अक्षरांना आपल्यामते बरंच वळण होतं,
पण गुरुजींसाठी ते नेहमी पेन्सिलीचं दळण होतं.
कधीतरी ही थाप आपल्याही पाठीवर पडावी हीच एक अपेक्षा,
आपलीही वही नमुनेदाखल वर्गात फिरावी, त्या शेजारच्या शेंबड्या पोरापेक्षा.
रोज-रोज अशीच स्वप्न पडत होती,
रोज एक नव-नवी पेन्सील मोडत होती..
पेन्सिल बदलून हातचं अक्षर वळत नव्हतं..
हे त्या पेन्सिलीला पण कळत असेल, पण मला ते कळत नव्हतं..

पुढे पेन्सिल जाऊन पेनं हातात आली
पेन्सिल तेवढी चित्रकलेच्या तासापुरती राहिली
सजावटीसाठी चौकटी आणि विज्ञानाच्या आकृत्याची पेन्सिलच वाली होती.
आता पेन्सिलीची शुद्धालेखणं फक्त जुन्या वह्यांच्या पानातच उरली होती.
अजूनही, माझ्यामते माझा पेंसिलीचच अक्षर छान आहे.
शाळा सुटली तरीही अजून पेन्सिलीच मनात होतं तेच स्थान आहे..
भलेही पेन्सिल तासताना बरीच घाण उडवते
तीच असते जी प्रत्येकाची शाळा घडवते....

- विनायक कांबळे ...

1 टिप्पणी: