सोमवार, १२ मार्च, २०१८

माणूस

झाली असेल त्याची चूक, मोठा प्रमाद नाही
गरिबीत जन्मणारा, फक्त तो अपवाद नाही

आरोप माणूसपणाचा त्याला करेल कोणी
त्याच्या अस्तित्वाचा इतुकाच वाद नाही

टाकून त्यावर खटला, करती स्वतः निवाडा
सूटका करेल त्याची, ऐसा लवाद नाही

कोणी चुकून माणूस म्हटले जरी तयाला
आपण रुकारण्याची त्याची बिशाद नाही

-विनायक

रविवार, २१ जानेवारी, २०१८

देवभूमी केरळ : कथकली


एखाद्या जागेची संस्कृती त्याच्या भौगोलिक आणि धार्मिक जीवनाचं प्रतिबंब असते. त्यात तुम्हाला तिथल्या आहारापासून ते इतर दैनंदिन व्यवहारापर्यंत प्रभाव जाणवतो. आता केरळच्या बाबतीत म्हणाल तर निसर्ग हे इथल्या पर्यटनाचं मुख्य आकर्षण असलं तरी, इथली लोकसंस्कृती हे आणखी एक महत्त्वाचं आकर्षण. त्यात आहार, कला आणि सण-उत्सव हे प्रमुख.
कुठल्याही टूर आणि ट्रॅव्हल्स च्या केरळ पॅकेजच्या जाहिरातीवर हटकून दिसणारी तीन चित्र असतात. ती म्हणजे खाडीतली हाऊसबोट (backwaters), एक मुन्नारच्या चहाचा मळा आणि एक त्याच्या कथकली नर्तकाचा भावाविष्कार. या तिन्ही गोष्टींवर सविस्तर लिहिण्यासारखं आहे खरंतर. 

मी पाहिलेल्या कथकली नृत्यकलेविषयी. 

इजिप्तला गेलात आणि पिरॅमिड नाही पाहिला, किंवा व्हेनिसला जाऊन बोटीने प्रवास नाही केला, किंवा केनियात जाऊन जंगल सफारी नाही केली, हे जितकं अक्षम्य आहे तितकंच केरळ मध्ये येऊन किंवा इथं राहून कथकली नृत्याचा अनुभव न घेणं हेही तितकंच अक्षम्य आहे. तो एक अविस्मरणीय अनुभवच असतो.
इथे नृत्याचे कार्यक्रम वर्षभर होताच असतात म्हणून ठरवून कुठे बघायला जाणं होत नाही. किंबहुना त्याची गरजच पडत नाही. एखाद्या विकेंडला घराबाहेर पडलात आणि सहज शहरात फिरलात तर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सभागृहांमध्ये (म्युजियम आणि त्याच्या आसपासच्या भागात) तुम्हाला एखादा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असलेला दिसण्याची शक्यता दाट असते. असेच आमच्या नशिबात  अनायासे राज्य सरकार पुरस्कृत नृत्यमहोत्सवाला हजेरी लावायची काल संधी मिळाली. कथकली या आधी ही दोन वेळा पाहिलंय, त्यामुळे मला आता नव्याने काही त्यात पाहायला मिळेल अशी आशा नव्हती.


सुदैवाने मी त्या हॉलच्या मागच्या खिडकीशी, दोघे जण हातात कॅमेरा घेऊन उभे बघितले आणि तिथे काय चाललंय या उत्सुकतेनं मला तिथे नेलं. आत खिडकीतून डोकावून पाहिलं तर कथकली नर्तकांची तयारी सुरू होती. तयारी कसली शृंगारच तो! एखाद्या नववधू प्रमाणे मुख्य नर्तक मध्यभागी बसवून दोघे जण त्यांच्या रंगभूषेला मदत करत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मदतनीसांनी सुद्धा चेहऱ्यावर तशीच रंगभूषा केली होती पण ते साध्या वेशात होते. असो, एकूण बरीच लगबग सुरू होती. एखाद्या राणी आणि दासी प्रमाणे तो थाट होता. मी पोहोचे पर्यंत त्यांची वेशभूषा आणि बऱ्यापैकी रंगकाम झाले होते. ते पाहता नाही आलं, याचा खेद आहेच.

त्याच्या समोर स्टुलावर चार बल्ब लावले होते, प्रकाशाचा प्रभाव पाहण्यासाठी. मला कॅमेरा काढायला संकोच वाटत होता, कारण त्यांना जर ती गोष्ट आवडली नाही आणि त्याने त्यांच्या एकाग्रतेत भंग झाल्यास ते नाराज होऊ शकतील, असे वाटले. म्हणजे त्या खोलीत अजूनही लोकं हातात कॅमेरा घेऊन उभे होते पण मला इथे खिडकीतून त्यांच्यापेक्षा जास्त जवळून हे सगळं पाहायला मिळत होतं. त्यांना सावधपणे फोटो घेताना बघून माझी भीड चेपली आणि मी सुद्धा कॅमेरा काढला. त्या मदतीनिसांना शक्य तितकं बाजूला काढून फोटो घेतले. त्यात त्यांचं आभूषणे चढवणे सुरू होतं.
सगळं आवरून झाल्यावर त्या नर्तकाने शांतपणे बसून दोन मिनिटे फोटोसाठी आपणहून थांबले. मग जागेवरून उठून, तो सगळा संभार आवरून स्टेजच्या दिशेने तोंड करून उभे राहिले. हात जोडून दोन मिनिटे शांत उभं राहून नमस्कार केला. काही कॅमेरा क्लिक झाले पण त्यांना त्याचं अस्तित्व खिजगणतीतही नव्हतं. त्याच्या सगळ्या वागण्यात एक रुबाब आणि ठेहराव होता. आणि त्याच आवेशात त्यांनी रंगमंचावर पाय ठेवला. वादक आधीच बराच वेळ चेंदा नावाचं संबळसदृश वाद्य वाजवत होते आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोघांनी एक लाल रंगाचा मलमली गोंडेवाला पडदा धरून ठेवला होता आणि त्या मागे जाऊन नर्तकांनी आपापली जागा घेतली. योग्य वेळी पडदा सरला आणि कथकली सुरू झालं.

खरंतर, कथकली या नावातच सगळं आलं. एक पौराणिक कथा या नृत्यातून सादर केली जाते. रामायण, महाभारत किंवा तत्सम महाकाव्यातला एखादा प्रसंग तुमच्या समोर सादर होतो. या सगळ्याला प्रचंड मोठं धार्मिक महत्व आहे या संस्कृतीत. त्यात त्यांचे पारंपरिक वाद्य (चेंदा) वाजवले जातात. सगळीकडे साधारण एखादी पूजा मांडल्याचा अविर्भाव असतो. आणि नर्तकशुद्ध आपल्या कलेप्रती प्रचंड आदर आणि श्रद्धेनं वागतात. एखादं धार्मिक कार्य केल्यासारखं. हा कथकलीचा प्रकार मला साधारण कोकणकिनाऱ्यावरच्या सगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने पण बराच साम्य असल्या सारखा वाटतो. महाराष्ट्र गोव्याच्या कोकणातला दशावतार, कर्नाटकच्या दक्षिण कोकण आणि मंगलोरातला यक्षगान आणि केरळ मधला कथकली. भाषेप्रमाणे वेशभूषेत थोडा बदल होत जातो पण मूळ गाभा तोच: पौराणिक कथा आणि रंगवलेली पात्र. 

कथकली नर्तकाच्या रंगभूषेविषयी थोडंसं गुगल केल्यास माहिती सापडेल.. त्यांचे रंग पूर्णतः नैसर्गिक असतात. चेहऱ्यावरच्या पांढऱ्या पट्ट्या या तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या असतात. त्यांचे डोळे लाल झालेले दिसतात कारण ते पापणीच्या आत एक औषधी बी ठेवतात. ते घालणं सोपं नसतं पण त्यांना ते सवयीचं होऊन जातं.निश्चितच पर्यटनाने या कलेला आणि कलाकारांना जिवंत ठेवलं आहे आणि वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. भारतीय इतर शास्त्रीयनृत्यांप्रमाणे ही कला केवळ क्लास (अभिजन) साठी न राहता मासेस (सामान्यजन) पर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच कदाचित ती टिकली आहे, टिकवली गेली आहे. त्याला धर्माचं अनुष्ठान आहे, हे ही त्याच्या संवर्धनासाठी कारणीभूत असेल. तसंही  भारतात धर्म आणि संस्कृती यांची गल्लत केली जाते.  धर्म हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेच पण संस्कृती त्याहीपेक्षा इतर बऱ्याच गोष्टी अंतर्भूत करते ज्याचा धर्माशी प्रत्यक्ष संबंध नसतोच, उदा: भाषा, आहार, साहित्य, कला, खेळ इत्यादी. एखादी संस्कृती समजून घ्यायची तर या सगळ्यांची एकत्र मोट बांधायला हवी. असो, कथकली केरळी भाषा, कला, साहित्य आणि धर्म यांचा एकत्र अविष्कार आहे आणि या सगळ्यांचं त्यात महत्वाचं योगदान आहे. कधी केरळमध्ये येणं झालं तर कथकली चुकवू नका.

(टीप : हौशी लोकांना थ्रीसुर जवळ केरळ कलामंडपम कथकली इन्स्टिट्यूट आहे, तिथे या सगळ्याचा अस्सल अनुभव घेता येईल. )

डॉ विनायक कांबळेशनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

न्यूटनची गोष्ट भाग 2


न्यूटनला जरी त्याच्या आईने पुन्हा शिकायला पाठवले असले तरी त्याला कुठलीच आर्थिक मदत देऊ केली नाही. उदरनिर्वाहासाठी त्याला पडेल ती कामे करून कॉलेजचे शिक्षण घ्यावे लागले. म्हणून त्याच्या सोबत शिकणाऱ्या मुलांपेक्षा तो इतरांमध्ये कमी रमायचा. आपली ज्ञानाची भूक शमवण्याकरता न्यूटनला सामाजिक जीवनाचा त्याग करावा लागला होता. त्याच काळात त्याला रेने देसकार्ट्स या पुरोगामी फ्रेंच तत्त्वज्ञाच्या विचारांची ओळख झाली, ज्याच्या प्रकाशाच्या तरंग असण्याच्या सिंद्धांताला न्यूटनने पुढे भविष्यात आव्हान केले.

देसकार्ट्सच्या मते, मन आणि शरीर या दोन भिन्न गोष्टी आहेत ज्या एकत्र अस्तित्वात असतात. त्याच्या या प्रबंधाला "मन-शरीर द्वैत" असे नाव दिले गेले. देसकार्ट्सच्या या युक्तिवादाने न्यूटन प्रभावित झाला होता आणि त्याने या सृष्टीमध्ये अशा स्वतंत्र अस्तित्वात असणाऱ्या तत्वांचा शोध सुरू केला. न्यूटनच्या मते हे जग अशा परस्पर सलोख्यात असणाऱ्या पण विविध स्वतंत्र तत्त्वांचे बनलेले आहे (याला क्वांटम भौतिकशास्त्राची नांदी म्हणता येईल).

काळासोबत न्यूटनचा आधुनिक विज्ञानातील रस वाढत गेला, मुख्यतः क्वांटम आणि कण (particle) विज्ञान विषयी. त्याच्या या ध्यासाने त्याची आयझॅक बॅरो या केम्ब्रिजमधील सहप्राध्यापकाशी भेट घडवून दिली.

केंम्ब्रिज
५ जून १६६१ रोजी, त्याच्या मामाच्या संदर्भाने न्यूटनला केंम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. सुरुवातीला जरी त्याचे शिक्षण स्वखर्चावर सुरू झाले असले, तरी तीन वर्षात त्याला शिष्यवृत्ती सुरू झाली ज्यावर त्याला आणखी चार वर्षे शिक्षण घेता येणार होते.

न्यूटन केंम्ब्रिजमध्ये असताना त्याच वेळी सतराव्या शतकात इतरत्र साहित्यिक आणि वैज्ञानिक क्रांती घडत होती. कोपर्निकस आणि केप्लरसारख्या खगोलशास्त्रज्ञांनी विश्वाच्या मध्यभागी पृथ्वी नसून सूर्य असल्याचे सिद्धांत मांडले होते. हेलिओसेंट्रिक युनिव्हर्स असे नाव असलेला हा सिद्धांत इतका विवेकी आणि क्रांतिकारक होता की त्यामुळे पुढे विज्ञानाला वेगळे वळण लागले आणि गॅलिलिओ सारख्या अवकाश निरीक्षकांनी त्याचा वारसा पुढे चालवत त्या सिद्धांताला आकार दिला.

त्याच काळात वैज्ञानिक विश्वात प्रचंड उलथापालथ सुरू असताना नवनव्या संकल्पनांच्या संशोधकांना युरोपियन विज्ञान विश्वात अमाप प्रसिद्धी मिळत होती. रेने देसकार्ट्ससारख्या नव्या विचारांच्या सैद्धांतिकानी ही सृष्टी जटिल, तटस्थ आणि विशेष तत्त्व असल्याचे मांडले होते. त्याला मोठ्या प्रमाणावर लोकांनी मान्यही केले असले, तरी केम्ब्रिज आणि इतर विद्यापीठं अजूनही अरिस्टॉटलचे पारंपरिक सिद्धांतच शिकवीत होते.

न्यूटनला जरी पारंपरिक भौतिकशास्त्र शिकवले जात असले तरी त्याला आधुनिक विचाराच्या लोकांनी मांडलेले तत्त्वज्ञान वाचण्यात अधिक रस होता. आणि याच काळात न्यूटनने "काही तत्त्वज्ञानविषयक प्रश्ने" नावाचे एक वैज्ञानिक नियतकालिक सुरू केले. त्याचा पुढे सखोल अभ्यास करता असे आढळले की, न्यूटनने वैज्ञानिक क्रांती घडवणाऱ्या सृष्टीच्या नियमांची चौकट याच काळात शोधली.

१६६४ मध्ये आयझॅक बॅरो केम्ब्रिजच्या गणित विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आयझॅक बॅरो, ट्रिनिटी कॉलेजचे विद्यार्थी होते आणि "Lucasian Chair" सन्मानाने गौरवलेले प्रथम व्यक्ती होते. बॅरो यांनी केम्ब्रिजला येण्याआधी ग्रीक, थिओलॉजी आणि पुढे वैद्यक, चर्चचा इतिहास आणि भूमितीचे शिक्षण घेतले होते.

त्यानंतर न्यूटनने बॅरो यांची व्याख्याने ऐकली आणि त्याकडे त्याचा ओढा वाढला. त्याच वर्षी बॅरो यांनी न्यूटनला युक्लिडियन भूमितीशी परिचित करून दिले जे न्यूटनसाठी नवीन होते. पण नवीन गोष्टी शिकून त्यावर प्रभुत्व मिळवण्यात न्यूटनचा हातखंडा होता. शक्य तेव्हा अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर पुस्तके न्यूटनने विकत घेतली किंवा बॅरो यांच्याकडून मिळवली आणि त्याचा अभ्यास सुरू ठेवला. नवनवीन कल्पना आत्मसात करून न्यूटनने आपल्या प्रबंधात चांगलीच प्रगती केली होती आणि त्यामुळे बॅरो यांच्या लेखी त्याचा आदर चांगलाच वाढला होता.

इ. स. १६६५ मध्ये, न्यूटनने यशस्वीरीत्या त्याची पदवी पूर्ण केली असली तरी नाईलाजाने त्याला पुन्हा घरी परतावे लागले होते, कारण प्लेगच्या साथीला खबरदारी म्हणून विद्यापीठाला सुट्टी देण्यात आली होती. निश्चितच त्याने घरी आपला अभ्यास सुरू ठेवला आणि पुढच्या काही वर्षांच्या काळात त्याने कॅलक्युलस, ऑप्टिक्स आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम यांसारखे महत्वाचे सिद्धांत विकसित केले. किंबहुना, त्यांच्या ऊल्सथोर्पच्या घराच्या बागेत असलेल्या झाडावरून सफरचंद पडताना पाहूनच त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला होता.


ऊल्सथोर्प मधील न्यूटनचे घर आणि प्रसिद्ध सफरचंदाचे झाड (आंतरजालावरुन साभार)

इ. स. १६६७ मध्ये, प्लेगची दुर्धर साथ निवळल्यानंतर न्यूटनचे केम्ब्रिजला पुनरागमन झाले आणि १६६८ मध्ये त्याने पदव्युत्तर पदवी (masters degree) प्राप्त केली. याच काळात न्यूटनला निकोलस मार्कटर यांचे एक पुस्तक हाती लागले. त्या पुस्तकात अमर्यादित मालिका (infinite series) या महत्वाच्या गणिताच्या प्रकाराचे विवेचन होते. त्याने प्रेरित होऊन न्यूटनने यावर विस्तृत मत मांडणारा एक शोधप्रबंध लिहिला. पण त्याला प्रकाशित न करता त्याने तो प्रबंध केवळ बॅरो या आपल्या मित्र आणि मार्गदर्शकाला दाखवला.

इ. स. १६७० मध्ये, वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी न्यूटन ट्रिनिटी कॉलेज मध्ये गणिताचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. पुढच्या तीन वर्षात त्याचे वय झपाट्याने वाढल्यासारखे वाटू लागले. त्याचे विस्कटलेले, खांद्यापर्यंतचे केस पांढरे दिसू लागले. न्यूटनचे वजन कमी होऊन तो अतिशय कृश दिसू लागला. ऐन तिशीमध्येच तो त्याच्या वयाच्या कित्येक पट म्हातारा दिसू लागला आणि समंजसपणे वागू लागला.

क्रमशः

-डॉ. विनायक कांबळे.
(अलेक्झांडर कॅनेडी यांच्या "न्यूटन, सीक्रेट ऑफ युनिव्हर्स" या चरित्रपर पुस्तकाचा स्वैर अनुवाद)

रविवार, १६ जुलै, २०१७

न्यूटनची गोष्ट.. भाग १

इसवी सन १६२३, त्याकाळी सततच्या नागरी युद्धाने व्याप्त इंग्लड, आजच्यासारखे शांत नव्हते. विथम नदीकाठी, एका टेकडी शेजारी वुल्सवर्थ नावाची एक शेतावरील वस्ती होती. तिथले घर आजूबाजूच्या परिसरातल्या माती आणि गवताच्या सुक्या पेंडयानी बनलेल्या इतर घरांपेक्षा वेगळे, म्हणजे चुनखडीच्या दगडांनी बनले होते. ते सुबत्तेचे प्रतीकच होते. त्याला एक ठेंगणा दरवाजा, मजबूत खिडक्या आणि सुसज्ज पाकगृह होते. असे हे घर आणखी एका कारणासाठी वेगळे होते, ते म्हणजे मानवाच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली वैज्ञानिकाचे, आयझॅक न्यूटनचे ते जन्मस्थान होते.

रॉबर्ट न्यूटन हे आयझॅक न्यूटनचे आजोबा होते, आणि एक प्रस्थापित शेतकरी होते. त्यांनी इसवी सन १६२३ साली ही शेतजमीन विकत घेतली होती. त्यांचा मुलगा, आयझॅकने( शास्त्रज्ञ आयझॅकचे वडील) ही शेतीची जबाबदारी यशस्वी रित्या पेलली होती आणि कालांतराने तो सुद्धा एक प्रस्थापित शेतकरी म्हणून नावारुपाला आला. त्यांनी साधारण वीस वर्षे ही शेती आणि घर सांभाळले होते. त्याच घराच्या मागच्या अंगणात सफरचंदाचे ते झाड होते जिथे आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला असे खुद्द न्यूटनने जाहीर केले होते.

Source: Wikipedia.org

ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे डिसेंबर २५ , १६४२ ला आयझॅक न्यूटनचा जन्म झाला. न्यूटनच्या जन्माच्या तीन महिने आधी त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि म्हणून वडिलांच्या नावावरूनच त्याचे नाव आयझॅक ठेवले गेले. या घटनेमुळे त्याचा जन्म काहीशा दुःखाच्या सावटाखाली झाला. आता त्याला वाढवण्याची जबाबदारी त्याची आई, हाना ला एकटीने पार पाडावी लागणार होती.

न्यूटन तीन वर्षांचा असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आईकडे (त्याच्या आजीकडे) सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि तिने बार्नबस नावाच्या एका श्रीमंत इसमाशी पुनर्विवाह केला. पण त्या विवाहाच्या बदल्यात त्याच्याकडून एक जमीनीचा तुकडा आपल्या मुलाच्या नावे करून देण्याचे कबूल करून घेतले. आपल्या आई-वडिलांचे प्रेम आणि मार्गदर्शनाशिवाय न्यूटनचे बालपण काहीसे उद्विग्न आणि त्याच्या सावत्र वडिलांच्या उपस्थितीत काहीसे भेदरलेल्या अवस्थेतच गेले. 

न्यूटनच्या आईने त्याला त्याच्या आजीकडे सोडून दिले जिथे त्याला खूप एकाकी वाटत असे. आपल्या जन्माआधी आपल्या वडिलांचे झालेले निधन, वयाच्या तिसऱ्या वर्षी सोडून गेलेली आई, एकही भावंड नाही आणि आजीलाही आपल्याविषयी माया वाटत नाही, याचा परिणाम म्हणून तो स्वभाने खूपच बेफिकीर होत चालला होता. तशातच काळासोबत तो एकलकोंडा आणि अबोल होत गेला. तो दहा वर्षाचा होई पर्यंत त्याच्या आईला तीन मुले झाली होती आणि दुर्दैवाने तिला पुन्हा वैधव्य आले होते. त्या घटनेनंतर हानाने आपल्या तिन्ही अपत्यांसोबत पुन्हा वुल्सथोर्पला परत येण्याचा निर्णय घेतला. त्यांचे संबंध जरी तणावपूर्ण असले तरी, न्यूटनला त्याची आई परत आल्याचा आनंद होताच. या गोष्टीचा आणखी एक फायदा झाला तो असा की, न्यूटनला त्याच्या सावत्र वडिलांची धर्मशास्त्राच्या (theology) तीन हजार पुस्तकांनी भरलेले वाचनालय मोकळे झाले होते. त्या पुस्तकांमुळेच आपल्याला पडलेल्या काही प्रश्नांची आपल्याला उत्तरे मिळाली, तसेच ज्ञानार्जनाची आणि वाचनाची आवड निर्माण झाली, असे त्याने कबूल केले होते.

शालेय जीवन
विद्यार्थीदशेत असताना न्यूटन हा अतिशय हुशार होता. अभ्यासात कायम त्याच्या बरोबरीच्या मुलांपेक्षा उजवा होता. त्याच्या 'किंग्स स्कुल' या शाळेत 'श्री. हेन्री स्टोक्स" या लॅटिन, थिऑलॉजी, ग्रीक आणि हिब्रू शिकवणाऱ्या त्याच्या गुरुजींचा त्याच्यावर विशेष प्रभाव होता. आपल्या विद्यार्थ्यांनी यशस्वी शेतकरी व्हावे यासाठी स्टोक्स मास्तर जुजबी अंकगणित आणि विविध भूमितीय आकारांचे क्षेत्रफळ मोजण्याच्या पद्धती सुद्धा शिकवीत. एकरांमध्ये क्षेत्रफळ कसे काढावे किंवा एका वर्तुळात एखादी बहुभुज आकृती रेखून त्याच्या भुजांची लांबी काशी काढावी, ही आणि अशी इतर तंत्र त्यांनी मुलांना शिकवली. छोट्या न्यूटनने हे धडे केवळ पटकन आत्मसातच नाही केले, तर त्याने त्यावर प्राविण्य मिळवले.

खिडकीतून समोरच्या भिंतीवर पडणारे सूर्यकिरण एकदा त्याच्या निरीक्षणात आले आणि न्यूटनच्या चिकित्सक बुद्धीने दररोज पडणाऱ्या सूर्यकिरणांचा अभ्यास नकळतच सुरू केला. ही किरणे खिडकीतून भिंतीवर येताना तिरकस रीतीने येतात आणि त्यामुळे पडणारे प्रकाशने कवडसे व इतर अंधाऱ्या भागाला विभागणारी सीमारेषा या दिवसेंदिवस विशिष्ट प्रकारे मार्गक्रमण करतात हे त्याने ताडले. (प्रकाशाच्या खऱ्या सवरूपाबद्दल त्या काळी काही भक्कम शास्त्रीय पुरावे नव्हते. )

न्यूटनने त्याचे केवळ निरीक्षणच नाही केले, तर त्यावर विचार करून विविध वर्तुळाच्या एकमेकांना छेदल्यामुळे त्रिमितीय अवकाशात असा आभास निर्माण होऊ शकतो आणि त्यातून प्रकाशाला लागणारा वेळ काढण्याचा त्याने प्रयत्न केला. भिंतीवर दिवसेंदिवस जागा बदलणाऱ्या कवडशाच्या कडेच्या जागेतील अंतरे त्याने इंचांमध्ये मोजून प्रकाशाला लागणारा वेळ मिनिटांमध्ये मोजण्यासाठी लागणारे गणित मांडण्याचा प्रयत्न केला. दिवसागणिक त्याने सुर्यमालेचा हा अभ्यास न्यूटनने सुरू ठेवला. त्यातूनच त्याला सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या बदलत्या जागांच्या विशिष्ट पुनरावृत्तीचे ज्ञान झाले. इतकेच नाही तर एक विशिष्ट ताऱ्यापासून या जागांचे स्थान कसे बदलत जाते याचे सुद्धा त्याने निरीक्षण केले. आणि या सगळ्या गोष्टी घडतात याला कारण 'पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची लंबवर्तुळाकार कक्षा' आहे, हे ही न्यूटनने ताडले.

न्यूटनच्या हुशारीची चुणूक दाखवणारा आणखी एक किस्सा आहे पवनचक्कीचा. त्याकाळी वाऱ्यावर चालणाऱ्या चक्क्या नवीनच होत्या. सगळीकडे पाण्यावर चालणाऱ्या चक्क्या असल्याने या ग्रेट नॉर्थ रस्त्यावरच्या नवीन वाऱ्यावर चालणाऱ्या चक्क्यांनी त्याचे लक्ष वेधले नसते तरच नवल! न्यूटनने त्यांच्या गतीचे बरेच दिवस निरीक्षण केले आणि त्यांचा आणखी अभ्यास करण्यासाठी त्याने त्यांची एक प्रतिकृती बनवली. कापडाचे पाते असलेली ही छोटी पवनचक्की त्याने आपल्या घराच्या छतावर लावली. तिला फिरायला लागणारा वारा मिळावा म्हणून त्याने एका चाकाची निर्मिती केली, जे फिरल्यावर वारा लागून पवनचक्की सुद्धा फिरत असे. ते चाक फिरवण्यासाठी त्याने आपल्या माउस मिलर नावाच्या पाळीव उंदराचा वापर केला.

न्यूटनच्या या चौकस आणि सर्जनशील स्वभावामुळे त्याने एक कागदी कंदिलही बनवला होता. या कंदीलाचा वापर तो हिवाळ्याच्या अंधाऱ्या दिवसात शाळेत जायला करत असे. शाळेत पोहोचल्यावर तो कंदील घडी कायुन खिशात ठेवता येत असे. एकदा तो कंदील पतंगाला बांधून त्याचा वापर न्यूटनने आपल्या शेजाऱ्यांना घाबरवण्यासाठी सुद्धा केला होता.

१६५९ साली न्यूटन जेव्हा १७ वर्षांचा झाला, तेव्हा त्याच्या आईने त्याला पुन्हा वूल्सथोर्पला बोलावून घेतले. युद्ध नुकतेच संपले होते आणि आपल्या मुलाने आता शेती शिकावी अशी तिची इच्छा होती. त्याने शिक्षणात जरी विशेष प्राविण्य मिळवले असले तरी आता त्याने शेती करावी आणि आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळावा अशी तिची इच्छा होती. म्हणून न्यूटनच्या मनाविरुद्ध तिने त्याचे शिक्षण बंद केले आणि त्याला शेती सोपवली.

न्यूटनने जरी मुकाट्याने शेती पत्करली असली, तरी काही काळात त्याला जाणवले की त्याला शेतीत रस नाही. खुद्द त्यानेच एकदा असा किस्सा सांगितलेला की त्याला मेंढ्या राखायला बसवले असता तो शेजारच्या ओढ्यावर बांध घालून जलचक्की बांधत बसला. तेवढ्यात तो राखत असलेल्या मेंढ्या सुटून त्यांनी शेजाऱ्याच्या मक्याच्या शेतांची नासधूस केली. याची भरपाई देण्याचा भुर्दंड त्याच्या आईला पडला. न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे ते शेती शिकण्यात घालवलेले नऊ महिने त्याच्यासाठी क्लेशकारक होते. त्यावरून त्याचे त्याच्या आई आणि सावत्र बहिणीसोबत वारंवार खटके सुद्धा उडत होते.

न्यूटनचे मामा केम्ब्रिज विद्यापीठाचे पदवीधर होते. न्यूटनची हुशारी आणि त्याचे शेतीत नसलेले स्वारस्य पाहून त्यांनी न्यूटनला पुन्हा शाळेत पाठवण्याचे आपल्या बहिणीला सुचवले. आपल्या भावाच्या सांगण्यावरून आणि आपल्या मुलाला शेतीत काडीचाही रस नसल्याचे पाहून न्यूटनच्या आईने नमते घेत त्याला पुन्हा शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला.

-डॉ. विनायक कांबळे.
(अलेक्झांडर कॅनेडी यांच्या "न्यूटन, सीक्रेट ऑफ युनिव्हर्स" या चरित्रपर पुस्तकाचा स्वैर अनुवाद)

शनिवार, ८ जुलै, २०१७

बालक पालक...

आजचे बालक पुढे उद्या पालक होणार असतात आणि आजचे पालक कधीकाळी बालक असतात. हे वर्ष 2017 आहे. आज जे पालक आहेत आणि जे बालक आहेत त्यांच्या दोन्ही पिढ्याच्या मधल्या काळात कधीतरी तंत्रज्ञानाने मोठी उडी घेतली आहे. तबकडी फिरवून नंबर लावायच्या फोनपासून ते नाव उच्चारून फोन लाव म्हणून आदेश घेणाऱ्या स्मार्टफोनपर्यंत येताना बरीच स्थित्यंतरं ओलांडलीयेत. त्याच्यामुळे या दोन्हींमध्ये शोधायला जाता साम्य कमी आणि तफावत फार. 

आपलं पालनपोषण आपल्या पालकांनी अत्यंत साधेपणाने केलं आणि तरीही त्या परिस्थितीतून आपण जे शिकलो, वाढलो, घडलो तशी आजची पिढी कधीच करू शकणार नाही, ही बऱ्याच पालकांची ओरड असते. पण, परिस्थितीच ती राहिली नसेल तर ? आजच्या नव्या पिढीचं जग वेगळं आहे, त्यांच्या समोरची आव्हानं वेगळी आहेत. त्यांच्यासमोर जीवघेणी स्पर्धा आहे. त्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानासोबत अपडेटेड राहणं ही गरज आहे. स्मार्ट यंत्र चालवायला माणूसही स्मार्टर असावा लागतो नाही का? मग इतकं सगळं वेगळं असताना त्यांचं आयुष्य त्याच फुटपट्टीने मापून कसं चालेल? आणि ही गोष्ट किती पालक समजून घेतात? फार कमी, किंबहुना नगण्य. आणि ज्यांना कळतं ते बऱ्याचदा त्याचा अनावश्यक बाऊ करतात. अशात मुलांच्या अपेक्षा असतात पालकांनी त्यांना समजून घ्यावं, त्यांच्या कलेने घ्यावं. 

एक असते खरी खरी स्पर्धा आणि एक असते लादलेली स्पर्धा. लादलेली स्पर्धा सुरू होते जन्माबरोबरच. शेजारच्याचं बाळ रांगायला लागलं, आपलं अजून पालथं सुद्धा पडत नाही. अमुक एक जण बोलायला लागला आणि आपलं बाळ कसं बोलत नाही? तो अंगणवाडीत छान खेळतो, आमचाच कसा रडत राहतो? ह्यानी इंटरव्ह्यूला जर बरी उत्तरं दिली असती तर कॉन्व्हेंटला गेला असता आज. मग पुढे परीक्षा, मार्क, खेळ, कला जितके तिकडे नंबरासाठी जुंपून दिलेली स्पर्धा. आणि या सगळ्या स्पर्धांमधून आपल्या पाल्याने कायम पहिलं येत राहावं ही अनावश्यक अपेक्षा करत राहणे. आणि त्यातच त्याचं भलं आहे याचा दृढ विश्वास असतो. याची खरंच गरज आहे का?  ती जी खरी खरी स्पर्धा असते ती तर खूप उशिरा सुरू होते. जेव्हा माणूस स्वतःच्या पायावर उभे राहण्याची वेळ येते. खऱ्या जगातल्या खऱ्याखुऱ्या माणसांसोबत जेव्हा डील करावं लागतं.  या परीक्षांच्या आणि जबरदस्तीच्या छंद वर्गांच्या लादलेल्या स्पर्धांमधलं तिथं खऱ्या जगात काहीच कामी येत नाही. आणि जे लागतं त्याची तयारी कुणीच करवून घेतलेली नसते, कधीच.  तेच आपल्या आयुष्यात आज आई आणि बाबा असलेल्या व्यक्ती रोज जगत असतात, लढत असतात. पण आपल्या पाल्याला अशा आव्हानांनी आणि तणावाने भरलेल्या जगात आपलं मानसिक आरोग्य कसं राखावं याचं प्रशिक्षण कधी देतच नाहीत. किंबहुना त्यांनाही कधी ते दिलं गेलेलं नसतं मग त्यांना तरी जे माहीत नाही त्याचा अभाव कसा जाणवणार? 

काही गोष्टी ह्या फक्त स्वतःसाठी करायच्या असतात. एखादं गाणं गुणगुणनं, एखादा खेळ खेळणं, एखादं पुस्तक वाचणं, सिनेमा पाहणं किंवा आणखी काहीही. लगेच त्या मुलींमध्ये लता मंगेशकर आणि मुलामध्ये सचिन तेंडुलकर दिसून त्याच्या कलेला वाव देण्याच्या नावाखाली त्याचं इतर गोष्टींचं कुतूहलच पालकांकडून संपवून टाकलं जातं. उदाहरणच द्यायचं तर, आपला मुलगा किंवा मुलगी छान चित्र काढतो किंवा काढते म्हणून त्याच्यात भावी चित्रकार बघणारे पालक त्याला लगेच पेंटिंगचे क्लास लावतात आणि काही नाही तर डिझायनर होईल अशी स्वप्न बघतात. जेव्हा एखाद्या गोष्टीला व्यवहाराची जोड लागते तेव्हा बहुधा त्यातलं आत्मसमाधानाचं मूल्य संपतं. त्याच्यात फक्त एक प्रकारचा यांत्रिकीपणा येतो. "छंद" संपून मग ते मग ते कायमचं "द्वंद्व" होऊन बसतं. अर्थात प्रोत्साहन देऊच नये असं नाहीच पण मुलांचे छंद आणि आवडी या प्रवाही असतात हे ही लक्षात घ्यायला हवं. तुमचा पोटापाण्याचा व्यवसाय काही असो, रोजच्या जगण्यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढून जेव्हा तुम्ही बाकी सगळं विसरून ज्यात रमता तो छंद. 

उद्या जेव्हा तो किंवा ती मोठे होतील, आणि हळू हळू त्यांना स्वतःला त्यांची आवड कळेल, तेव्हा त्यातला योग्य तो पर्याय निवडण्याची निर्णयक्षमता त्यांच्यात यावी इतका त्यांचा आत्मविश्वास तयार होईल याची फक्त काळजी घ्यायला हवी. मग त्यांच्यासमोर सगळे पर्याय मांडून निर्णय त्यांच्यावर सोपवून द्यावा. चुकलं तरी तो त्यांचा निर्णय असेल. त्यातून ते शिकतीलच. म्हणून पालकहो जस्ट टेक अ चिल पिल.. त्यांना त्यांचे रस्ते शोधू दे. खरी गरज आहे ती त्यांना खऱ्या स्पर्धेसाठी तयार करण्याची... त्याचं बक्षीस पैसे आणि प्रसिद्धी नसून समाधान आणि मानसिक आरोग्य असेल...

गुरुवार, २५ मे, २०१७

जीवन..

गावात नांगरून पावसाची वाट पाहत असलेल्या जमिनीवर त्यांची पालं पडलेली दिसतात. तीन-चार गाठोडी आणि मोजक्याच गाडग्या-मडक्याचा संसार. सोबत शंभरेक मेंढ्या आणि हे विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर वागवायला दोन-चार घोडे. त्यात एक नवीन शिंगरू. 

संध्याकाळच्या वेळी उन्हं उतरताना माझी नेहमीसारखी नदीकडे एक फेरी असते, त्या रस्त्यावर हा लवाजमा दिसतो. संध्याकाळच्या कलत्या उन्हात त्या मेंढ्या अजूनच चकाकू लागतात. त्यांना घेऊन फोटो काढायचा म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. पुरुष मंडळी मेंढ्या चरायला घेऊन गेले होते आणि प्रत्येक पालेवर एक स्त्री रात्रीसाठी रांधत बसली होती. त्यातल्या एका बाईला "मेंढीसोबत फोटो काढू का?" असं विचारताच त्यांनी लगेच हातातलं काम सोडून जवळच्या मेंढीजवळचं नुकतंच तासभारपूर्वी जन्मलेलं एक कोकरू उचलून आम्हाला देऊ केलं. त्या लोकांचं तिथं येण्यामागचं कारण जाणून घ्यायच्या उत्सुकतेनं मी शेवटी त्यांच्या नाव-गावाची चौकशी केलीच. 

"आमी तिकडं लांब आटपाडीस्नं आलो. पाऊस आल्याव जायचं माघारी." त्या नुकत्याच जन्मलेल्या तिळ्या मेंढ्यापैकी एकाला आमच्या हातात देत ती पोरसवदा बाई बोलली. 
मी म्हटलं "थांबा, त्या शेळ्यांसोबत तुमचाही फोटो घेतो." ती एकदम ओशाळली, पण तो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तिने मेंढी खाली सोडली आणि आपला अवतार ठीकठाक केला. कुणीतरी आपला फोटो घेतोय याचं तिला कौतुक होतं आणि तिने लाजत का होईना पण ते बोलून दाखवलं. 

"तुमच्या एक फोटोत आमचा समदा संसारच आला बगा." मी त्यांच्या संसाराचे फोटो घेत असताना ती बाई म्हणाली. मला एकदम बंगले-गाडी विकत घेण्यासाठी रक्त आटवणारा शहरी माणूस आठवला. अर्थात, हे लोक या परिस्थितीत आनंदात आहेत असं गृहीत धरणं चुकीचं होईल. मोठं घर, जमीन, टीव्ही, महागडी गॅजेट्स यांची स्वप्न त्यांनाही पडत असतील. किंबहुना पडतातच, तसं नसतं तर ती बाई फोटो सारख्या एरव्ही साध्या गोष्टीने इतकी आनंदी झाली नसती. पण आहे त्या परिस्थितीत माणूस जगणं सुरू ठेवतो, केवळ उद्याच्या आशेवर.

सांगली जिल्ह्याला कृष्णा नदी पूर्व-पश्चिम भागात विभागते. पूर्वेकडचे तासगाव, आटपाडी, विटा, जत तालुके तसे पश्चिमेच्या  वाळवा, पलूस आणि काही अंशी शिराळा पेक्षा दुष्काळी. त्यातपण पश्चिमेकडच्या भागात वारणा नदीच्या सबंध किनाऱ्यालगतचा साधारण काही किमीचा पट्टा पाणीदार आणि ऊस पिकवणारा. तो भाग सोडला तर शिराळा तालुक्याच्या उरलेल्या डोंगराळ भागात रिकामे हंडे घेऊन पायपीट करणाऱ्या स्त्रिया, सायकलीवर मैलभर पाणी वाहून नेणारे पुरुष हे दृश्य तसं नेहमीचंच. 

अशा पूर्वेच्या वारणेच्या पाण्यावर हिरवा झालेल्या भागात हे लोक पश्चिमेच्या दुष्काळी भागातून शंभरेक किलोमीटर आपल्या शेळ्या-मेंढ्या जगवायला उन्हाळ्याच्या काळात येतात. उन्हाळ्याचे दिवस संपून पावसाच्या आगमनाबरोबर आपल्या गावाची परतीची वाट धरतात. हे स्थलांतरित लोक स्थलांतरित पक्षांप्रमाणे निसर्गाच्या चक्राला सरावले आहेत. 

एकविसाव्या शतकात जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात माणसाचं जगणं असंही असू शकेल, याची शहरी सुशिक्षित आणि तथाकथित प्रगत वर्गाला कल्पना असणंही कठीण आहे.

पाणी हेच "जीवन" ...